Thursday, 11 February 2021

सुवार्तेद्वारे प्रभूचे कार्य



            *✨सुवार्तेद्वारे प्रभूचे कार्य✨*


*म्हणजे तुम्ही आळशी होऊ नये, तर विश्वासाच्या व धीराच्या योगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे होतात त्यांचे तुम्ही अनुकारी व्हावे..✍*

                       *( इब्री ६:१२)*


                           *...मनन...*


    परमेश्वराने जे सुवार्तेचे काम आपल्याला सोपवून दिलेले आहे, ते काम आपण पूर्ण विश्वासाने केले पाहिजे, कारण देवाची अशी इच्छा आहे की, एकाही आत्म्याचा नाश होऊ नये तर सर्वांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा आम्ही इतरांना प्रभूबद्दल सुवार्ता सांगू, इतरांना सुवार्तेद्वारे ख्रिस्ताची ओळख करून देऊ. कारण कितीतरी लोक अजूनही ख्रिस्ताला ओळखत नाहीत, अजूनही ते ख्रिस्तापासून दूर आहेत. तेव्हा त्यांच्यापर्यंत सुवार्ता पोहोचविणे आणि त्यांना ख्रिस्ताची ओळख करून देणे गरजेचे आहे. कारण तेव्हाच त्यांचे तारण होऊ शकते. वचन सांगते की, *स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीच्या खाली प्रत्येक गूडघा येशूच्या नावाने टेकला जावा, आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने  येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. ( फिलिप्पै २:१०,११)*


    परमेश्वर केवळ आपल्यासाठी नव्हे तर जगातील सर्वांसाठीच तारणारा म्हणून ह्या भूतलावर आला. आणि त्याने मानवासाठी अनेक चमत्कार केले, आणि शेवटी आपल्यासाठी स्वप्राण अर्पून त्याने आपल्यावरील त्याची प्रीति दर्शविली. आपणही त्या प्रीतीची, त्याच्या मरणाची आठवण ठेवून आपल्याला सोपवून दिलेले कार्य कंटाळा न करता करीत राहावे. कारण असे लिहिले आहे की, *सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करीत जागृत राहा. ( इफिस ६:१८)* पौल फिलिप्पैकरांना लिहितो की, *ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असेच आचरण ठेवा. ( फिलिप्पै १:२७)* सुवार्ता सांगताना कदाचित तुमचा छळ केला जाईल, तुम्हाला विरोध करण्यात येईल, परंतु तुम्ही माघार न घेता सुवार्ता गाजविण्याचे कार्य चालू ठेवले पाहिजे. कारण जरी तुम्हांवर कुठल्याही प्रकारचे संकट आले तरी प्रभू तुम्हाला प्रत्येक परिस्थितीमध्ये साहाय्य करील, आणि तुमचे रक्षण करील. असे लिहिले आहे की, *त्याच्यावर  विश्वास ठेवावा इतकेच केवळ नाही, तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरिता दुःखही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे. ( फिलिप्पै १:२९)*


    म्हणून प्रियांनो, देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी आपण देवाच्या अपार कृपेवर विश्वास ठेवावा आणि देवाच्या साहाय्यावर विसंबून राहावे. तो आपल्याला सर्व प्रकारचे साहाय्य करील आणि आपण करीत असलेल्या सेवेचे प्रतिफळ आपल्याला दिल्यावाचून राहणार नाही. असे लिहिले आहे की, *तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही. ( इब्री ६:१०)* प्रियांनो, आपण ख्रिस्तावरील विश्वासामध्ये सदैव टिकून राहावे, अढळ राहावे. कारण विश्वास हाच आमच्या ख्रिस्ती जीवनाचा पाया आहे. आणि अनेक लोकांना ख्रिस्ताकडे आणायचे म्हणजे पाया म्हणजेच आपला विश्वास हा प्रथम मजबूत असायला पाहिजे, भक्कम असला पाहिजे, तरच इतरांचे मन आपण वळवू शकतो. वचन सांगते की, *जर आपण आपला आरंभीचा भरंवसा शेवटपर्यंत दृढ धरिला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहो. ( इब्री ३:१४)* म्हणून प्रियांनो, आपण आपल्याला प्रभूने सोपवून दिलेली सुवार्तेची घोषणा करण्याची कामगिरी न डगमगता, आळस न करता सदोदित करावी. एकमेकांसाठी सदैव प्रार्थना करावी, आणि जे देवापासून दूर आहेत त्यांना देवाच्या राज्यात आणण्यासाठी झटून प्रयत्न करत राहावे.


      

No comments:

Post a Comment