*✨यरुशलेमेचा न्याय✨*
*तू आपल्या दुष्कर्मांचे व अमंगळ कृत्यांचे फळ भोगत आहेस, असे परमेश्वर म्हणतो..✍🏼*
*( यहेज्केल १६:५८ )*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
या अध्यायामध्ये यरूशलेम ही पत्नी असून परमेश्वर हा तिचा पती आहे असे दाखविले आहे. देवाची त्याच्या लोकांवरील प्रीति ही पत्नीवरील प्रीतीसारखी आहे अशी तुलना बायबलमध्ये अनेक ठिकाणी केलेली आपणांस पाहावयास मिळते. देवाचे निवडलेले शहर होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्याच गोष्टी यरूशलेमेकडे नव्हत्या. यरूशलेमेची स्थापना हिब्रू लोकांनी केली नव्हती, तर कनानच्या मूर्तिपूजक लोकांनी केली होती. देवाने पवित्र शहर म्हणून यरूशलेमेची निवड करून तिला जीवन दिले व यबूसी लोकांपासून ते जिंकून घेण्यासाठी दाविदाला प्रेरणा दिली. ( २ शमुवेल ५:७-१०) तिने देवाबरोबर बेईमानी केली परंतु तरीही देवाने तिच्यावर प्रीति केली. तिची काळजी घेतली आणि तिला सुंदर व वैभवी नगरी बनवले. परमेश्वर म्हणतो, तू जन्मलीस तेव्हापासून तुझा तिरस्कार केला आहे, तुला अमंगळ समजून टाकून दिलेले होते, परंतु मला तुझी दया आली, मीच तुला जिवंत ठेवले. तू वाढून मोठी झालीस तेव्हा मी पत्नी म्हणून तुला स्वीकारले, तुला भरपूर दागदागिने व विपूल वस्त्रप्रावरणे दिली, तुझ्या सौंदर्याचा लौकिक सर्वत्र झाला. *"तुझ्या सौंदर्यामुळे तुझी किर्ती राष्ट्रांत पसरली; कारण मी तुला दिलेल्या तेजाने तुझे सौंदर्य अप्रतिम झाले, असे परमेश्वर म्हणतो. ( वचन १४)* परमेश्वर म्हणतो, मी तुझ्यासाठी केलेल्या सर्व गोष्टींचा तुला विसर पडला. तुला धिक्कार असो!
प्रियांनो, आम्हीही परमेश्वराची वधू आहोत. जे यरूशलेमेबद्दल परमेश्वर बोलत आहे तेच आम्हाला देखील लागू होते. कारण परमेश्वराने मानवाला शुद्ध व पवित्र बनवले होते. परंतु मनुष्य देवाबरोबर एकनिष्ठ राहू शकला नाही. त्याने परमेश्वराच्या आज्ञा मोडून त्याच्या विरोधात वर्तन केले. त्याने देवाऐवजी जगीक सुखाकडे पाहिले. आजच्या विकसित जगामध्ये आर्थिक सुबत्ता, सुखसमृद्धी हाच जीवनाचा प्रमुख उद्देश झालेला दिसून येतो. सुफलतेची मागणी व अपेक्षा, भौतिक मालमत्ता, सुखवस्तू जीवनाची लालसा, गाडी, बंगला, धनसंपत्ती या सर्व गोष्टींची हाव ही देखील मूर्तिपूजाच आहे. आणि आज अनेक लोक देवाबरोबर एकनिष्ठ न राहता, त्याच्याशी बेईमानी करून या मूर्तिपूजेच्या मागे लागलेले दिसून येत आहेत. परंतु असे असले तरी परमेश्वराचे लोक बहकले, वाकड्या वाटेला गेले तरी तो त्यांना दिलेली आपली अभिवचने विसरत नाही. यरूशलेम नकोशी, अस्वच्छ, नग्न, आपल्याच रक्तात पडलेली होती परंतु परमेश्वर म्हणतो, *... तेव्हा मी तुझ्यावर पदर घालून तुझी नग्नता झाकली. ( वचन ८)* पदर घालणे म्हणजे एखाद्या कुमारिकेला विवाहाने आपलीशी करणे, संरक्षण आणि वैवाहिक नातेसंबंधात प्रवेश करणे. ( रूथ ३:९) तसे देवाने तिला आपलीशी करून तिच्या अंगावरचे रक्त, अमंगळपण धुवून स्वच्छ केले. तिला उत्तमोत्तम उंची वस्त्रे नेसवली आहेत. तिच्याबरोबर करार केला.
प्रियांनो, देवाने त्याचे नियम व अभिवचने देऊन आम्हाबरोबरही करार केला आहे. आम्ही विश्वासूपणे त्याच्या आज्ञांचे पालन करावे, त्याच्याबरोबर एकनिष्ठ राहावे अशी त्याची इच्छा आहे. आम्ही जगीक आशीर्वाद मिळविण्यासाठी नाही तर देवापासून मिळणारे आत्मिक आशीर्वाद मिळविण्यासाठी प्रयत्न करावे. कारण जगीक सुखाच्या मागे लागून आम्ही आमच्या जीवनातील "नीतिमत्व, शांती व पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद" ह्यांचा समावेश असलेले देवाचे उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न करीत नाही आणि त्यामुळे आपण देवासोबतची खरी सहभागिता आणि पवित्र आत्म्याचे सामर्थ्य हे गमावून बसतो. म्हणून प्रियांनो, आम्ही परमेश्वराबरोबर एकनिष्ठ राहून त्याच्या आज्ञांचे पालन करावे, त्याची इच्छा पूर्ण करावी. कारण परमेश्वर क्षमा करणारा देव आहे. तो म्हणतो, *"तू जे केलेस त्याची मी क्षमा करीन." ( वचन ६३)*
*"यरुशलेमेच्या उद्ध्वस्त झालेल्या स्थलांनो, आनंदघोष करा, सर्व मिळून गा; कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, त्याने यरुशलेमेस उद्धरिले आहे." ( यशया ५२:९)*
No comments:
Post a Comment