Wednesday, 3 February 2021

संपूर्ण समर्पण



             *✨संपूर्ण समर्पण✨*


*पेत्र त्याला म्हणू लागला, "पाहा, आम्ही सर्व काही सोडून आपल्या मागे आलो आहोत"..✍*

                   *( मार्क १०:२८ )*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


     या अध्यायामध्ये आपण पाहातो की, सार्वकालिक जीवन प्राप्तीसाठी एका श्रीमंत तरूणाने येशूला प्रश्न विचारला तेव्हा सर्व संपत्तीचा त्याग करण्यास प्रभूने त्याला सांगितले. त्याच्याकडे सार्वकालिक जीवन सोडून सर्व काही होते. त्याला ते हवे होते पण ते मिळविण्यासाठी करावा लागणारा त्याग करण्यास तो तयार नव्हता. देवाच्या राज्यासाठी द्यावी लागणारी किंमत किती आहे हे या श्रीमंत माणसाच्या वृत्तांतामधून पाहावयास मिळते. तो मनुष्य प्रीतीस पात्र होता, उत्सुक होता आणि निःसंशय नीतीने चालणारा होता पण किंमत मोजणे किंवा त्याग करणे त्याला जमले नाही. त्याला त्याग करणे न पटल्यामुळे आणि जगातील संपत्ती त्याला अधिक प्रिय असल्यामुळे तो निराश होऊन तेथून निघून गेला. तेव्हा देवाच्या राज्यात श्रीमंतांचा प्रवेश होणे किती कठीण आहे हे येशूने शिष्यांना सांगितले. संपत्ती श्रीमंतांना देवापासून व विश्वासाच्या जीवनापासून दूर खेचण्याचा प्रयत्न करीत असते. पौल म्हणतो, *जे धनवान होऊ पाहतात ते परिक्षेत, पाशात, आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनांत सापडतात. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे मूळ आहे, त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत, आणि त्यांनी स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे. ( १ तीमथ्य ६:९,१०)*


    पेत्राने व इतर शिष्यांनी येशू ख्रिस्ताच्या मागे जाण्यासाठी सर्व काही सोडले होते, त्यागले होते. आणि आता ते सर्व गोष्टींचा पुरवठा करणाऱ्या प्रभूबरोबर होते. त्यांना कसलीही काळजी करण्याची गरज नव्हती. कारण या जगात त्यांच्या सर्व गरजा प्रभू भागविणार होता. आणि त्याबरोबरच त्यांना स्वर्गात संपत्ती मिळणार होती. येशू त्यांना म्हणाला, *कारण ह्या सर्व गोष्टी मिळविण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात, तुम्हाला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. ( मत्तय ६:३२)* संपूर्ण समर्पण स्वाभाविक भक्तीपलीकडचे आहे. आम्ही देवासाठी सर्व सोडले तर देवच आमच्या संपूर्ण परिवाराला कवेत घेऊन आमच्या गरजा पुरवितो. संपूर्ण समर्पण हे आपल्या प्रभूकरिता आणि सुवार्तेकरिता असावे. ते वैयक्तिक लाभाच्या आशेने करू नये. काही मिळेल या आशेने केलेले समर्पण खऱ्या ख्रिस्तीपणाला शोभणारे नाही. देवाबरोबरचे आमचे नाते व्यवस्थित झाले की आपोआपच सर्व गोष्टींचा लाभ आम्हाला होईल. ख्रिस्तासाठी स्वेच्छेने स्वतःला समर्पित करणे हेच खरे संपूर्ण समर्पण आहे. आपण ख्रिस्तासाठी जे काही त्याग केले असतील त्यापेक्षा कितीतरी अधिक आध्यात्मिक फळे आम्हाला प्राप्त होतील.


    आपल्या संपत्तीवर मग ती कोणत्याही प्रकारची असो, भरंवसा ठेवू नये तर देवाच्या  राज्यात आमचा प्रवेश व्हावा यासाठी देवाचे साहाय्य आम्ही मागावे, देवावर आम्ही भरंवसा ठेवावा. आम्ही खरोखर देवाला समर्पित झालेले असू तर तसेच समर्पित राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आमचे संपूर्ण जीवन आम्ही ज्या प्रभूला संपूर्ण समर्पित झालो आहोत त्याच्यामध्ये गुंतलेले असावयास पाहिजे. देवाने स्वतःला सर्वस्वी आम्हाला दिले आहे. *त्याने आपला एकूलता एक पुत्र दिला.* त्यावरून संपूर्ण समर्पण काय असते ते आम्हाला समजते. आम्हीही त्याचप्रकारे आमचे जीवन देवाला समर्पित केले पाहिजे. हातचे काहीही राखून न ठेवता, विनाअट समर्पित झाले पाहिजे. आमचे जीवन संपूर्णपणे परमेश्वराशी एकरूप झालेले असले पाहिजे. जगातील गोष्टींचा, जगिक संपत्तीचा लोभ न धरता वरील, स्वर्गातील गोष्टींकडे आमचे मन लावावे. जगिक नात्यांमध्ये गुंतून पडू नये तर देवाबरोबरचे आध्यात्मिक नाते सांभाळण्याची काळजी घ्यावी. आम्ही आपले जीवन संपूर्णपणे प्रभूला समर्पण करावे. पृथ्वीवरील नाशवंत गोष्टींच्या मागे लागू नये तर स्वर्गात आमच्यासाठी ठेवलेल्या वरील, स्वर्गीय गोष्टी आणि सार्वकालिक जीवन हे मिळविण्यासाठी आम्ही झटून प्रयत्न करावा. प्रभू येशू म्हणतो, *"जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही." ( लूक ९:६२)*


        *

No comments:

Post a Comment