Monday, 22 February 2021

सार्वकालिक निवासस्थान



         *✨सार्वकालिक निवासस्थान✨*


*आमचे पृथ्वीवरील मंडपरूपी गृह मोडून टाकण्यात आले तर देवाने आम्हांसाठी सिद्ध करून ठेवलेले आमचे निवासस्थान स्वर्गात आहे. ते हातांनी बांधलेले गृह नसून सार्वकालिक आहे..✍* 

                  *( २ करिंथ ५:१)*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


      "पृथ्वीवरील मंडपरूपी गृह" हे पृथ्वीवरील आपल्या देहाला किंवा आपल्या जगीक जगण्याला निर्देशित करते, जे क्षणभंगूर आहे. "देवापासून बांधलेले गृह, हे स्वर्गातील एक सार्वकालिक घर आहे, जे मनुष्यांच्या हातांनी बांधलेले नाही." पौल ज्या गौरवाकडे विश्वासाने पाहत होता त्याचे वर्णन तो करत आहे. तो आपल्या शरीराला पृथ्वीवरील मंडपरूपी गृह म्हणत आहे. हे मंडपरूपी गृह मोडून टाकले तरी देवाने आमच्यासाठी ठेवलेले आमचे निवासस्थान स्वर्गात आहे आणि ते सार्वकालिक आहे. म्हणजेच जे पार्थिव आहे ते नाश पावणार आहे त्याऐवजी काही दूसरे प्राप्त होणार आहे ते *सार्वकालिक* आहे. पार्थिव मंडप म्हणजे विश्वासणाऱ्याचा पार्थिव देह आहे आणि जे अविनाशी सार्वकालिक ते दूसरे शरीर म्हणजे विश्वासणाऱ्याचे पुनरूत्थित शरीर आहे. ख्रिस्ती विश्वासणाऱ्याचा मृत्यु हे एक स्थित्यंतर आहे असे पवित्रशास्र सांगते. कारण जरी आम्ही ह्या भूतलावरून गेलो तरी आम्हांस ठाऊक आहे की, स्वर्गात आमच्यासाठी देवापासून मिळालेले एक गृह आहे. ते हातांनी बांधलेले नसून अनंतकालिक असे आहे. आणि *मंडप म्हणजे तात्पुरता निवास.* विश्वासणाऱ्या ख्रिस्ती माणसासाठी मृत्यु म्हणजे मंडपातून पक्क्या इमारतीमध्ये जाण्याचे स्थित्यंतर आहे. ह्या जगात आपण यात्रेकरू किंबहुना निर्वासित असे आहोत. आमचा पृथ्वीवरील निवास हा एका कमकुवत तंबूसदृश्य घरात असतो. तो निरनिराळ्या रोगांनी, वेदनांनी व जोखीमांनी व्याप्त असतो. आणि ख्रिस्ती विश्वासणाऱ्याच्या दृष्टीकोनातून मृत्यु हा या जगातील सर्व त्रास, दुःख, कष्ट, सर्व संकटांतून व बंधनांतून बाहेर काढितो. वचन सांगते की, *प्रभूमध्ये मरणारे आतांपासून धन्य आहेत. आत्मा म्हणतो, खरेच, आपल्या कष्टांपासून सुटून त्यांना विसावा मिळेल, त्यांची कृत्ये तर त्यांच्याबरोबर जातात. ( प्रकटी १४:१३)*      

     प्रेषित पौल म्हणतो की, *आम्ही धैर्य धरितो, आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे हे आम्हांस अधिक बरे वाटते. ( २ करिंथ ५:८)* शरीरात वस्ती करत असताना देव आमच्या  डोळ्यांना दिसत नाही, या देहाच्या नेत्रांनी त्याला आम्हाला पाहाता येत नाही. या अर्थाने आम्ही प्रभूपासून दूर आहोत आणि केवळ विश्वासाने त्याच्याकडे जाता येते. परंतु शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे या स्थितीत मात्र प्रभूला आपल्या नेत्रांनी पाहाता येते. आता विश्वासाने त्याला पाहण्याची गरज उरली नाही.

    आपल्या पार्थिव देहामध्ये आपल्याला वाहावी लागणारी ओझी आणि भार, दडपणे यांच्यापासून मोकळीक मिळावी अशी उत्कंठा पौलाला लागली आहे. पुनरूत्थित देहातील जीवनाचा अनुभव घेण्यास तो आतुर झाला आहे. तो म्हणतो, *"वस्र काढून टाकावे अशी आमची इच्छा आहे असे नाही, तर ते परिधान करावे अशी इच्छा बाळगतो, ह्यासाठी की, जे मर्त्य आहे ते जीवनाच्या योगे ग्रासले जावे." ( वचन ४)*  प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताद्वारेच अनंतकालिक जीवन लाभते आणि त्या जीवनाचा मार्गही तोच आहे. वचन सांगते, *जो पुत्रावर विश्वास ठेवितो त्याला सार्वकालिक जीवन आहे, परंतु जो पुत्राला मानीत नाही, त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही. ( योहान ३:३६)* जेव्हा ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा मृत्यु पावतो तेव्हा तो थेट ख्रिस्ताच्या सान्निध्यामध्ये म्हणजे स्वर्गामध्ये देवाच्या समवेत अनंतकाळाकरिता राहावयास जातो. जो अविश्वासणारा असतो, तो देवापासून दूर केला जातो. आम्ही कोठे जाऊ इच्छितो ? आम्ही आमचे जीवन ख्रिस्ताला दिले आहे का ? आमचा नवीन जन्म झाला आहे का ? आजच आपले जीवन प्रभूला समर्पित करू या, आणि देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे आपले जीवन पूर्णपणे बदलल्याचा, ख्रिस्तामध्ये नवीन जन्माचा अनुभव घेऊ या. आणि मृत्युनंतरही प्रभूच्या ठायी असलेले आणि प्रभू आपल्याला ते देऊ करत असलेले स्वर्गातील सार्वकालिक निवासस्थान म्हणजेच सार्वकालिक जीवन प्राप्त करून घेऊ या.


*जरी आमचा पार्थिव देह नष्ट केला जाईल, तरी त्याची भरपाई व्हावी म्हणून परमेश्वराने आमच्यासाठी पुनरूत्थित देहाची तरतूद आधीच करून ठेवली आहे.*


          

No comments:

Post a Comment