Sunday, 7 February 2021

सुवार्ता



*आमची निंदा होत असता आम्ही मनधरणी करितो, आम्ही जगाचा गाळ, सर्वांची खरवड असे आजपर्यंत झालो आहों..✍*

               *( १ करिंथ ४:१३ )*


                        *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


     प्रेषित पौलाचे हे शब्द अतिशयोक्ती नाहीत तर अगदी खरोखरच सुवार्तेच्या सेवकांचे जीवन असेच होते आणि आजही कित्येकांचे तसेच आहे. निंदा होत असताना.... आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचीही खूप निंदा करण्यात आली पण त्याने सर्व काही सौम्यपणे सहन केले. वचन सांगते की जेव्हा लोक तुमची निंदा, छळ करतील त्यावेळेस आनंद करा, उल्हास करा.. कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. येशूचा छळ, निंदा होत असताना त्याने आपले तोंड देखील उघडले नाही, लोकर कापणाऱ्यापूढे जसे मेंढरू शांत बसते तसा तो शांत राहिला. येशूने जे आपल्या जीवनात साकारले.. ज्या पद्धतीने येशूने आपल्याला कित्ता घालून दिला.. त्या पद्धतीनेच पौलने आपले जीवन व्यतीत केले, साकारले. तो पूर्ण ख्रिस्ताचा अनुयायी झाला. जसे ख्रिस्ताने सहन केले त्यापेक्षा अधिक संकटे, क्लेश पौलच्या जीवनात आली तरी त्याने सर्व काही ख्रिस्ताप्रमाणे सौम्यपणे सहन केले. त्याने ख्रिस्ताचे अनुकरण केले. जगाचा गाळ... म्हणजे सर्वात हीन, खालचा दर्जा.. स्वतःला पूर्ण रिक्त करणे.. शून्य अवस्थेत येणे. देवाने प्रेषितांना अगदी हीन, निंद्य जागी ठेवले आहे. पौल म्हणतो, *"देवाने आम्हां प्रेषितांना शेवटल्या जागेवरचे आणि मरणास नेमलेल्यांसारखे करून पूढे ठेविले आहे, कारण आम्ही जगाला म्हणजे देवदूतांना व माणसांना जणू तमाशा असे झालो आहों !" ( वचन ९)* पौलाने कधीही, कुठेही स्वतःची प्रौढी गाजवली नाही किंवा बढाई मारली नाही. वचनात लिहिल्याप्रमाणे त्याने स्वतःला जगाचा गाळ असे लेखिले. आज हा स्वभाव किती सेवकांच्या जीवनात दिसून येतो ? किती विश्वासणाऱ्यांच्या जीवनात दिसून येतो ? पौल म्हणतो, *तुम्हांसाठी जी माझी दुःखे त्यांमध्ये मी आनंद करितो, आणि ख्रिस्ताच्या क्लेशांतले जे उरले आहे ते मी आपल्या देहाने, त्याचे शरीर जी मंडळी तिच्यासाठी भरून काढीत आहे. ( कलस्सै १:२४)* प्रेषितांवर लादलेल्या मानखंडना, निंदा, अप्रतिष्ठा यांवर त्यांचा प्रतिसाद एकच होता, तो म्हणजे सर्व काही सहन करणे आणि कोणी निर्भत्सना केली, शिव्याशाप दिले तरीही आशीर्वादानेच त्यांना प्रत्युत्तर देणे. म्हणजेच स्वतःला अगदी हीन, तुच्छ समजणे. हाच परमेश्वराने आम्हाला इतरांपासून वेगळे केल्याचा आणि पवित्रीकरणाचा पुरावा आहे.

     देवाच्या सुवार्तेच्या सत्यतेसाठी रक्तसाक्षी होण्यास येशू ख्रिस्ताचा खरा सेवक सदैव मोठ्या आनंदाने तयार असतो. आम्ही स्वतःच्या इच्छा आणि वासना यांच्याकडे लक्ष न देता देवाने आम्हाला पवित्र केलेले, निवडलेले आहे, सुवार्तेकरिता वेगळे केलेले असे आहे हे समजून घेतले पाहिजे आणि त्याप्रमाणे आचरण केले पाहिजे. *"मला जगाचा गाळसाळ समजले तरी हरकत नाही परंतु सुवार्तेची घोषणा होणे खूप महत्वाचे आहे."* आमच्यावर तिरस्काराने, अनीतीे, बेईमानी, खोटेपणा असे आरोप केले तरी आपण आरोप करणाऱ्याकडे लक्ष देऊ नये तर देवाबरोबर अधिकाधिक वाढत राहावे. आणि देवाच्या तारणदायी सत्यतेचे अद्भूत रहस्य समजून घेतले पाहिजे. अतिशय दीन आणि अधम अपराध्यांवरही तो अथांग प्रीती करतो. माझ्यामधून एक उत्तम नव्या नवलाचा माणूस निर्माण करावा यासाठी नव्हे तर आपल्या पुत्राला माझ्याठायी प्रगट करावे असे पौल म्हणतो. तो म्हणतो, *तरी ज्या देवाने मला 'माझ्या मातेच्या उदरातून' जन्मल्यापासून वेगळे केले व आपल्या कृपेने 'बोलाविले', त्याला आपल्या पुत्राला माझ्या ठायी प्रगट करणे बरे वाटले, अशासाठी की, मी परराष्ट्रीयांमध्ये त्याच्या सुवार्तेची घोषणा करावी. ( गलती १:१६)* आणि आपण पाहातो की पौलाने शेवटपर्यंत सुवार्तेची घोषणा केली. आणि देवाचे त्याला सोपवून दिलेले कार्य पूर्ण केले. प्रियांनो, आम्ही देखील आम्हाला प्रभूने सोपविलेले त्याच्या सुवार्तेचे, त्याच्या राज्याची घोषणा करण्याचे कार्य करत राहावे. ख्रिस्ताप्रमाणे आणि पौलाप्रमाणे स्वतःला पूर्ण रिक्त करून, स्वतःला जगाचा गाळ असे तुच्छ समजून सौम्यपणे सर्व सहन करीत देवाने सोपविलेले कार्य आम्ही करीत राहावे.


   

No comments:

Post a Comment