*✨परमेश्वराची समक्षता✨*
*मी वर आकाशात चढलो तरी तेथे तूं आहेस, अधोलोकी मी आपले अंथरूण केले तरी पाहा, तेथे तूं आहेस..✍*
*( स्तोत्र १३९:८)*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
परमेश्वर सदैव त्याच्या लेकरांची काळजी घेत असतो. सदैव तो त्यांच्याबरोबर असतो. त्याला अत्यंत प्रिय असणाऱ्या लेकरांकडे त्याचे नेत्र सदोदित लागलेले असतात. स्तोत्रकर्ता म्हणतो की, *माझे बसणे व उठणे तू जाणतोस, तूं दुरून माझे मनोगत समजतोस, तूं माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहातोस, आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे. ( स्तोत्र १३९:२,३)* खरोखरच परमेश्वराला आपला सर्व वर्तनक्रम अवगत आहे. माझ्या जीवनातील एक साक्ष आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी सैतानाने बहकविल्यामुळे परमेश्वरापासून मी दूर चालले होते.संकटांना, अडचणींना कंटाळून देवापासून दूर जाणार होते. परंतु खूप वाईट वाटत होते त्यामुळे खूप मोठ्याने देवाचा धावा करीत होते, देवाला हाक मारीत होते, त्याच्याकडे क्षमा मागत होते, मी काय करू ते सूचव, माझ्याबरोबर बोल, मला योग्य मार्गदर्शन कर अशी अखंड विनवणी करीत होते आणि.. प्रभूचे माझ्याकडे लक्ष होते. कारण त्याला माहीत होते की हे माझेच लेकरू आहे, आणि त्याने माझा धावा ऐकला आणि अद्भूत रितीने त्या दिवशी त्याने मला त्या संकटातून वाचविले. त्याच्यापासून दूर जाण्यापासून रोखले. मला तारिले.
प्रियांनो, खरोखरच देव आमच्यापासून कधीच दूर नसतो. फक्त आपल्या हाकेची तो वाट पाहात असतो. तो म्हणतो, *मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल. ( यिर्मया ३३:३)* आणि खरोखरच तो आपल्यासाठी धावून येतो, तो आपल्याबरोबर बोलतो, आपण कोणत्या मार्गाने जावे हे तो सुचवितो. आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे त्याला माहीत आहे. पौल म्हणतो, *अहाहा ! देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे ! त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत ! ( रोम ११:३३)* निश्चितच पौल म्हणतो ते यथार्थ आहे. कारण त्याच्या दृष्टीपासून काहीएक लपून राहू शकत नाही. त्याचे नेत्र सर्वत्र आहेत. आणि ते प्रत्येकाला अजमावत आहेत. असे लिहिले आहे की, *परमेश्वर सर्वांची मने पारखितो आणि त्यात जे काही विचार व कल्पना उत्पन्न होतात त्या त्यांस समजतात. ( १ इतिहास २८:९)*
मनुष्य देवाच्या समक्षतेपासून कोठे जाऊ शकतो ? कारण परमेश्वर प्रत्येक ठिकाणी आपल्याबरोबर राहतो. त्याला माहीत नाही अशी एकही गोष्ट नाही, *कारण देवाची दृष्टी प्रत्येकाच्या आचरणावर असते, त्याचे प्रत्येक पाऊल तो पाहतो. ( ईयोब ३४:२१)* देवाला सर्वच, प्रत्येक गोष्ट माहीत आहे. तो तुम्हाला आणि मला अगदी पूर्णपणे, अंतर्बाह्य ओळखतो. आमच्यावर येणारा प्रत्येक प्रसंग, दुःख, संकटे, मोह हे सर्व तो जाणतो आणि आमच्या मदतीसाठी धावून येतो. आम्हाला सर्व वाईट गोष्टींपासून दूर ठेवतो, राखितो. इतकेच नाही तर आमच्या भावी जीवनाविषयीही तो जाणतो. तो म्हणतो की, *मी आरंभीच शेवट कळवितो, होणाऱ्या गोष्टी घडविण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे. (यशया ४६:१०)* म्हणून प्रियांनो, आपण परमेश्वरापासून काही लपवून ठेवू शकत नाही. तर त्याला आपल्या अडचणी, आपले मनोगत सांगू या, आणि त्याने दाखविलेल्या मार्गाने मार्गक्रमण करू या. त्याला हाक मारू या. म्हणजे तो आपल्यासाठी धावून येईल आणि आपल्याला आपल्या सर्व संकटांतून सोडविल. आपल्याला योग्य मार्ग दाखवून कोणत्या मार्गाने आम्ही चालावे ह्यासाठी मार्गदर्शन करीन.
No comments:
Post a Comment