*✨परमेश्वराला अनुसरून चाला✨*
*कारण हा देव आमचा सनातन देव आहे, तो सर्वकाळ आमचा मार्गदर्शक होईल..✍*
*(स्तोत्र ४८:१४)*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
ह्या सुंदर वचनाद्वारे आपण पाहातो की, परमेश्वर खरोखरच आमचे मार्गदर्शन करतो. पण कधी ? आपण त्याचे ऐकले नाही तर तो आपल्याला मार्गदर्शन करणार नाही किंवा आपले साहाय्य करणार नाही. परंतु जे त्याच्या मार्गाने चालतात त्यांना मात्र तो खूप आशीर्वादित करतो. स्तोत्रकर्ता म्हणतो, *हे परमेश्वरा, तुझे मार्ग मला दाखीव, तुझ्या वाटा मला प्रगट कर. ( स्तोत्र २५:४)* होय प्रियांनो, आपणही परमेश्वराजवळ हीच विनंती केली पाहिजे. खरा विश्वासणारा त्याच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराला प्रथम स्थान देतो, त्याला अनुसरण्यास तो नेहमीच तयार असतो. आणि त्यासाठी तो परमेश्वराचे मार्ग, परमेश्वराच्या वाटा जाणून घेण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. आम्ही जे करावे अशी देवाची आमच्याकडून इच्छा असते, ते करण्यासाठी आपण आपले सर्व सामर्थ्य खर्च करावे. आपल्याला बऱ्याच वेळा असे वाटते की माझ्याच शहाणपणाने किंवा माझ्याच शक्तीने मी सर्व चांगल्या गोष्टी करीत आहे परंतु देवाच्या साहाय्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही, म्हणून देवाच्या मार्गदर्शनाने आपण चालावे. त्याच्या हाताखाली आपण लीन आणि नम्र व्हावे. पापांबद्दल पश्चाताप करून, आपल्या पापांची जबाबदारी स्वीकारून ते सोडून द्यावेत. म्हणजे परमेश्वर आपल्या पापांची क्षमा करून आपल्याला सर्व प्रकारचे साहाय्य करील.आपण वाइटाला धरून बसलेले आणि चांगुलपणाचा केवळ मुखवटा धारण केलेले असे नसावे. देव मनुष्याच्या पापांचा तिटकारा करतो परंतु तो त्याच्यावर प्रेमही करतो.
म्हणून प्रियांनो, जोवर जीवन आहे तोवर आशा आहे. मनुष्याने आपली पापे कबूल करून सोडून द्यावीत, पश्चाताप करून देवाच्या मार्गदर्शनाने चालावे, म्हणजे तो त्याचे विधी पाळणाऱ्यांना मार्ग दाखवतो, त्यांना हाती धरितो. स्तोत्रकर्ता म्हणतो की, *तो नम्र जनांना न्यायपथाला लावतो. तो दीनांना आपला मार्ग शिकवितो. ( स्तोत्र २५:९)* त्याच्या मार्गाने चालणारे विश्वासू लोक सदैव त्याची आठवण ठेवतात, आणि त्याला न आवडणाऱ्या गोष्टी ते करीत नाही. आपण देवाकडे वळलो तर तो आपले पाय जाळ्यांतून सोडवील. स्तोत्रकर्ता म्हणतो, *माझे नेत्र परमेश्वराकडे नित्य लागले आहेत, म्हणून तो माझे पाय जाळ्यातून सोडवील. ( स्तोत्र २५:१५)* आम्ही आमचे नेत्र आमच्या उत्पन्नकर्त्याकडे लावले तर तो जगातील सर्व प्रकारच्या मोहपाशांपासून आपल्याला सोडवील आणि देवाची सेवा करण्यासाठी आपल्याला मुक्त करील, स्वतंत्र करील. अशा आशीर्वादित माणसाबद्दल लिहिले आहे की, *तुझा प्रकाश अंधकारात झळकेल, निबिड अंधकार तुला मध्यान्हाचे तेज असा होईल. (यशया ५८:१०)* होय प्रियांनो, आमच्या आजूबाजूला कितीही दुःख, नैराश्य, संकटे, अंधकार, अशांतता असली तरी आम्ही आनंदी आणि देवाच्या छत्रछायेखाली सुरक्षित असे असू. आपल्याला परमेश्वराचे मार्ग समजतील व आपण त्याच्याच मार्गाने चालू. तो म्हणतो, *परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल, तो अवर्षणसमयी तुझ्या जिवास तृप्त करील, तुझ्या हाडांना मजबूत करीन. (यशया ५८:११)* आपले चांगले पोषण व्हावे म्हणून तो अवर्षणसमयी सुद्धा आपल्याला सर्व चांगल्या गोष्टींचा पुरवठा करून आम्हाला तृप्त करील आणि आपली हाडे मजबूत करील. कमकुवत हाडे असतील तर माणसाचे मन आणि शरीर दोन्हीही खंगत जातात, परंतु देव आपल्याला बलवान करीत आहे. आमच्या शरीरासाठी पोषक असणारे अन्न देऊन आम्हाला आशीर्वादित करीत आहे. आमच्या आध्यात्मिक उन्नत्तीसाठी आम्हाला साहाय्य करीत आहे.
परमेश्वराच्या मार्गदर्शनाने चालणाऱ्या माणसाचे जीवन, *भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे आणि पाणी कधीच न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे होईल. ( यशया ५८:११)* म्हणजेच आपल्याला नवजीवन मिळून आपली चांगली जोपासना, चांगली वाढ, उन्नत्ती होईल. आणि आपण विपुल फळ देणारे असे होऊ. म्हणून प्रियांनो, देवच आपल्याला मार्ग दाखवितो, त्याच्या मार्गदर्शनाशिवाय, त्याच्या सामर्थ्याशिवाय आणि त्याच्या साहाय्याशिवाय आपण बलहीन आहो, हे आपण ओळखावे आणि त्याच्याच मार्गाने चालावे. आपण नेहमी नम्र व आज्ञाधारक असावे. देवाच्या इच्छेप्रमाणे सदाचरण करावे म्हणजे तो आपल्याला आशीर्वादित करील.
No comments:
Post a Comment