Tuesday, 5 January 2021

माझी मेंढरे चार



                *✨माझी मेंढरे चार✨*


*"योहानाच्या पुत्रा शिमोना, ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीति करितोस काय ?" तो म्हणाला, "होय, प्रभू, आपणांवर मी प्रेम करितो, हे आपणांला ठाऊक आहे"..✍*

                 *( योहान २१:१५)*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


     बायबल मध्ये आपण पाहातो, ख्रिस्तासाठी प्राण देईन असे म्हणणाऱ्या पेत्राने ख्रिस्ताने आधीच सांगितल्याप्रमाणे ख्रिस्ताला धरून नेले तेव्हा तीन वेळा सर्व लोकांसमोर त्याला नाकारले होते. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला क्षमा केली होती. आणि त्याने जसे तीन वेळा नाकारिले तसेच त्याच्याकडून त्याला तीन वेळा हे विचारले की *तू माझ्यावर प्रीति करितोस काय ?* असे विचारून त्याच्याकडून तीन वेळा आपला स्वीकार करण्याची संधी दिली आणि त्याला पुन्हा आपली सेवा करण्याचा हक्क बहाल केला. ह्यावरून दिसून येते की, ख्रिस्ताला त्याची सेवा करण्यासाठी जे सेवक हवे आहेत ते त्याच्यावर प्रीति करणारे असावेत अशी त्याची इच्छा होती. कारण जो त्याच्यावर प्रीति करतो तो त्याची सेवा मनापासून आणि आनंदाने करतो. करावी लागत आहे म्हणून करतो असे नाही. पेत्र आपल्या पत्रामध्ये सांगतो की, *तुम्हांमधील देवाच्या कळपाचे पालन करा, करावे लागते म्हणून नव्हे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा; द्रव्यलोभाने नव्हे तर उत्सुकतेने करा; तुमच्या हाती सोपविलेल्या लोकांवर धनीपण करणारे असे नव्हे, तर कळपाला कित्ते व्हा; ( १ पेत्र ५:२,३)* आपण पाहातो की, येशूच्या स्वर्गारोहणानंतर पेत्राने ख्रिस्ताची आनंदाने, आवेशाने आणि मनापासून सेवा केली. 


   *माझ्यावर प्रीति करितोस काय ?* प्रभू येशू ख्रिस्ताने तिथे उपस्थित असलेल्या सर्व शिष्यांसमोर पेत्राला असे विचारून त्याला त्याच्या दुर्बलतेची जाणीव तो करून देत आहे, आणि त्याला सेवेसाठी विश्वासामध्ये स्थिर व अढळ राहण्यासाठी तयार करीत आहे. आपण पाहातो की, पेत्र नेहमीच पुढाकार घेत असे आणि इतरांच्या वतीनेही बोलत असे. तो भित्रा होता, उतावळा होता तरीही पूढे त्याने खूप आवेशाने प्रभूची सेवा केली, पेन्टेकॉस्टच्या वेळी त्याच्या पहिल्याच भाषणामुळे तीन हजार लोकांची भर त्यांच्यामध्ये पडली. प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राला खूप मोठी जबाबदारी दिली होती आणि त्यासाठी म्हणजेच प्रभूच्या सेवेसाठी ख्रिस्तावरील विश्वास आणि सखोल प्रीतीची गरज होती. म्हणूनच प्रभूने त्याच्याकडून त्याच्या प्रभूवरील प्रीतीबद्दल तीन वेळा म्हणवून घेतले. कारण *पेत्र प्रेमळ मेंढपाळ होणार होता.* मेंढरांना व कोकरांना चारणे व पाळणे हे काम त्याला करावयाचे होते. मेंढपाळ स्थिर व भरवशाचा असावा. देवाचे लोक हेच देवाच्या कळपातील मेंढरे व कोकरे होय. त्यांचे योग्य प्रकारे पालन पोषण करावे म्हणून प्रभूने पेत्राला निवडले होते. आणि पेत्राने ही निवड सार्थ करून दाखवलेली आपण पाहातो.


    प्रिय देवाच्या लेकरा, आज प्रभु येशूची वाणी तुला हाक मारीत आहे. आज तो तुला विचारत आहे. *'तू माझ्यावर प्रीति करितोस काय ?'* ख्रिस्तावर प्रेम करणाऱ्यांसाठी हा येशूचा प्रश्न आहे. देवाच्या प्रिय लेकरा तू तयार आहेस का ? पेत्र भित्रा होता, पण येशूची त्याच्यावर प्रीति होती. येशूच्या या प्रीतीने त्याला सामर्थ्य प्राप्त झाले. भित्र्या पेत्राने संपूर्ण जगाला हलविले.. तेच प्रेम येशू तुझ्यावर करत आहे. त्याची प्रीति तुला सामर्थ्य देईल. प्रभूची सेवा करण्यासाठी तू तयार आहेस का ?


*ख्रिस्तावर प्रीति नसेल तर मेंढपाळ होता येत नाही.*


     

No comments:

Post a Comment