Monday, 28 December 2020

उत्तर दिशेकडे वळा



          *✨उत्तर दिशेकडे वळा✨*


*"तुम्ही ह्या डोंगराभोवती पुष्कळ दिवस फिरत राहिलां आहां; आता उत्तरेकडे वळा;"..✍🏼*

                  *( अनुवाद २:३ )*


                           *...मनन...*


           *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!* 


      इस्राएल लोकांनी तांबडा समुद्र पार करून अरण्यात प्रवास केला. तेव्हा अनेक दिवस ते सेईर प्रदेशातून तेथील डोंगर भागात फिरत राहिले होते. आपण पाहातो की अरण्यात असताना परमेश्वराने त्यांची प्रत्येक गरज पूर्ण केली होती. देवदूतांचे अन्न म्हणजेच स्वर्गीय मान्ना त्यांना देवाने खावयास देऊन त्यांना तृप्त केले. वचन सांगते की, त्यांचे वस्त्र कधी जूने झाले नाहीत किंवा जीर्ण झाले नाहीत, इतका दूरचा प्रवास करत असतानाही त्यांचे पाय देखील कधी सूजले नाहीत, त्यांच्या चपला झिजल्या नाहीत. इतकेच केवळ नाही तर अगदी त्यांनी मांस खाण्यासाठी कुरकुर केली तर ती देखील त्यांची इच्छा परमेश्वराने पूर्ण केली. कारण परमेश्वर त्यांच्यावर प्रेम करीत होता. परंतु आपण पाहातो की, त्या इस्त्राएल लोकांपैकी कित्येक लोकांनी परमेश्वराचे भय धरले नाही. त्यांनी कधी परमेश्वराला धन्यवाद दिला नाही. कित्येक लोकांवर परमेश्वराचा कोप भडकून त्याने अग्नीने त्यांचा नाश केलेला देखील आपण वाचतो. 


    होय प्रियांनो, या वर्षात प्रभूने कशाप्रकारे तुम्हाला चालवले याची आठवण करा. कशाप्रकारे प्रभूने आम्हाला सांभाळले त्याची आठवण करा. कोरोनासारख्या महारोगातून त्याने आम्हाला सुरक्षित ठेवले. अनेक वेळा संकटे आली, वादळ वारे आले, महापूर आला... परंतु आपला विश्वासयोग्य परमेश्वर सदोदित  आपल्या बरोबर होता. त्याने सर्व काही शांत केले. या कठीण परिस्थितीमध्ये देखील अजूनही त्या इस्त्राएल लोकांसारखे आजचे काही विश्वासणारे दिसून येतात. ते मनापासून परमेश्वराचे भय बाळगीत नाही, त्याचा धन्यवाद करीत नाही, आपल्या जीवनात प्रभूला प्रथम स्थान देत नाही. याउलट आज अनेक लोक स्वतःच्याच उदोउदो करताना दिसून येतात. ते स्वतःचे प्रदर्शन करीत आहेत. आणि ज्या देवाने, ज्या प्रभू येशूने तुम्हाला आम्हाला सुरक्षित ठेवले, सुखरूप ठेवले त्याचा महिमा करताना, स्तुती करताना दिसत नाहीत. प्रवासात प्रभूने वाचवले. कामाच्या ठिकाणी, येतांना जातांना सुरक्षित ठेवले, घरातील काम करीत असताना आपल्या सर्व बहिणींना सांभाळले. आजार, कष्ट, दुःख यात प्रभूने अधिक कृपा दिली. आम्हालाच केवळ सांभाळले असे नाही तर आपली आई,वडील, बहीण, भाऊ, पती पत्नी, मुले, इतर आप्त या सर्वांनाही प्रभूने मोठ्या करुणेने सांभाळले. प्रियांनो, परमेश्वराने अजून आपल्यासाठी काय करायला हवे ? प्रियांनो, प्रभूला सर्व गोष्टींसाठी मनापासून धन्यवाद द्या. त्याची उपकारस्तुती करा.


    पूढे वचनात आपण पाहातो की, आता परमेश्वराची इच्छा आहे की आपण उत्तरेकडे वळावे.. होय उत्तर दिशेलाच आपले उत्तर आहे. का आपल्याला उत्तर दिशेला वळायचे आहे ? काय आहे उत्तर दिशेला ? प्रियांनो, कारण उत्तर दिशेकडून एक सुवर्णज्योत आपल्याकडे येत आहे. तो महान गौरव आपल्याकडे येत आहे, ते पवित्र तेज आपल्याकडे येत आहे. मोशे परमेश्वराला भेटण्यासाठी जेव्हा पर्वतावर जात असे, जेव्हा तो परत येई तेव्हा त्याचे मुख त्या सुवर्ण तेजाने भरलेले असे. आज त्या तेजाची आपल्याला गरज आहे. ते तेज आपल्यातील अंधकार दूर करील. ते तेज आपल्यातील दुष्ट विचार नष्ट करील. ते तेज तुम्हाला आणि मला प्रकाशित करील. वचन वाचू या.. *उत्तर दिशेकडून सुवर्णप्रभा येते, देव भयजनक तेजाने मंडित आहे. ( ईयोब ३७:२२)* 


    होय प्रियांनो, चला आपण उत्तरेकडे जाऊ या. आपला परमेश्वर भयजनक तेजाने, महिम्याने भरलेला आहे. ही सुवर्णप्रभा येते कोठून ? असे आहे तरी काय उत्तर दिशेकडे ? सूर्याच्या किरणांपेक्षाही तेजस्वी किरणे आहेत ही. संपूर्ण शरीर नाही तर आत्मा, प्राण, शरीर तेजस्वी करणारी ही सुवर्णप्रभा आहे. हीच सुवर्णप्रभा आपल्याला पूर्ण पवित्र, शुद्ध करीत आहे. कशासाठी पवित्र करत आहे ? प्रभूच्या राज्यासाठी, सार्वकालिक जीवनासाठी. उत्तर दिशेला कोण आहेत ? आपण बघूया... स्तोत्रकर्ता म्हणतो, *उत्तर सीमेवरील सीयोन डोंगर, राजाधिराजाचे नगर, उच्चतेमुळे सुंदर व सर्व पृथ्वीचा आनंद आहे. ( स्तोत्र ४८:२)* किती सुंदर !! उत्तर दिशेकडे सीयोन डोंगर आहे.. जे आपल्या देवाचे नगर आहे... होय प्रियांनो, सीयोन डोंगराकडे त्या उत्तर दिशेकडे जाऊ या. या संपूर्ण वर्षात अनेक वेळा आपण प्रभूपासून दूर गेलो असू, पण आता प्रभू येशूचे आगमन जवळ आले आहे. आज पूर्ण मनाने आपण एक निश्चय करू या आणि प्रभूला आमच्या जीवनात प्रथम स्थान देऊया. तेव्हाच त्याचा महिमा, त्याचे तेज आपल्यावर पडेल आणि येशूच्या आगमनात आपण उचलले जाऊ.


         

No comments:

Post a Comment