Monday, 22 February 2021

सार्वकालिक निवासस्थान



         *✨सार्वकालिक निवासस्थान✨*


*आमचे पृथ्वीवरील मंडपरूपी गृह मोडून टाकण्यात आले तर देवाने आम्हांसाठी सिद्ध करून ठेवलेले आमचे निवासस्थान स्वर्गात आहे. ते हातांनी बांधलेले गृह नसून सार्वकालिक आहे..✍* 

                  *( २ करिंथ ५:१)*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


      "पृथ्वीवरील मंडपरूपी गृह" हे पृथ्वीवरील आपल्या देहाला किंवा आपल्या जगीक जगण्याला निर्देशित करते, जे क्षणभंगूर आहे. "देवापासून बांधलेले गृह, हे स्वर्गातील एक सार्वकालिक घर आहे, जे मनुष्यांच्या हातांनी बांधलेले नाही." पौल ज्या गौरवाकडे विश्वासाने पाहत होता त्याचे वर्णन तो करत आहे. तो आपल्या शरीराला पृथ्वीवरील मंडपरूपी गृह म्हणत आहे. हे मंडपरूपी गृह मोडून टाकले तरी देवाने आमच्यासाठी ठेवलेले आमचे निवासस्थान स्वर्गात आहे आणि ते सार्वकालिक आहे. म्हणजेच जे पार्थिव आहे ते नाश पावणार आहे त्याऐवजी काही दूसरे प्राप्त होणार आहे ते *सार्वकालिक* आहे. पार्थिव मंडप म्हणजे विश्वासणाऱ्याचा पार्थिव देह आहे आणि जे अविनाशी सार्वकालिक ते दूसरे शरीर म्हणजे विश्वासणाऱ्याचे पुनरूत्थित शरीर आहे. ख्रिस्ती विश्वासणाऱ्याचा मृत्यु हे एक स्थित्यंतर आहे असे पवित्रशास्र सांगते. कारण जरी आम्ही ह्या भूतलावरून गेलो तरी आम्हांस ठाऊक आहे की, स्वर्गात आमच्यासाठी देवापासून मिळालेले एक गृह आहे. ते हातांनी बांधलेले नसून अनंतकालिक असे आहे. आणि *मंडप म्हणजे तात्पुरता निवास.* विश्वासणाऱ्या ख्रिस्ती माणसासाठी मृत्यु म्हणजे मंडपातून पक्क्या इमारतीमध्ये जाण्याचे स्थित्यंतर आहे. ह्या जगात आपण यात्रेकरू किंबहुना निर्वासित असे आहोत. आमचा पृथ्वीवरील निवास हा एका कमकुवत तंबूसदृश्य घरात असतो. तो निरनिराळ्या रोगांनी, वेदनांनी व जोखीमांनी व्याप्त असतो. आणि ख्रिस्ती विश्वासणाऱ्याच्या दृष्टीकोनातून मृत्यु हा या जगातील सर्व त्रास, दुःख, कष्ट, सर्व संकटांतून व बंधनांतून बाहेर काढितो. वचन सांगते की, *प्रभूमध्ये मरणारे आतांपासून धन्य आहेत. आत्मा म्हणतो, खरेच, आपल्या कष्टांपासून सुटून त्यांना विसावा मिळेल, त्यांची कृत्ये तर त्यांच्याबरोबर जातात. ( प्रकटी १४:१३)*      

     प्रेषित पौल म्हणतो की, *आम्ही धैर्य धरितो, आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे हे आम्हांस अधिक बरे वाटते. ( २ करिंथ ५:८)* शरीरात वस्ती करत असताना देव आमच्या  डोळ्यांना दिसत नाही, या देहाच्या नेत्रांनी त्याला आम्हाला पाहाता येत नाही. या अर्थाने आम्ही प्रभूपासून दूर आहोत आणि केवळ विश्वासाने त्याच्याकडे जाता येते. परंतु शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे या स्थितीत मात्र प्रभूला आपल्या नेत्रांनी पाहाता येते. आता विश्वासाने त्याला पाहण्याची गरज उरली नाही.

    आपल्या पार्थिव देहामध्ये आपल्याला वाहावी लागणारी ओझी आणि भार, दडपणे यांच्यापासून मोकळीक मिळावी अशी उत्कंठा पौलाला लागली आहे. पुनरूत्थित देहातील जीवनाचा अनुभव घेण्यास तो आतुर झाला आहे. तो म्हणतो, *"वस्र काढून टाकावे अशी आमची इच्छा आहे असे नाही, तर ते परिधान करावे अशी इच्छा बाळगतो, ह्यासाठी की, जे मर्त्य आहे ते जीवनाच्या योगे ग्रासले जावे." ( वचन ४)*  प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताद्वारेच अनंतकालिक जीवन लाभते आणि त्या जीवनाचा मार्गही तोच आहे. वचन सांगते, *जो पुत्रावर विश्वास ठेवितो त्याला सार्वकालिक जीवन आहे, परंतु जो पुत्राला मानीत नाही, त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही. ( योहान ३:३६)* जेव्हा ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा मृत्यु पावतो तेव्हा तो थेट ख्रिस्ताच्या सान्निध्यामध्ये म्हणजे स्वर्गामध्ये देवाच्या समवेत अनंतकाळाकरिता राहावयास जातो. जो अविश्वासणारा असतो, तो देवापासून दूर केला जातो. आम्ही कोठे जाऊ इच्छितो ? आम्ही आमचे जीवन ख्रिस्ताला दिले आहे का ? आमचा नवीन जन्म झाला आहे का ? आजच आपले जीवन प्रभूला समर्पित करू या, आणि देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे आपले जीवन पूर्णपणे बदलल्याचा, ख्रिस्तामध्ये नवीन जन्माचा अनुभव घेऊ या. आणि मृत्युनंतरही प्रभूच्या ठायी असलेले आणि प्रभू आपल्याला ते देऊ करत असलेले स्वर्गातील सार्वकालिक निवासस्थान म्हणजेच सार्वकालिक जीवन प्राप्त करून घेऊ या.


*जरी आमचा पार्थिव देह नष्ट केला जाईल, तरी त्याची भरपाई व्हावी म्हणून परमेश्वराने आमच्यासाठी पुनरूत्थित देहाची तरतूद आधीच करून ठेवली आहे.*


          

Friday, 19 February 2021

ईस्टर संडे काय??

💝  ईस्टर संडे काय???  💝


🔴*लेंत, उपासकाळ, राख लावणे, अंडे, ससे - पगन संस्कृती - पवित्र बायबल नुसार अयोग्य आहे.*

          प्रियांनो वचन सांगते, *नोहाचे तीन मुले शेम, हाम आणि याफेथ. हामाला कुश झाला, कूशाला निम्रोद झाला;* तो पृथ्वीवर महारथी होऊ लागला.  तो *परमेश्वरासमोर* बलवान पारधी झाला, म्हणून ‘निम्रोदासारखा *परमेश्वरासमोर* बलवान पारधी’ असे म्हणण्याचा प्रघात आहे.  शिनार देशात बाबेल, एरक, अक्काद व कालने ही त्याच्या राज्याचा आरंभ होत. (उत्पत्ती 10:6‭-‬10) प्रियांनो, अब्राहामाचे वडिल तेरह हे निम्रोदा राजाकडे मंत्री होते. निम्रोदाच्या राजाच्या काळात तेरहच्या घरी विविध दैवतांच्या मुर्ती तयार केल्या जात. लोक तेथे येऊन उपासना करत व दक्षिणा (दान) देऊन जात किंवा मुर्ती विकत घेऊन जात. म्हणजे पक्के मुर्तीपुजक होते आणि अतिशय श्रीमंत होते. *परमेश्वराने* अब्राहामाला पाचारण केले तेव्हा अब्राहामाने सर्व सोडले आणि आपल्या वडिलांना घेऊन हारानात गेले. (उत्पत्ती 11:31)

         _या निम्रोदाची राजाची पत्नी राणी सिमॅरिमस. निम्रोदाने स्वतःला देव व सिमॅरिमसला देवी म्हटले होते. ती दोघे प्रजेसाठी दैवत होते. हीच पगन संस्कृती होय. सिमॅरिमस हिचे दुसरे नाव अष्टारोथ. निम्रोदाच्या मृत्यू नंतर हिने स्वतःची पुजा उपासना करायला प्रजेला सांगितले. जिवंत परमेश्वर संपूर्ण सृष्टीच्या निर्मात्याला सोडून लोक माणसांच्या आणि मुर्तींच्या भजनी लागले. अष्टारोथच्या पुजेबद्दल पवित्र बायबल मधील काही वचने कृपया वाचावी. शास्ते 2:13, शास्ते 10:6‭-‬7, 1 शमुवेल 7:3‭-‬4, 1 शमुवेल 31:10_  

         _निम्रोदाच्या मृत्युनंतर काही वर्षांनी अनैतिक संबंधांतून सिमॅरिमस गरोदर राहिली आणि तिला तम्मुज झाला. तिने तिच्या देवत्वाचा फायदा घेतला आणि सांगितले की निम्रोद माझ्या पोटी जन्माला दे अशी सूर्याकडे मागणी केली. म्हणून मला हा मुलगा तम्मुज झाला आहे. तम्मुज व निम्रोद ही दोनही निम्रोदाची नावे आहेत. पुढे तम्मुज मोठा झाल्यावर सिमॅरिमस ने ताम्मुज सोबत लग्न केले. तीने सांगितले की ती स्वतः आजन्म कुमारिका आहे. ती रात्री तम्मुज सोबत जाते तेव्हा कुमारीका असते, सकाळी ती परत कुमारीका असते. पुढे तम्मुज 40 वर्षांचा होता तेव्हा तो शिकारीला गेला तेव्हा रान डुकराच्या हल्ल्यात तम्मुज मरण पावला. त्याच्या मृत्यूचा दिवस हा अठवड्याचा मधला दिवस म्हणजे आजच्या कॅलेंडर नुसार बुधवार होता. सिमॅरिमस (अष्टारोथ) ने फतवा काढला की तम्मुज साठी सर्वांनी उपास करुन शोक (दु:ख) करायचे. परंतु रविवारच्या दिवशी सुर्य देवतेची आराधना उपासना केली जात असे कारण तो सुर्याचा दिवस आहे, म्हणून रविवार मात्र शोकात घालवायचा नाही असे तिने सांगितले. म्हणून तम्मुजच्या मृत्यूच्या बुधवार नंतर रविवार सोडून चाळीस दिवस उपास करायला सुरुवात झाली. पुढे चाळीस दिवस संपल्यावर सिमॅरिमस म्हणाली की ती स्वर्गात गेली आणि तम्मुज परत जिवंत मागितला. मग परमेश्वराने सांगितले तम्मुज सहा महिने आत्म्यांच्या प्रदेशात राहिल आणि सहा महिने जिवंत होईल. याचे चिन्ह म्हणून निम्रोद ट्री (तम्मुज ट्री) हे सदाहरित राहील. निम्रोद ट्री म्हणजे ख्रिसमस ट्री. पुढे तिने सांगितले की बाबेलच्या (इराक) जमीनीवर जेथे ससे खेळत होते आणि अंडे देत होते तेथे एक फार मोठे अंडे आकाशातून (स्वर्गातून) उतरताना तिने पाहिले. (ससे अंडी देत नाहीत. पिले देतात.) त्या अंड्याचे नाव तिने इस्टर एग ठेवले. तिने जाहिर केले की, तम्मुज आता सुर्यदेव बनुन आपल्या मधे आहे याचे हे चिन्ह आहे._

          याच प्रथेप्रमाणे इस्राएल लोक *देवाच्या इच्छेविरुद्ध* तम्मुजसाठी शोक करत, सुर्याची उपासना करत याचेही *पवित्र बायबल* मध्ये संदर्भ आहे. वचन सांगते, तो मला आणखी म्हणाला, “ते ह्यांहूनही अधिक अमंगळ कृत्ये करीत आहेत, ती तुला दिसून येतील.”  तेव्हा त्याने मला *परमेश्वराच्या मंदिराच्या* उत्तरेस असलेल्या दरवाजाजवळ आणले, तर तेथे स्त्रिया बसून तम्मुजासाठी शोक करत होत्या.  तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, तुला हे दिसते ना? ह्याहून अधिक अमंगळ गोष्टी तुझ्या दृष्टीस पडतील.”  तेव्हा त्याने मला *परमेश्वराच्या मंदिराच्या* आतल्या अंगणात नेले, तो पाहा, *परमेश्वराच्या मंदिराच्या द्वारी देवडीच्या व वेदीच्या* दरम्यान सुमारे पंचवीस इसम *परमेश्वराच्या मंदिराकडे* पाठ करून व पूर्वेकडे तोंड करून उभे होते; ते पूर्व दिशेस सूर्याची उपासना करीत होते. (यहेज्केल 8:13‭-‬16) 

          प्रियजनहो, आजही फार मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन लोक हा इतिहास माहित नसल्याने अज्ञानामुळे किंवा माहिती असून त्याकडे दुर्लक्ष करुन तम्मुजासाठी शोक करत आहेत. या दिवसांना ख्रिश्चन लोक दु:खाचे दिवस लेंत समय म्हणतात. सिमॅरिमस (अष्टारोथ) आणि प्रजेने तम्मुजसाठी चाळीस दिवस उपास केले, डोक्यावर राख टाकली, गोणताट नेसून राखेत बसले अशासाठी की तम्मुज (निम्रोद) यास सूर्य देवतेने परत जिवंत करावे. रविवार वगळता चाळीस दिवसांनंतर येणाऱ्या रविवारी तो परत जिवंत होईल हे राणीने सांगितले होते म्हणून लोकांनी केले. याच सिमॅरिमस ला म्हणजे अष्टारोथला आकाशराणी (यिर्मया 7:18) म्हटले जात असे. तिला इश्तार किंवा इश्तियार देवी देखील म्हटले जाते. यांची सेवा उपासना करणे परमेश्वराच्या क्रोधाला आपल्यावर ओढवून घेणे आहे.


          *लेंत समयाबद्दल ख्रिश्चन लोकांच्या चुकीच्या धारणा, विचार व पवित्र बायबलचे मार्गदर्शन - 1)प्रभु येशू ख्रिस्ताने* चाळीस दिवस उपास केले म्हणून आम्ही देखील करतो. - तर उपास केल्यानंतर *प्रभु येशू ख्रिस्ताची* स्वतः सैतानाने समक्ष परीक्षा घेतली होती. तुम्ही उपासांनंतर सैतानाचा सामना करणार का?  *2)प्रभुजींनी* उपास बुधवारी सुरु केले होते का? - नाही. असे *पवित्र बायबल* मध्ये कोठेही लिहिलेले नाही. *3)प्रभुजींना उपास संपल्यावर लगेचच वधस्तंभावर खिळले का? - नाही. उपास संपल्यानंतर प्रभु येशू ख्रिस्ताची सेवा सुरु झाली आहे.* वल्हांडन सनापूर्वी चाळीस दिवस नाही तर सहा महिने आगोदरच *प्रभुजींनी* उपास केले होते. इंग्रजी कॅलेंडर नुसार सप्टेंबर ऑक्टोबर च्या काळात *प्रभु येशू ख्रिस्ताने* रानात उपास केले होते. *4)प्रभु येशू ख्रिस्ताने* उपासांच्या दरम्यान रविवारची सुटी केली होती का? - नाही *प्रभु येशू ख्रिस्ताचे* उपास सलग होते. तर मग उपास करणाऱ्यांनी सलग चाळीस दिवस व चाळीस रात्री उपास करायला हवेत. *5)प्रभु येशू ख्रिस्ताचे* रविवारी *पुनरुत्थान* झाले म्हणून रविवारी उपास करायचे नाही असे म्हटले जाते. - रविवार व्यतिरिक्त इतर  इतर दिवस *प्रभु येशू ख्रिस्त जिवंत* नाहीत का? आहेत तर उपास, दु:ख, शोक कशासाठी? *प्रभुजी* सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी *पुनरुत्थीत* झाले आहेत. *आता आपण फक्त पुनरुत्थीत प्रभु येशू ख्रिस्ताच गाजवावा.  6)परमेश्वराने* मोशेला नियमशास्त्र दिले तेव्हा मोशेने चाळीस दिवस चाळीस रात्री उपास केले. - एलीयाने देखील केले परंतु इस्त्राएल लोकांनी कधीही चाळीस दिवस उपास केले नाहीत. नोहाच्या काळात चाळीस दिवस रात्र पाऊस पडला त्याचा उपासांशी काहीही संबंध नाही. *7)पवित्र बायबल* चाळीस दिवस उपास करायला सांगते का - नाही. - फक्त एकच दिवस उपास करायला नियमशास्त्रात लिहिले आहे. (लेवीय 23:27-32) *प्रभु येशू* म्हणतात की उपास गुप्त असावे. त्यामध्ये ढोंगीपणा नसावा. (मत्तय 6:16-18) त्यासाठी एक की अनेक किंवा ठराविक दिवस सांगितला किंवा सांगितले नाहीत. 

          *8)पवित्र बायबलमधील* प्रेषितीय मंडळीने चाळीस दिवसांचे लेंत उपास केल्याचा किंवा करायला सांगितल्याचा *पवित्र बायबल* मधे कोठेही उल्लेख नाही. किंवा *स्वतः प्रभु येशू ख्रिस्ताने* देखील असे आज्ञापिले नाही. *9)प्रभु येशू ख्रिस्ताने स्वतःच्या डोक्यावर राख टाकली होती का? - नाही.* *10)तारणासाठी* उपास करणे, शोक करणे, दानधर्म करणे अशा काही कृती केल्या की या प्रथेनुसार मनुष्य शुद्ध होतो पवित्र होतो त्याच्या पापांची क्षमा होते असे म्हटले जाते - परंतु *पवित्र बायबल सांगते की, मनुष्याचा उद्धार हा प्रभु येशू ख्रिस्ताच्या कृपेनेच होतो कर्मांनी अजिबातच नाही. (इफिसकरांस पत्र 2:9)* तसेच पापांबद्दल शोक करायला ठराविक दिवस नसतात. पापांची जाणीव झाली की ताबडतोब त्या बद्दल शोक करावा पश्चात्ताप करावा *प्रभु येशू ख्रिस्ताकडेच* क्षमायाचना करावी. त्यासाठी लेंत समयाची वाट पहाणे अयोग्य आहे. *11)परमेश्वराने म्हटले* की तु माती आहेस आणि परत मातीला मिळशील याची आठवण म्हणून डोक्याला राख लावतात असे म्हटले जाते. - ही *परमेश्वराने* मनुष्याला दिलेली शिक्षा होती. परंतु सुमारे 2000 वर्षांपूर्वी *प्रभु येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर स्वतःला अर्पण करून आपल्याला पापातून मरनातून सोडविले आहे.* आता आपण दु:ख करत बसण्यापेक्षा *पुनरुत्थीत प्रभु येशू ख्रिस्ताला गाजवावो व गौरव द्यावा.* आता आपण बंधनातून मुक्त झालेलो आहोत. *कोणी म्हणेल की मग विश्वासणारे मरत नाही का? मरतात ना? - नाही विश्वासणारे मरत नाहीत. झोपी जातात, महानिद्रा घेतात. प्रे कृ 7:60, 1 थेस्सलनी 4:13-15, करिंथकरांस पहिले पत्र 15:6,20,51 अविश्वासणारे मात्र मरतात.*  

          *12)* डोनल्ड ए मॅकेंझी यांच्या मीथ्स ऑफ बाबेल या पुस्तकात पान नंबर 305-325    ब्रिटनिका एनसायक्लोपिडिया खंड 18 पान नंबर 926, तसेच कॅथोलिक एनसायक्लोपिडिया मध्ये देखील या बाबी नमुद केलेल्या आहेत की रोमन सम्राट कॉन्स्टंटाइन ने इ. स. 313 मध्ये आकाशात क्रॉस सारखे चिन्ह पाहिले आणि आवाज ऐकला की हे काय आहे ते शोध. त्याने त्या चिन्हाचा म्हणजे क्रॉसचा उपयोग केला आणि त्याला युद्धात विजय मिळत गेला. मग त्याने ख्रिस्ती लोकांना स्वातंत्र्य द्यायला सुरुवात केली. त्याने स्वतः जून्या पगन संस्कृती मधील रुढी परंपरा न सोडता ख्रश्चन धर्म स्वीकारला. त्याच्या नंतर इ. स. 380 मध्ये सम्राट थिओडोशियस ने इ. स. 325 च्या काउन्सील ऑफ नेशीयाच्या ठरावानुसार पगन संस्कृती मधील रुढी परंपरा चर्च मध्ये लागू करण्यास मान्यता दिली आणि इ. स. 385 पासून अधिकृतपणे पगन संस्कृती मधील रुढी परंपरा रिवाज चर्च मध्ये सामिल झाले. आणि त्या वेळच्या ख्रिस्ती धर्म पुढारी, याजक, वडील वर्गाने भितीपोटी, लालसेपोटी, या पगन परंपरा चर्च मध्ये सामील करायला संमती दिली. तेव्हापासून चर्च मध्ये फोटो, मुर्ती दिसायला सुरुवात झाली. पगन संस्कृती मधील गोष्टींची ख्रिश्चन धर्माशी सांगड घालून त्या अधिकृत करायला सुरुवात केली. अशा प्रकारे *प्रभु येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थान दिवसाला* इस्टर हे पगन देवी सिमॅरिमसचे नाव दिले गेले. किती भयंकर प्रकार आहे हा! *पुनरुत्थान दिनी* इस्टर एग्ज आणि ससे चर्च मध्ये अर्पण केले जातात, सजवले जातात. किती किती दु:खदायक आहे हे! *परमेश्वराला मुर्ती पूजेचा भयंकर राग आहे. सर्वात जास्त राग आहे. संपुर्ण मानवजातीला प्रभु येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या व्दारे नितीमत्व प्राप्त होते धार्मिकता प्राप्त होते तो दिवस प्रभुचे पुनरुत्थान गाजवायचे* सोडून हॅपी इस्टर म्हणून पगन संस्कृती मधील देवी देवतांच्या नावाचा महिमा करुन मनुष्य स्वतःला *देवाच्या क्रोधाचा* भागीदार करुन घेत आहे. कारण परमेश्वराने स्पष्ट आज्ञा दिली आहे की, मी जे काही तुम्हांला सांगितले आहे त्या सगळ्यांविषयी सावध राहा; *_इतर देवांचे नावदेखील घेऊ नका, ते तुमच्या मुखातून ऐकू येऊ नये._* (निर्गम 23:13) *परमेश्वराने* मनुष्याला सावधानता बाळगायला सांगितले आहे. मुर्ती पुजा फार दुर परंतु इतर देवतांची नावे देखील मुखातून बाहेर पडायला नको हे किती स्पष्ट अाज्ञापिले आहे. असे असतानाही *पुनरुत्थान दिनी* अन्य देवतांच्या आराधना कळत किंवा नकळत करुन मनुष्य सैतानाला खुष करत आहे आणि *निर्माणकर्त्या परमेश्वराला* दु:ख देत आहे. 

          प्रियजनहो, लेंत समयातील उपास हे तम्मुजासाठी केले जात आहेत. त्यांचा *पवित्र बायबलशी* काहीही संबंध नाही. आणखी दु:ख याचे वाटते की ज्यांना हे सर्व माहिती आहे ते लोक म्हणतात आम्ही तम्मुजासाठी नाही करत. परंतु लक्षात ठेवा की, कोणतेही निमित्त करुन धार्मिकता येत नाही. खोट्या रुढी परंपरा पाळण्यात नक्कीच नाही. ज्यांना सत्य कळते पण वळत नाही ते अनेक कारणे सांगून बंधणात राहतात. *ज्यांना सत्य समजते ते बंधमुक्त होतात. प्रियजनहो खरी धार्मिकता प्रभु येशू ख्रिस्ताच्या आज्ञा पालनात आहे. सत्य समजून घ्या आणि बंधमुक्त व्हा. सत्य प्रभु येशू ख्रिस्तच आहे. तुम्हांला सत्य समजेल व सत्य तुम्हांला बंधमुक्त करील.” (योहान 8:32) आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. (प्रकटीकरण 3:13) देवबाप करो हा संदेश समजण्यासाठी सर्वांना बुद्धी देवो. खोट्या रुढी परंपरा सोडून केवळ प्रभु येशू ख्रिस्ताला अनुसरण्यासाठी आपल्या सर्वांना पवित्र आत्म्याचे सहाय्य व मार्गदर्शन पुरवो. आणि आपल्या सर्वांना प्रभु येशू ख्रिस्ताच्या कृपेनेच रॅप्चर मध्ये सहभागी करुन अनंतकाळचे जीवन देवो. आमेन.*

           

Sunday, 14 February 2021

यरुशलेमेचा न्याय



             *✨यरुशलेमेचा न्याय✨*


*तू आपल्या दुष्कर्मांचे व अमंगळ कृत्यांचे फळ भोगत आहेस, असे परमेश्वर म्हणतो..✍🏼*

                     *( यहेज्केल १६:५८ )*


                           *...मनन...*


           *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!* 


    या अध्यायामध्ये यरूशलेम ही पत्नी असून परमेश्वर हा तिचा पती आहे असे दाखविले आहे. देवाची त्याच्या लोकांवरील प्रीति ही पत्नीवरील प्रीतीसारखी आहे अशी तुलना बायबलमध्ये अनेक ठिकाणी केलेली आपणांस पाहावयास मिळते. देवाचे निवडलेले शहर होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्याच गोष्टी यरूशलेमेकडे नव्हत्या. यरूशलेमेची स्थापना हिब्रू लोकांनी केली नव्हती, तर कनानच्या मूर्तिपूजक लोकांनी केली होती. देवाने पवित्र शहर म्हणून यरूशलेमेची निवड करून तिला जीवन दिले व यबूसी लोकांपासून ते जिंकून घेण्यासाठी दाविदाला प्रेरणा दिली. ( २ शमुवेल ५:७-१०) तिने देवाबरोबर बेईमानी केली परंतु तरीही देवाने तिच्यावर प्रीति केली. तिची काळजी घेतली आणि तिला सुंदर व वैभवी नगरी बनवले. परमेश्वर म्हणतो, तू जन्मलीस तेव्हापासून तुझा तिरस्कार केला आहे, तुला अमंगळ समजून टाकून दिलेले होते, परंतु मला तुझी दया आली, मीच तुला जिवंत ठेवले. तू वाढून मोठी झालीस तेव्हा मी पत्नी म्हणून तुला स्वीकारले, तुला भरपूर दागदागिने व विपूल वस्त्रप्रावरणे दिली, तुझ्या सौंदर्याचा लौकिक सर्वत्र झाला. *"तुझ्या सौंदर्यामुळे तुझी किर्ती राष्ट्रांत पसरली; कारण मी तुला दिलेल्या तेजाने तुझे सौंदर्य अप्रतिम झाले, असे परमेश्वर म्हणतो. ( वचन १४)* परमेश्वर म्हणतो, मी तुझ्यासाठी केलेल्या सर्व गोष्टींचा तुला विसर पडला. तुला धिक्कार असो! 

     प्रियांनो, आम्हीही परमेश्वराची वधू आहोत. जे यरूशलेमेबद्दल परमेश्वर बोलत आहे तेच आम्हाला देखील लागू होते. कारण परमेश्वराने मानवाला शुद्ध व पवित्र बनवले होते. परंतु मनुष्य देवाबरोबर एकनिष्ठ राहू शकला नाही. त्याने परमेश्वराच्या आज्ञा मोडून त्याच्या विरोधात वर्तन केले. त्याने देवाऐवजी जगीक सुखाकडे पाहिले. आजच्या विकसित जगामध्ये आर्थिक सुबत्ता, सुखसमृद्धी हाच जीवनाचा प्रमुख उद्देश झालेला दिसून येतो. सुफलतेची मागणी व अपेक्षा, भौतिक मालमत्ता, सुखवस्तू जीवनाची लालसा, गाडी, बंगला, धनसंपत्ती या सर्व गोष्टींची हाव ही देखील मूर्तिपूजाच आहे. आणि आज अनेक लोक देवाबरोबर एकनिष्ठ न राहता, त्याच्याशी बेईमानी करून या मूर्तिपूजेच्या मागे लागलेले दिसून येत आहेत. परंतु असे असले तरी परमेश्वराचे लोक बहकले, वाकड्या वाटेला गेले तरी तो त्यांना दिलेली आपली अभिवचने विसरत नाही. यरूशलेम नकोशी, अस्वच्छ, नग्न, आपल्याच रक्तात पडलेली होती परंतु परमेश्वर म्हणतो, *... तेव्हा मी तुझ्यावर पदर घालून तुझी नग्नता झाकली. ( वचन ८)* पदर घालणे म्हणजे एखाद्या कुमारिकेला विवाहाने आपलीशी करणे, संरक्षण आणि वैवाहिक नातेसंबंधात प्रवेश करणे. ( रूथ ३:९) तसे देवाने तिला आपलीशी करून तिच्या अंगावरचे रक्त, अमंगळपण धुवून स्वच्छ केले. तिला उत्तमोत्तम उंची वस्त्रे नेसवली आहेत. तिच्याबरोबर करार केला. 

    प्रियांनो, देवाने त्याचे नियम व अभिवचने देऊन आम्हाबरोबरही करार केला आहे. आम्ही विश्वासूपणे त्याच्या आज्ञांचे पालन करावे, त्याच्याबरोबर एकनिष्ठ राहावे अशी त्याची इच्छा आहे. आम्ही जगीक आशीर्वाद मिळविण्यासाठी नाही तर देवापासून मिळणारे आत्मिक आशीर्वाद मिळविण्यासाठी प्रयत्न करावे. कारण जगीक सुखाच्या मागे लागून आम्ही आमच्या जीवनातील "नीतिमत्व, शांती व पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद" ह्यांचा समावेश असलेले देवाचे उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न करीत नाही आणि त्यामुळे आपण देवासोबतची खरी सहभागिता आणि पवित्र आत्म्याचे सामर्थ्य हे गमावून बसतो. म्हणून प्रियांनो, आम्ही परमेश्वराबरोबर एकनिष्ठ राहून त्याच्या आज्ञांचे पालन करावे, त्याची इच्छा पूर्ण करावी. कारण  परमेश्वर क्षमा करणारा देव आहे. तो म्हणतो, *"तू जे केलेस त्याची मी क्षमा करीन." ( वचन ६३)* 

    

*"यरुशलेमेच्या उद्ध्वस्त झालेल्या स्थलांनो, आनंदघोष करा, सर्व मिळून गा; कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, त्याने यरुशलेमेस उद्धरिले आहे." ( यशया ५२:९)*

    

        

Thursday, 11 February 2021

सुवार्तेद्वारे प्रभूचे कार्य



            *✨सुवार्तेद्वारे प्रभूचे कार्य✨*


*म्हणजे तुम्ही आळशी होऊ नये, तर विश्वासाच्या व धीराच्या योगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे होतात त्यांचे तुम्ही अनुकारी व्हावे..✍*

                       *( इब्री ६:१२)*


                           *...मनन...*


    परमेश्वराने जे सुवार्तेचे काम आपल्याला सोपवून दिलेले आहे, ते काम आपण पूर्ण विश्वासाने केले पाहिजे, कारण देवाची अशी इच्छा आहे की, एकाही आत्म्याचा नाश होऊ नये तर सर्वांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा आम्ही इतरांना प्रभूबद्दल सुवार्ता सांगू, इतरांना सुवार्तेद्वारे ख्रिस्ताची ओळख करून देऊ. कारण कितीतरी लोक अजूनही ख्रिस्ताला ओळखत नाहीत, अजूनही ते ख्रिस्तापासून दूर आहेत. तेव्हा त्यांच्यापर्यंत सुवार्ता पोहोचविणे आणि त्यांना ख्रिस्ताची ओळख करून देणे गरजेचे आहे. कारण तेव्हाच त्यांचे तारण होऊ शकते. वचन सांगते की, *स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीच्या खाली प्रत्येक गूडघा येशूच्या नावाने टेकला जावा, आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने  येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. ( फिलिप्पै २:१०,११)*


    परमेश्वर केवळ आपल्यासाठी नव्हे तर जगातील सर्वांसाठीच तारणारा म्हणून ह्या भूतलावर आला. आणि त्याने मानवासाठी अनेक चमत्कार केले, आणि शेवटी आपल्यासाठी स्वप्राण अर्पून त्याने आपल्यावरील त्याची प्रीति दर्शविली. आपणही त्या प्रीतीची, त्याच्या मरणाची आठवण ठेवून आपल्याला सोपवून दिलेले कार्य कंटाळा न करता करीत राहावे. कारण असे लिहिले आहे की, *सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करीत जागृत राहा. ( इफिस ६:१८)* पौल फिलिप्पैकरांना लिहितो की, *ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असेच आचरण ठेवा. ( फिलिप्पै १:२७)* सुवार्ता सांगताना कदाचित तुमचा छळ केला जाईल, तुम्हाला विरोध करण्यात येईल, परंतु तुम्ही माघार न घेता सुवार्ता गाजविण्याचे कार्य चालू ठेवले पाहिजे. कारण जरी तुम्हांवर कुठल्याही प्रकारचे संकट आले तरी प्रभू तुम्हाला प्रत्येक परिस्थितीमध्ये साहाय्य करील, आणि तुमचे रक्षण करील. असे लिहिले आहे की, *त्याच्यावर  विश्वास ठेवावा इतकेच केवळ नाही, तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरिता दुःखही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे. ( फिलिप्पै १:२९)*


    म्हणून प्रियांनो, देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी आपण देवाच्या अपार कृपेवर विश्वास ठेवावा आणि देवाच्या साहाय्यावर विसंबून राहावे. तो आपल्याला सर्व प्रकारचे साहाय्य करील आणि आपण करीत असलेल्या सेवेचे प्रतिफळ आपल्याला दिल्यावाचून राहणार नाही. असे लिहिले आहे की, *तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही. ( इब्री ६:१०)* प्रियांनो, आपण ख्रिस्तावरील विश्वासामध्ये सदैव टिकून राहावे, अढळ राहावे. कारण विश्वास हाच आमच्या ख्रिस्ती जीवनाचा पाया आहे. आणि अनेक लोकांना ख्रिस्ताकडे आणायचे म्हणजे पाया म्हणजेच आपला विश्वास हा प्रथम मजबूत असायला पाहिजे, भक्कम असला पाहिजे, तरच इतरांचे मन आपण वळवू शकतो. वचन सांगते की, *जर आपण आपला आरंभीचा भरंवसा शेवटपर्यंत दृढ धरिला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहो. ( इब्री ३:१४)* म्हणून प्रियांनो, आपण आपल्याला प्रभूने सोपवून दिलेली सुवार्तेची घोषणा करण्याची कामगिरी न डगमगता, आळस न करता सदोदित करावी. एकमेकांसाठी सदैव प्रार्थना करावी, आणि जे देवापासून दूर आहेत त्यांना देवाच्या राज्यात आणण्यासाठी झटून प्रयत्न करत राहावे.


      

Monday, 8 February 2021

माझे घर प्रार्थना घर






              *✨माझे घर प्रार्थना घर✨*





*"तुला व तुझ्या मुलाबाळांना धूळीस मिळवितील, आणि तुझ्यामध्ये चिऱ्यावर चिरा राहू देणार नाहीत, कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाहीस"..✍*


                          *( लूक १९:४४ )*





                           *...मनन...*




          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*




     प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा यरूशलेमेत प्रवेश केला त्या प्रसंगाविषयी त्याच्याबद्दल बायबल मध्ये लिहिले आहे की, *"येशूचा यरूशलेमेत जयोत्सवाने प्रवेश."* होय, खरोखरच प्रभूने जय मिळविला होता. आणि तो यरूशलेमेस येत असताना सर्व लोकांमध्ये खूप उत्साहाचे वातावरण दिसून येते. ते सर्वजण प्रभूने केलेली जी महत्कृत्ये त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करीत म्हणत होते, *"'प्रभूच्या नावाने येणारा' राजा धन्यवादित असो, स्वर्गात शांति, आणि उर्ध्वलोकी गौरव !!"* खूप आनंदाने ते स्तुती करीत होते. आणि ह्याउलट त्यांच्यापूढे चालणारा त्यांचा राजा प्रभू येशू ख्रिस्त यरूशलेमेच्या जवळ आल्यावर त्या शहराकडे पाहून *रडत होता.* कारण आनंदाने उत्सव करणाऱ्या या लोकांनी देवाबरोबर समेट करण्याच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले होते. देवाने यहूदी लोकांवर कृपादृष्टी करून आपल्या एकूलत्या एका पुत्राला त्यांच्याकडे पाठवले. परंतु त्यांनी त्याच्याकडेही दुर्लक्ष केले. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या शहराकडे पाहात रडत रडत म्हणत आहे की, *"जर तूं, आज निदान शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते ! परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहेत." ( लूक १९:४२)* त्यांच्याकरिता आता न्यायनिवाडा तेवढा राहिला होता. *जे देवाच्या कृपेचा नाकार करतात, त्यांच्या जीवनात असा क्षण यायची शक्यता असते की, कृपेची संधी त्यांना पुन्हा कधीच लाभणार नाही.*

     यरूशलेमेचा नाश सुमारे पस्तीस वर्षांनी होणार होता हे प्रभू येशू ख्रिस्ताला माहीत होते. त्या समयी रोमी सैन्याने ह्या शहराला वेढा दिला आणि त्यांनी त्या शहरातील लोकांचा कोंडमारा केला. भयंकर दुष्काळ पडला. प्रभू येईल आणि ह्यांतून आपली सूटका करील ह्या अपेक्षेने ते वाट पाहात होते, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटल्याप्रमाणे रोमी सैन्याने अखेर ते शहर धूळीस मिळविले व मंदिर उध्वस्त केले. प्रभू येशू ख्रिस्ताने जे म्हटले होते ते ( लूक १९:४३,४४) ह्या वचनाप्रमाणे घडून आले. नंतर जेव्हा येशू मंदिरात गेला तेव्हा त्याने पाहिले की, त्या मंदिरात व्यापाऱ्यांनी तेथे येणाऱ्या लोकांना लूटण्याचा धंदा चालविला होता. प्रभूने आपल्या अधिकाराने त्यांना बाहेर घालवून टाकले. आणि त्यांना म्हणाला, *"'माझे घर प्रार्थनेचे घर होईल' असा शास्रलेख आहे; परंतु तुम्ही त्याची 'लूटारूंची गूहा' केली आहे." ( लूक १९:४६)* प्रियांनो, परमेश्वराचे मंदिर म्हणजे आमचे शरीर होय. पौल म्हणतो, *तुम्ही देवाचे मंदिर आहां आणि तुम्हांमध्ये देवाचा आत्मा वास करितो हे तुम्हांस ठाऊक नाही काय ? (१ करिंथ ३:१६)* आम्ही जर देवाचे मंदिर आहोत तर आम्ही किती विशेषकरून स्वतःला पवित्र ठेविले पाहिजे. कारण देव पवित्र आहे, तसेच त्याचे मंदिर ही पवित्र असावयास हवे. म्हणून आम्ही कुठल्याही पापाला, अपवित्रतेला आमच्यामध्ये थारा देऊ नये तर स्वतःला शुद्ध आणि पवित्र राखावे. पौल म्हणतो, *तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहां; म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. ( १ करिंथ ६:२०)* 

    होय प्रियांनो, यरुशलेमच्या लोकांना जिवंत देवाचे सान्निध्य समजले नाही, त्याची महानता, त्याचे देवत्व त्यांनी ओळखले नाही. परंतु आपला परमेश्वर आपल्याला एक स्थान देत आहे. तेथे नेहमी जिवंत देवाचे सान्निध्य असणार, ते स्थान गौरवाने भरलेले असणार, ते स्थान देवाच्या पवित्र तेजाने पूर्ण भरलेले असणार. परमेश्वर आपल्याला एक अभिवचन देत आहे... *"मी आपल्या इस्त्राएलासाठी एक स्थान नेमून देईन. मी तेथे त्यास रोवीन; म्हणजे ते आपल्या स्थानी वस्ती करुन राहतील व तेथून पुढे कधी ढळणार नाहीत."  (१ इतिहास १७:९)* आपल्या जीवनात ख्रिस्ताला आपण जे स्थान दिले आहे त्याप्रमाणे आपला भविष्यकाळ असणार आहे. आपण ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणात स्थान देऊ या. त्याला आपल्या हृदयात वसतीस बोलावू या. कारण आपण देवाचे मंदिर आहोत.     




     

Sunday, 7 February 2021

सुवार्ता



*आमची निंदा होत असता आम्ही मनधरणी करितो, आम्ही जगाचा गाळ, सर्वांची खरवड असे आजपर्यंत झालो आहों..✍*

               *( १ करिंथ ४:१३ )*


                        *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


     प्रेषित पौलाचे हे शब्द अतिशयोक्ती नाहीत तर अगदी खरोखरच सुवार्तेच्या सेवकांचे जीवन असेच होते आणि आजही कित्येकांचे तसेच आहे. निंदा होत असताना.... आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचीही खूप निंदा करण्यात आली पण त्याने सर्व काही सौम्यपणे सहन केले. वचन सांगते की जेव्हा लोक तुमची निंदा, छळ करतील त्यावेळेस आनंद करा, उल्हास करा.. कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. येशूचा छळ, निंदा होत असताना त्याने आपले तोंड देखील उघडले नाही, लोकर कापणाऱ्यापूढे जसे मेंढरू शांत बसते तसा तो शांत राहिला. येशूने जे आपल्या जीवनात साकारले.. ज्या पद्धतीने येशूने आपल्याला कित्ता घालून दिला.. त्या पद्धतीनेच पौलने आपले जीवन व्यतीत केले, साकारले. तो पूर्ण ख्रिस्ताचा अनुयायी झाला. जसे ख्रिस्ताने सहन केले त्यापेक्षा अधिक संकटे, क्लेश पौलच्या जीवनात आली तरी त्याने सर्व काही ख्रिस्ताप्रमाणे सौम्यपणे सहन केले. त्याने ख्रिस्ताचे अनुकरण केले. जगाचा गाळ... म्हणजे सर्वात हीन, खालचा दर्जा.. स्वतःला पूर्ण रिक्त करणे.. शून्य अवस्थेत येणे. देवाने प्रेषितांना अगदी हीन, निंद्य जागी ठेवले आहे. पौल म्हणतो, *"देवाने आम्हां प्रेषितांना शेवटल्या जागेवरचे आणि मरणास नेमलेल्यांसारखे करून पूढे ठेविले आहे, कारण आम्ही जगाला म्हणजे देवदूतांना व माणसांना जणू तमाशा असे झालो आहों !" ( वचन ९)* पौलाने कधीही, कुठेही स्वतःची प्रौढी गाजवली नाही किंवा बढाई मारली नाही. वचनात लिहिल्याप्रमाणे त्याने स्वतःला जगाचा गाळ असे लेखिले. आज हा स्वभाव किती सेवकांच्या जीवनात दिसून येतो ? किती विश्वासणाऱ्यांच्या जीवनात दिसून येतो ? पौल म्हणतो, *तुम्हांसाठी जी माझी दुःखे त्यांमध्ये मी आनंद करितो, आणि ख्रिस्ताच्या क्लेशांतले जे उरले आहे ते मी आपल्या देहाने, त्याचे शरीर जी मंडळी तिच्यासाठी भरून काढीत आहे. ( कलस्सै १:२४)* प्रेषितांवर लादलेल्या मानखंडना, निंदा, अप्रतिष्ठा यांवर त्यांचा प्रतिसाद एकच होता, तो म्हणजे सर्व काही सहन करणे आणि कोणी निर्भत्सना केली, शिव्याशाप दिले तरीही आशीर्वादानेच त्यांना प्रत्युत्तर देणे. म्हणजेच स्वतःला अगदी हीन, तुच्छ समजणे. हाच परमेश्वराने आम्हाला इतरांपासून वेगळे केल्याचा आणि पवित्रीकरणाचा पुरावा आहे.

     देवाच्या सुवार्तेच्या सत्यतेसाठी रक्तसाक्षी होण्यास येशू ख्रिस्ताचा खरा सेवक सदैव मोठ्या आनंदाने तयार असतो. आम्ही स्वतःच्या इच्छा आणि वासना यांच्याकडे लक्ष न देता देवाने आम्हाला पवित्र केलेले, निवडलेले आहे, सुवार्तेकरिता वेगळे केलेले असे आहे हे समजून घेतले पाहिजे आणि त्याप्रमाणे आचरण केले पाहिजे. *"मला जगाचा गाळसाळ समजले तरी हरकत नाही परंतु सुवार्तेची घोषणा होणे खूप महत्वाचे आहे."* आमच्यावर तिरस्काराने, अनीतीे, बेईमानी, खोटेपणा असे आरोप केले तरी आपण आरोप करणाऱ्याकडे लक्ष देऊ नये तर देवाबरोबर अधिकाधिक वाढत राहावे. आणि देवाच्या तारणदायी सत्यतेचे अद्भूत रहस्य समजून घेतले पाहिजे. अतिशय दीन आणि अधम अपराध्यांवरही तो अथांग प्रीती करतो. माझ्यामधून एक उत्तम नव्या नवलाचा माणूस निर्माण करावा यासाठी नव्हे तर आपल्या पुत्राला माझ्याठायी प्रगट करावे असे पौल म्हणतो. तो म्हणतो, *तरी ज्या देवाने मला 'माझ्या मातेच्या उदरातून' जन्मल्यापासून वेगळे केले व आपल्या कृपेने 'बोलाविले', त्याला आपल्या पुत्राला माझ्या ठायी प्रगट करणे बरे वाटले, अशासाठी की, मी परराष्ट्रीयांमध्ये त्याच्या सुवार्तेची घोषणा करावी. ( गलती १:१६)* आणि आपण पाहातो की पौलाने शेवटपर्यंत सुवार्तेची घोषणा केली. आणि देवाचे त्याला सोपवून दिलेले कार्य पूर्ण केले. प्रियांनो, आम्ही देखील आम्हाला प्रभूने सोपविलेले त्याच्या सुवार्तेचे, त्याच्या राज्याची घोषणा करण्याचे कार्य करत राहावे. ख्रिस्ताप्रमाणे आणि पौलाप्रमाणे स्वतःला पूर्ण रिक्त करून, स्वतःला जगाचा गाळ असे तुच्छ समजून सौम्यपणे सर्व सहन करीत देवाने सोपविलेले कार्य आम्ही करीत राहावे.


   

Wednesday, 3 February 2021

संपूर्ण समर्पण



             *✨संपूर्ण समर्पण✨*


*पेत्र त्याला म्हणू लागला, "पाहा, आम्ही सर्व काही सोडून आपल्या मागे आलो आहोत"..✍*

                   *( मार्क १०:२८ )*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


     या अध्यायामध्ये आपण पाहातो की, सार्वकालिक जीवन प्राप्तीसाठी एका श्रीमंत तरूणाने येशूला प्रश्न विचारला तेव्हा सर्व संपत्तीचा त्याग करण्यास प्रभूने त्याला सांगितले. त्याच्याकडे सार्वकालिक जीवन सोडून सर्व काही होते. त्याला ते हवे होते पण ते मिळविण्यासाठी करावा लागणारा त्याग करण्यास तो तयार नव्हता. देवाच्या राज्यासाठी द्यावी लागणारी किंमत किती आहे हे या श्रीमंत माणसाच्या वृत्तांतामधून पाहावयास मिळते. तो मनुष्य प्रीतीस पात्र होता, उत्सुक होता आणि निःसंशय नीतीने चालणारा होता पण किंमत मोजणे किंवा त्याग करणे त्याला जमले नाही. त्याला त्याग करणे न पटल्यामुळे आणि जगातील संपत्ती त्याला अधिक प्रिय असल्यामुळे तो निराश होऊन तेथून निघून गेला. तेव्हा देवाच्या राज्यात श्रीमंतांचा प्रवेश होणे किती कठीण आहे हे येशूने शिष्यांना सांगितले. संपत्ती श्रीमंतांना देवापासून व विश्वासाच्या जीवनापासून दूर खेचण्याचा प्रयत्न करीत असते. पौल म्हणतो, *जे धनवान होऊ पाहतात ते परिक्षेत, पाशात, आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनांत सापडतात. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे मूळ आहे, त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत, आणि त्यांनी स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे. ( १ तीमथ्य ६:९,१०)*


    पेत्राने व इतर शिष्यांनी येशू ख्रिस्ताच्या मागे जाण्यासाठी सर्व काही सोडले होते, त्यागले होते. आणि आता ते सर्व गोष्टींचा पुरवठा करणाऱ्या प्रभूबरोबर होते. त्यांना कसलीही काळजी करण्याची गरज नव्हती. कारण या जगात त्यांच्या सर्व गरजा प्रभू भागविणार होता. आणि त्याबरोबरच त्यांना स्वर्गात संपत्ती मिळणार होती. येशू त्यांना म्हणाला, *कारण ह्या सर्व गोष्टी मिळविण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात, तुम्हाला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. ( मत्तय ६:३२)* संपूर्ण समर्पण स्वाभाविक भक्तीपलीकडचे आहे. आम्ही देवासाठी सर्व सोडले तर देवच आमच्या संपूर्ण परिवाराला कवेत घेऊन आमच्या गरजा पुरवितो. संपूर्ण समर्पण हे आपल्या प्रभूकरिता आणि सुवार्तेकरिता असावे. ते वैयक्तिक लाभाच्या आशेने करू नये. काही मिळेल या आशेने केलेले समर्पण खऱ्या ख्रिस्तीपणाला शोभणारे नाही. देवाबरोबरचे आमचे नाते व्यवस्थित झाले की आपोआपच सर्व गोष्टींचा लाभ आम्हाला होईल. ख्रिस्तासाठी स्वेच्छेने स्वतःला समर्पित करणे हेच खरे संपूर्ण समर्पण आहे. आपण ख्रिस्तासाठी जे काही त्याग केले असतील त्यापेक्षा कितीतरी अधिक आध्यात्मिक फळे आम्हाला प्राप्त होतील.


    आपल्या संपत्तीवर मग ती कोणत्याही प्रकारची असो, भरंवसा ठेवू नये तर देवाच्या  राज्यात आमचा प्रवेश व्हावा यासाठी देवाचे साहाय्य आम्ही मागावे, देवावर आम्ही भरंवसा ठेवावा. आम्ही खरोखर देवाला समर्पित झालेले असू तर तसेच समर्पित राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आमचे संपूर्ण जीवन आम्ही ज्या प्रभूला संपूर्ण समर्पित झालो आहोत त्याच्यामध्ये गुंतलेले असावयास पाहिजे. देवाने स्वतःला सर्वस्वी आम्हाला दिले आहे. *त्याने आपला एकूलता एक पुत्र दिला.* त्यावरून संपूर्ण समर्पण काय असते ते आम्हाला समजते. आम्हीही त्याचप्रकारे आमचे जीवन देवाला समर्पित केले पाहिजे. हातचे काहीही राखून न ठेवता, विनाअट समर्पित झाले पाहिजे. आमचे जीवन संपूर्णपणे परमेश्वराशी एकरूप झालेले असले पाहिजे. जगातील गोष्टींचा, जगिक संपत्तीचा लोभ न धरता वरील, स्वर्गातील गोष्टींकडे आमचे मन लावावे. जगिक नात्यांमध्ये गुंतून पडू नये तर देवाबरोबरचे आध्यात्मिक नाते सांभाळण्याची काळजी घ्यावी. आम्ही आपले जीवन संपूर्णपणे प्रभूला समर्पण करावे. पृथ्वीवरील नाशवंत गोष्टींच्या मागे लागू नये तर स्वर्गात आमच्यासाठी ठेवलेल्या वरील, स्वर्गीय गोष्टी आणि सार्वकालिक जीवन हे मिळविण्यासाठी आम्ही झटून प्रयत्न करावा. प्रभू येशू म्हणतो, *"जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही." ( लूक ९:६२)*


        *

Monday, 1 February 2021

नीतीने व मर्यादेने वागावे



         *✨नीतीने व मर्यादेने वागावे✨*


*धन्य आशाप्राप्तीची म्हणजे आपला थोर देव व तारणारा असा जो येशू ख्रिस्त त्याचे गौरव प्रगट होण्याची वाट बघत आपण अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व सुभक्तीने वागावे..✍*

                *( तीत २:१२,१३)*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


       विश्वासणाऱ्यांचे आचरण देवाला संतोषविणारे आणि गौरव देणारे असावे यासाठी ते योग्य विश्वासावर आधारलेले असावे आणि ते देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधांमध्ये मुळावलेले असे असावे. देवाप्रती असलेली आपली प्रीति आणि कृतज्ञता ही अंतःकरणातून आलेली असावी. आपली काहीच पात्रता नसताना आपल्याला दाखवली गेलेली देवाची प्रीति, हीच त्याची सेवा करण्यासाठीची व त्याच्यावर असलेली आपली श्रद्धा काढून घेणाऱ्या कोणत्याही गोष्टीला नाही म्हणण्यामागची आपली प्रेरणा असायला हवी. सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे प्रगट झाली. ह्या कृपेनेच एखाद्या व्यक्तीचे तारण होते. तो जिवंत होतो. पौल म्हणतो, *देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेलो असतानाही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे, ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले. ( कृपेने तुमचे तारण झालेले आहे.) ( इफिस २:४,५)* ह्या कृपेने देव आम्हाला ख्रिस्ती जीवनाविषयीचे धडे शिकवितो. आम्ही ह्या जगामध्ये देवावरच्या विश्वासाने व आशेने जगतो. ती आशा ही की, येशू ख्रिस्ताचे गौरव प्रगट होणार आहे. व तो लवकरच परत येणार आहे आणि आम्हाला त्याच्यासमवेत घेऊन जाणार आहे. कारण तो आमचा थोर आणि उद्धारक देव आहे. तो आमचा तारणारा आहे. आणि ह्या आशेनेच आम्ही त्याची वाट पाहात असावे. पौल म्हणतो, *आपण सत्कृत्ये करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहो, ती सत्कृत्ये आचरीत आपण आपला जीवनक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली. ( इफिस २:१०)*


    प्रत्येक विश्वासू ख्रिस्ती जिची मनापासून अपेक्षा करतो ती "धन्य आशा" म्हणजे "आपला थोर देव आणि तारणारा असा जो ख्रिस्त त्याचा गौरव प्रकट करणे" आणि त्याच्यासोबत सनातन काळ राहण्याची अपेक्षा करणे.   आपली वृत्ती व वर्तणूक ह्यांत तफावत नसावी. तर आम्ही स्वतःला सर्व गोष्टींविषयी चांगल्या कामाचा कित्ता असे इतरांना दिसले पाहिजे. देवाच्या आगमनाची वाट पाहात असताना देवाचा आदर न करण्याची जी वृत्ती म्हणजेच अभक्ती आणि पाप करण्यास उत्तेजित करणाऱ्या अशा जगातील गोष्टी ह्यांचा आम्ही त्याग करावा. त्यांना *"नाही म्हणावे "* देवाची आदराने आराधना करणे, देवाच्या दृष्टीमध्ये नीट आणि योग्य असे आचरण ठेवणे आणि शिस्तीने वागणे ह्याकडे आम्ही लक्ष द्यावे. कारण पूर्वी आम्ही ख्रिस्तापासून दूर होतो. परंतु आता आम्ही ख्रिस्ताच्या ठायी नवीन उत्पत्ति असे आहोत. *तुम्ही त्यावेळेस ख्रिस्तविरहित, इस्राएलाच्या राष्ट्राबाहेरचे, वचनांच्या करारास परके, आशाहीन व देवविरहित असे जगात होता. परंतु जे तुम्ही पूर्वी 'दूर' होता, ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठायी ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे 'जवळचे' झाला आहां. ( इफिस २:१२,१३)* 


    प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर आमच्या पापांबद्दल खंडणी भरून स्वप्राण अर्पण केला. आणि तोच आम्हाला स्वैर वर्तनापासून मुक्त करून आम्हाला पवित्र आणि शुद्ध करतो. त्याला आमचे तारण व्हावे ह्यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागलेली आहे म्हणून आम्ही अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून, चांगली कामे म्हणजेच सत्कृत्ये करून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व सुभक्तीने वागावे आणि देवाची कृपा प्राप्त करून घ्यावी. विश्वासणाऱ्यांनी प्रभू येशूच्या पुनरागमनासाठी तयारीत राहावे. त्यांनी ही आशा सोडू नये की प्रभूच्या आगमनाचा दिवस तो आजचा दिवसही असू शकतो.


*"आमचे आचरण असे असावे की, आम्ही देवाचे स्वतःचे लोक आहोत हे आमच्या आचरणातून लोकांना आम्ही दाखवून द्यावे."*