Sunday, 31 January 2021

ख्रिस्त सर्वांसाठीच



          *✨ख्रिस्त सर्वांसाठीच✨*


*मग तिने त्याला उत्तर दिले, खरे आहे महाराज, तरी घरची कुत्रीहि मेजाखाली मुलांच्या हातून पडलेला चूरा खातात..✍*

                    *( मार्क ७:२८ )*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


    येथे इस्राएलसाठी 'मुले' हा शब्द वापरला आहे. तारणाचा संदेश आणि आध्यात्मिक तारणाची योजना ही प्रथम इस्राएल लोकांना सांगितली पाहिजे असे येशू लोकांना शिकवत होता. प्रभू येशू सोर प्रांतात गेला असता त्या भागातील एक कनानी बाई जिच्या मुलीला अशुद्ध आत्मा लागलेला होता तिने येऊन त्याला त्या मुलीतून भूत काढून टाकण्याची विनंती केली. ती म्हणाली, *"हे प्रभो, दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भूताने फारच जर्जर केली आहे." ( मत्तय १५:२२)* परंतु आपण पाहातो की ख्रिस्ताने प्रथम तिच्याकडे लक्ष दिले नाही. आणि तिला काहीच उत्तर दिले नाही. परंतु जेव्हा शिष्यांनी त्याला तिला पाठवून द्यावे म्हणून विनंती केली तेव्हा प्रभूने उत्तर दिले की, *"इस्राएलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठविलेले नाही." ( मत्तय १५:२४)* त्या स्त्रीला त्याचे म्हणणे पटते तरीही ती सुज्ञतेने आणि चिकाटीने विनंती करत राहते ह्यावरून तिचा प्रभूवरचा विश्वास दिसून येतो. तिने अजूनही चिकाटी न सोडता प्रभूच्या पाया पडून म्हटले, *प्रभूजी, मला साहाय्य करा.* तेव्हा परत त्याने उत्तर दिले की, *"मुलांना प्रथम तृप्त होऊ दे, कारण मुलांची भाकरी घेऊन घरच्या कुत्र्यांना टाकणे ठीक नाही." ( मार्क ७:२७)* ह्यावर तिने उत्तर दिले, *"खरेच, प्रभूजी, तरी घरची कुत्रीहि आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चूरा खातात." ( मत्तय १५:२७)*

    प्रियांनो, आपण पाहातो की प्रभूने कधीच भेदभाव केला नाही. तर त्याने त्याच्याकडे येणाऱ्या सर्वांना आरोग्य दिले, सर्वांच्या समस्या सोडवल्या. असे असतानाही एकदा नाही तर दोन वेळा प्रभूने तिच्या मुलीला आरोग्य देण्यास नकार दिला. इतकेच नाही तर तिची तुलना कुत्र्याशी करून तिचा अपमानही केला. असे आपल्या प्रभूने का केले असेल ? येशूने त्या स्त्रीचा अनादर केला नाही तर तो तिची परीक्षा पाहण्यासाठी, ती विश्वासामध्ये कितपत टिकून राहील हे पाहण्यासाठी तिच्या विश्वासाची परीक्षा पाहतो. आपण पाहातो की, तिचा विश्वास खूप मोठा आहे. देवाने इस्राएलला दिलेल्या आशीर्वादाचा लाभ परराष्ट्रीयांनाही मिळावा हा देवाचा हेतू आहे असे ती म्हणते. यावरून समजते की जे ख्रिस्तावर खरा आणि दृढ विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी देवाच्या राज्याचे फायदे उपलब्ध आहेत हे तिला माहीत आहे तसेच तिला हेही माहीत आहे की देवाची कृपा आग्रहाने मागण्याचा अधिकार किंवा हक्कही आपल्याला नाही. कारण ती स्वतः मूर्तिपूजक आहे. परंतु असे असूनही तिने प्रभूला ओळखले आहे. म्हणूनच तर ती त्याला *प्रभूजी, दावीदाचे पुत्र* असे संबोधत आहे. आणि तिला खात्री आहे की तोच केवळ तिच्या मुलीला आरोग्य देऊ शकतो. म्हणून ती खंबीर राहून, दृढतेने प्रभूपाशी पुन्हा पुन्हा मागत आहे. तिचा अपमान करूनही ती चिडून किंवा निराश होऊन तिथून निघून गेली नाही तर देवाच्या उत्तराची, तिच्या मुलीला आरोग्य देण्याची वाट पाहात ती तिथेच थांबली आहे. कारण तिला समजले होते की *तारण व सूटका केवळ दाविदाचा पुत्र, प्रभू येशू ख्रिस्तामध्येच आहे.* म्हणूनच  तिने माघार घेतली नाही. ती प्रभूसमोर लीन आणि नम्र झाली. कोणत्याही प्रकारचा वादविवाद न करता नम्रपणे तिने ख्रिस्ताचे म्हणणे ऐकून घेतले. आपल्या अंतःकरणात तिने किंचितही अविश्वासाला जागा दिली नाही. जसे याकोबाने देवाबरोबर झगडून आशीर्वाद प्राप्त करून घेतले होते, तो प्रभूला म्हणाला, *जोपर्यंत तू मला आशीर्वाद देत नाही तोपर्यंत मी तुला जाऊ देणार नाही.* त्याप्रमाणेच या स्त्रीने माघार न घेता प्रभूची वाट पाहात राहिली आणि तिने विश्वासाचे प्रतिफळ म्हणजे आपल्या मुलीसाठी आरोग्य आणि आशीर्वाद मिळविला. येशूने तिला उत्तर दिले, *"बाई, तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ होवो," आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली. ( मत्तय १५:२८)*

     प्रियांनो, *प्रभूने म्हटले मागा म्हणजे तुम्हांस मिळेल.* आम्ही मागतो, परंतु आम्ही धीर धरून आणि चिकाटीने प्रभूची वाट पाहात नाही. आम्ही कालांतराने देवाकडे मागायचे सोडून देतो किंवा काही लोक तर देवालाच सोडून देतात आणि बहकून दूसऱ्या दैवतांकडे जातात. आम्ही तसे करू नये तर आम्ही आमच्या प्रभूची वाट पाहात राहावी. कारण उपदेशक म्हणतो, प्रत्येक गोष्टींचा समय नेमून दिलेला आहे. त्याच वेळी ती घडून येईल. म्हणून देवाच्या लोकांनी स्वतःसाठी किंवा इतरांसाठी प्रार्थना करीत असताना चिकाटी दाखवली पाहिजे, धीर धरून वाट पाहिली पाहिजे. आणि माघार न घेता विश्वासात दृढ राहिले पाहिजे. देव उत्तर द्यायला विलंब लावत आहे म्हणून नव्हे तर प्रत्येक गोष्ट जरी आपल्याला समजत नसली तरी आपण ख्रिस्तावर अवलंबून आहोत हे त्यावरून दिसते. आम्ही धीर धरून चिकाटीने प्रार्थना करतो तेव्हा प्रभू आमची प्रार्थना निश्चितच ऐकेल आणि आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहाणार नाही.


      

Saturday, 30 January 2021

परमेश्वराची समक्षता



            *✨परमेश्वराची समक्षता✨*


*मी वर आकाशात चढलो तरी तेथे तूं आहेस, अधोलोकी मी आपले अंथरूण केले तरी पाहा, तेथे तूं आहेस..✍*

                  *( स्तोत्र १३९:८)*


                           *...मनन...*


         *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


     परमेश्वर सदैव त्याच्या लेकरांची काळजी घेत असतो. सदैव तो त्यांच्याबरोबर असतो. त्याला अत्यंत प्रिय असणाऱ्या लेकरांकडे त्याचे नेत्र सदोदित लागलेले असतात. स्तोत्रकर्ता म्हणतो की, *माझे बसणे व उठणे तू जाणतोस, तूं दुरून माझे मनोगत समजतोस, तूं माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहातोस, आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे. ( स्तोत्र १३९:२,३)* खरोखरच परमेश्वराला आपला सर्व वर्तनक्रम अवगत आहे. माझ्या जीवनातील एक साक्ष आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी सैतानाने बहकविल्यामुळे परमेश्वरापासून मी दूर चालले होते.संकटांना, अडचणींना कंटाळून देवापासून दूर जाणार होते. परंतु खूप वाईट वाटत होते त्यामुळे खूप मोठ्याने देवाचा धावा करीत होते, देवाला हाक मारीत होते, त्याच्याकडे क्षमा मागत होते, मी काय करू ते सूचव, माझ्याबरोबर बोल, मला योग्य मार्गदर्शन कर अशी अखंड विनवणी करीत होते आणि.. प्रभूचे माझ्याकडे लक्ष होते. कारण त्याला माहीत होते की हे माझेच लेकरू आहे, आणि त्याने माझा धावा ऐकला आणि अद्भूत रितीने त्या दिवशी त्याने मला त्या संकटातून वाचविले. त्याच्यापासून दूर जाण्यापासून रोखले. मला तारिले.

    प्रियांनो, खरोखरच देव आमच्यापासून कधीच दूर नसतो. फक्त आपल्या हाकेची तो वाट पाहात असतो. तो म्हणतो, *मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल. ( यिर्मया ३३:३)* आणि खरोखरच तो आपल्यासाठी धावून येतो, तो आपल्याबरोबर बोलतो, आपण कोणत्या मार्गाने जावे हे तो सुचवितो. आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे त्याला माहीत आहे. पौल म्हणतो, *अहाहा ! देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे ! त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत ! ( रोम ११:३३)* निश्चितच पौल म्हणतो ते यथार्थ आहे. कारण त्याच्या दृष्टीपासून काहीएक लपून राहू शकत नाही. त्याचे नेत्र सर्वत्र आहेत. आणि ते प्रत्येकाला अजमावत आहेत. असे लिहिले आहे की, *परमेश्वर सर्वांची मने पारखितो आणि त्यात जे काही विचार व कल्पना उत्पन्न होतात त्या त्यांस समजतात. ( १ इतिहास २८:९)* 

     मनुष्य देवाच्या समक्षतेपासून कोठे जाऊ शकतो ? कारण परमेश्वर प्रत्येक ठिकाणी आपल्याबरोबर राहतो. त्याला माहीत नाही अशी एकही गोष्ट नाही, *कारण देवाची दृष्टी प्रत्येकाच्या आचरणावर असते, त्याचे प्रत्येक पाऊल तो पाहतो. ( ईयोब ३४:२१)* देवाला सर्वच, प्रत्येक गोष्ट माहीत आहे. तो तुम्हाला आणि मला अगदी पूर्णपणे, अंतर्बाह्य ओळखतो. आमच्यावर येणारा प्रत्येक प्रसंग, दुःख, संकटे, मोह हे सर्व तो जाणतो आणि आमच्या मदतीसाठी धावून येतो. आम्हाला सर्व वाईट गोष्टींपासून दूर ठेवतो, राखितो. इतकेच नाही तर आमच्या भावी जीवनाविषयीही तो जाणतो. तो म्हणतो की, *मी आरंभीच शेवट कळवितो, होणाऱ्या गोष्टी घडविण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे. (यशया ४६:१०)* म्हणून प्रियांनो, आपण परमेश्वरापासून काही लपवून ठेवू शकत नाही. तर त्याला आपल्या अडचणी, आपले मनोगत सांगू या, आणि त्याने दाखविलेल्या मार्गाने मार्गक्रमण करू या. त्याला हाक मारू या. म्हणजे तो आपल्यासाठी धावून येईल आणि आपल्याला आपल्या सर्व संकटांतून सोडविल. आपल्याला योग्य मार्ग दाखवून कोणत्या मार्गाने आम्ही चालावे ह्यासाठी मार्गदर्शन करीन.


    

Thursday, 28 January 2021

आपली नावे कुठे आहेत



         *✨आपली नावे कुठे आहेत?✨*


*"... तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत ह्याचा आनंद माना."..✍🏼*

                  *( लूक १०:२० )*


                           *...मनन...*


           *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!* 


    किती सुंदर वचन आहे ना! आणि किती आनंद वाटतो, आपली नावे *स्वर्गात लिहिलेली आहेत.* मला तर नक्कीच असे वाटते की या आनंदाशिवाय आपल्या जीवनात दुसऱ्या कोणत्याही आनंदाची आवश्यकता नाही. या आनंदाशिवाय दूसरा कोणताही आनंद मोठा नाही. परंतु एक प्रश्न आहे, खरेच आपली नावे स्वर्गात लिहिलेली आहेत का? त्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत का?आज प्रत्येक माणूस हा स्वतःच्या नावाला उंच करण्यासाठी जीवन जगत आहे. इतरांनी त्यांची प्रशंसा करणे, त्यांना मोठेपणा देणे, त्यांना आदर्श ठरविणे ह्या मध्ये त्यांना आनंद वाटतो. परंतु वचन सांगते स्वर्गात आणि पृथ्वीच्यावर एकच नाव आहे जे प्रशंसनीय, आदरणीय, सर्व नावावरुन श्रेष्ठ आहे, आणि ते म्हणजे फक्त *"येशू"* आपण आपल्या जीवनात प्रत्येक गोष्टीमध्ये प्रथम स्थान आपल्या *प्रभू येशूला* दिले पाहिजे. कारण तोच आपले जीवनाचे पुस्तक आहे. तोच आपला स्वर्ग आहे. स्वर्गात किंवा जीवनाच्या पुस्तकात आपली नावे लिहिलेली असावीत तरच आपण परमेश्वराच्या न्यायासमोर वाचू शकतो. 

    जीवनाच्या पुस्तकात कोणाची नावे लिहिली जावीत, किंवा कशाप्रकारे ख्रिस्ती जीवन किंवा विश्‍वास जीवन जगावे यासाठी अनेक प्रकारची वचने पवित्र शास्त्रात लिहिलेली आहेत. अशा अनेक वचनांद्वारे प्रभूने आपल्याला बोध केलेला आहे. पण आपण आज अगदी थोडक्यात याविषयी बघूया - आज जगा मध्ये लोक आपले नाव वेगवेगळ्या ठिकाणी नोंदणी करण्यासाठी खूपच उत्सुक असतात. जसे की, रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, एखाद्या विशिष्ट कमिटी, संघटना, इत्यादी ठिकाणी आपले नाव असावे यासाठी धडपड चालूच असते. या जगीक यादीत आपल्या नावनिशीसाठी आपण एवढी धावपळ करतो आणि नाव नोंदणी करतो पण हे लक्षात घ्या यातून आपल्याला काहीच लाभ नाही. मनुष्य हा श्वासवत आहे. त्याचे जीवन हे नश्वर छायेसारखे आहे. ते कधी नष्ट होईल माहीत नाही. आपण बायबलमध्ये वाचतो की, योसेफने देखील गर्भवती असलेल्या मरीयेला घेवून जाऊन नावनिशी केली होती. *नावनिशी लिहून देण्यासाठी, त्याला वाग्दत्त झालेली मरीया गरोदर असताना तिलाही त्याने बरोबर नेले. ( लूक २:५)* परंतु आपण बघतो की येशूच्या जन्मानंतर योसेफचा उल्लेख पुन्हा कोठेच आढळला नाही. 

     प्रियांनो, येशू म्हणत आहे की तुमची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली असावीत. स्वर्गात लिहिलेले असावी. येशू म्हणतो की, जिथे तुमचे धन तिथे तुमचे मन ही लागेल. होय प्रियांनो,  आपले धन आपण स्वर्गात साठवले पाहिजे. कोणते धन?परमेश्वर म्हणतो की मी तुम्हाला अंधारात लपलेले गुप्त धन देईल. *तुला अंधारातील निधी व गुप्त स्थळी लपवलेले धन देईन, म्हणजे तुला समजेल की तुझ्या नावाने हाक मारणारा मी परमेश्वर इस्राएलाचा देव आहे. ( यशया ४५:३)* याचा अर्थ जो पापाचा अंधकार आहे, अधर्माचा अंधार आहे, अनीतीचा अंधार आहे, दुष्ट शक्तीचा अंधार आहे. या अंधारात लपलेले धन म्हणजे मनुष्य! या मनुष्याला त्या अंधारातून प्रकाशात आणणे म्हणजे त्यास स्वर्गाच्या राज्यासाठी तयार करणे. जेव्हा एका पापी व्यक्तीचे तारण होते तेव्हा स्वर्गात आनंद केला जातो. एक एक आत्मा आपण प्रभू कडे आणला पाहिजे. हेच धन परमेश्वर तुम्हाला आणि मला देत आहे. आणि याचे प्रतिफळ आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणून या काळात आपण "सुवार्ता" ही जास्त प्रमाणात आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल अशा उद्देशाने कार्य केले पाहिजे. अनेक लोकांना तारणात आणून आपले नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिले जाण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. *'ज्या कोणाची' नावे जगाच्या स्थापनेपासून 'वधलेल्या कोकऱ्याजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली' नाहीत असे पृथ्वीवर राहणारे सर्व जण त्या श्वापदाला नमन करतील. ( प्रकटी १३:८)* प्रभू येशूच्या नावात चिन्ह चमत्कार होतात त्यात आपण आनंद मानू नये. खरा आनंद आहे तो स्वर्गात आपले नाव लिहिलेले आहे, जीवनाच्या पुस्तकात नाव लिहिलेले आहे याचा. पृथ्वीवर शत्रूच्या सर्व शक्तीवर प्रभूने आपल्याला अधिकार दिला आहे. याचा अर्थ असा होत नाही की आपण या गोष्टी करून किंवा या अधिकाराचा वापर करून जे अद्भुत चमत्कार होतात त्यामुळे आपण स्वर्गात जाऊ. बिलकुल नाही. आपले खरे कार्य आहे ती देवाची इच्छा करणे. आणि देवाची इच्छा आहे की एकाही आत्म्याचा नाश होऊ नये तर प्रत्येकाला देवाचे राज्य मिळावे. आणि त्यासाठी प्रत्येक व्यक्तीला सुवार्ता सांगणे गरजेचे आहे.प्रभूने आम्हाला सर्व पृथ्वीवर जाऊन देवाच्या राज्याची घोषणा करायला सांगितले आहे, सुवार्ता सांगायला सांगितले आहे. 


       

Wednesday, 27 January 2021

पेराल तेच उगवेल



             *✨पेराल तेच उगवेल✨*


*फसू नका, देवाचा उपहास व्हावयाचा नाही, कारण माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल..✍*

                    *( गलती ६:७ )*


                           


    जे देहस्वभावाने वागतील व देहस्वभावाच्या तृप्तीसाठी आपल्या पैशांचा व वेळेचा उपयोग करतील त्यांना नाश पावणारे म्हणजेच क्षणभंगूर ठरणारे पीक मिळेल. याउलट, जे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालतात व आपल्या पैशांचा व वेळेचा उपयोग प्रभूच्या इच्छेनुसार करतात त्यांना मिळणारे फळ टिकणारे म्हणजेच कायमचे असेल. आपण आपल्या धनाचा उपयोग प्रभूसाठी करीत असाल व यामध्ये पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन असेल तर त्याचे प्रतिफळ व आशीर्वाद कायम टिकणारे ठरतील. देवाला कोणीही फसवू शकत नाही. देवाचे नियम मोडल्यावर तो काहीच करणार  नाही ह्या भ्रमात राहू नये. कारण आपण जे पेरितो तेच पीकाच्या रूपात आपल्याला मिळेल, दूसरे काहीतरी मिळेल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. आम्ही आत्म्यासाठी पेरले तर आम्हाला आध्यात्मिक पीक मिळेल. आणि आम्ही जर देहस्वभावासाठी पेरितो तर आम्हाला अनीतीचे पीक मिळेल. पौल म्हणतो, *जो आपल्या देहस्वभावासाठी पेरतो त्याला देहस्वभावापासून नाशाचे पीक मिळेल, आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल. ( गलती ६:८)*


    ख्रिस्ती सेवकाची किंवा ख्रिस्ती जीवनाची तुलना व्यापारी किंवा नोकरदार किंवा कारखानदार यांच्याशी केलेेली नाही तर शेतकऱ्याशी केलेली आहे. कारण पेरणी, कापणी हे शेतीतील शब्द आहेत. आणि ख्रिस्ती कार्य हे विकत घेणे किंवा विकणे असे नसून पेरणे व कापणे असे आहे. आम्हाला किती माहीत आहे, त्यावर हंगाम अवलंबून नाही तर आम्ही किती पेरतो आणि काय पेरतो ह्यावर पीक किती येईल हे अवलंबून आहे. आमच्या अंतःकरणाच्या कोठारात कितीही विपूल प्रमाणात बी- बियाणे असले तरी ते आम्ही जेव्हा पेरणी करू तेव्हाच उगवून येईल. आणि पेरणीही योग्य भूमीमध्येच केली पाहिजे. तरच विपूल फळ मिळेल. *( वाचा -पेरणाऱ्याचा दाखला - लूक ८:४ ते १५)* 


    आत्म्याच्या भूमीवर जीवनाचे बी पेरा, *जीवन म्हणजे ख्रिस्त..कारण तो म्हणतो, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे* त्याद्वारे आत्म्यामध्ये देवाचे गौरव होईल. परंतु तेच बी देहाच्या भूमीवर पेरले तर ते कुजून जाईल, सडून जाईल आणि त्याद्वारे काहीच फलप्राप्ती होणार नाही. म्हणून देहाच्या भूमीवर पेरू नका. आम्ही आमच्या जिवंत देवाच्या पवित्र वचनांची पेरणी केली पाहिजे. कारण ती आपण प्रभूसाठी म्हणून केलेली असेल आणि त्यामध्ये पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन आपल्याला मिळेल. आणि त्याच्यापासून मिळणारे फळ म्हणजेच प्रतिफळ किंवा आशीर्वाद हे कायम स्वरूपाचे असतील. पण लक्षात ठेवा की स्वार्थी जीवनातून आत्म्याचे फळ कधीच फलद्रूप होणार नाही. आमची साधनसामग्री आम्ही पापस्वभावाचे किंवा देहाचे चोचले पुरविण्यासाठी लावली, आत्म्याकडे लावली नाही तर वाईट तेच आम्हाला मिळेल. कारण 'पेरणी तशी कापणी' हे तत्व लक्षात ठेवावे. असे असूनही आपण निराश न होता चांगले तेच करीत राहावे. पौल म्हणतो, *चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये, कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. ( गलती ६:९)* म्हणून प्रियांनो, आम्ही न खचता, निराश न होता पवित्र वचनांची पेरणी करीत राहिले पाहिजे. म्हणजे प्रभूपासून आम्हाला चांगले फळ मिळेल. पौल म्हणतो, *प्रभूमध्ये आमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहां, म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. ( १ करिंथ १५:५८)*


*शब्दांनी व कृतींनी आध्यात्मिक विचारांचे, वचनांचे बी पेरा. देवाच्या वचनातून तशाच प्रकारचे फळ मिळेल. आत्म्यांशी वागताना आम्ही कारागिर नसतो. बिघडलेले जीवन दुरूस्त करणे एवढेच आमचे काम नाही तर आम्ही त्यांच्या अंतःकरणात प्रभूच्या पवित्र वचनांची पेरणी केली पाहिजे.*


       

Tuesday, 26 January 2021

रक्तात सुरक्षा



                *✨रक्तात सुरक्षा✨*


*...ज्या ज्या घराच्या कपाळपट्टीवर व दोन्ही बाह्यांवर रक्त लावलेले परमेश्वर पाहील ते ते दार तो ओलांडून जाईल आणि नाश करणाऱ्याला तुमचा नाश करण्यासाठी तुमच्या घरात शिरू देणार नाही..✍🏼*

                  *( निर्गम १२:२३ )*


                           *...मनन...*


           *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!* 


     परमेश्वराने इस्राएल लोकांना मिसर देशातील गुलामगिरीतून सोडविण्यासाठी मोशेला निवडले होते. मोशेने फारोला पुन्हा पुन्हा विनवून सांगितले होते. फारोचे मन पालटावे व त्याने देवाच्या लोकांना जाऊ द्यावे यासाठी देवाने मिसर देशावर नऊ पीडा पाठविल्या परंतु प्रत्येक पीडेच्या आगमनाने फारोचे हृदय अधिकच कठीण होत गेले. अखेरीस मिसर देशातील सर्व प्रथम वत्स मरतील असे देवाने सांगितले. परंतु देवाने त्याच्या लोकांना मात्र यातून वाचविले. इस्राएल लोकांनी वल्हांडणाचा कोकरा वधला नसता आणि त्याच्या उद्धारक रक्ताने त्यांना संरक्षण मिळाले नसते तर तेही या पीडेतून सूटले नसते. देवाने त्याच्या लोकांना कोकरू घेऊन वल्हांडणाचा यज्ञपशू अर्पण करण्यास सांगितले होते. तो कशाप्रकारे अर्पण करावा हे सांगितले होते. *"नंतर एजोब झाडाची एक जूडी घेऊन ती पात्रातील रक्तात बुचकळावी आणि तिने त्यातले रक्त दरवाजाच्या कपाळपट्टीला व दोन्ही बाह्यांना लावावे, आणि सकाळपर्यंत कोणीही घराच्या दाराबाहेर जाऊ नये." ( निर्गम १२:२२)* मृत्यूची पीडा मिसर देशावर येणार होती. इस्राएली लोकांतील जेष्ठ पुत्रांना जिवंत ठेवण्याची योजना देवाच्या न्यायीपणाची साक्ष देते. ते कोकरू व त्याचे रक्त येशू ख्रिस्ताचे व त्याच्या वधस्तंभावर सांडलेल्या रक्ताचे दर्शक आहे. ही पीडा देवाच्या आणि त्याच्या लोकांच्या शत्रूंकरिता होती व त्यांच्यासाठी ती मिसर देशाच्या इतिहासातील काळरात्र ठरली. आपणांपैकी कोणी मृत्यूच्या सत्तेत आहात काय? जर आपल्या पापांची क्षमा झालेली नसेल तर आपण या सत्तेत आहोत.

    आपला प्रभू येशू ख्रिस्ताचे पापांसाठी यज्ञार्पण होऊन त्याच्या अर्पणाद्वारे तो मनुष्यजातीचे देवाबरोबरचे नाते यात समेट घडवून आणणार होता. वल्हांडण सणाचा मुख्य उद्देश देवाची इस्राएल वरील कृपा, प्रेम, अनुग्रह प्रकट करणे हाच होता. इस्राएल लोक देवाच्या कृपेस पात्र होते म्हणून त्याने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले असे नाही तर त्याची त्यांच्यावर प्रीति होती आणि तो आपले अभिवचन पूर्ण करण्यास बांधील होता. वचन सांगते, *परमेश्वराने तुम्हाला पराक्रमी हाताने दास्यगृहातून.. ह्याचे कारण हेच की, तुमच्यावर त्याचे प्रेम आहे, आणि तुमच्या पूर्वजांना त्याने जे शपथपूर्वक वचन दिले होते ते पूर्ण करण्याची त्याची इच्छा आहे. ( अनुवाद ७:८)*

     दाराच्या बाह्यांवर लावलेल्या रक्ताचा उद्देश इस्राएल लोकांतील प्रत्येक कुटूंबातील प्रथम जन्मलेल्या पुत्राचे मृत्यूपासून रक्षण करणे हाच होता. भविष्यामध्ये ख्रिस्त वधस्तंभावर आपले रक्त सांडणार होता, दारावर लावलेले रक्त हे याचेच दर्शक होते. त्याच्या रक्ताने आध्यात्मिक मरण आणि पापाचा अंतिम न्यायदंड यांच्यापासून आमचा बचाव करणे हाच उद्देश यामागे होता. *नियमशास्त्राने सर्व काही होते आणि रक्त ओतल्यावाचून पापक्षमा होत नाही. ( इब्री ९:२२)* वल्हांडणाचे कोकरू हे प्रथम पुत्राच्या बदली यज्ञ म्हणून अर्पण केले गेले, ख्रिस्ताने आमच्या ऐवजी कसे अर्पण केले हे या यज्ञार्पणातून समजते. देवाच्या विरूद्ध पाप केल्याने आम्ही मरणदंडास पात्र होतो परंतु ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला आणि त्याने आमची शिक्षा स्वतःवर घेतली. म्हणूनच पौल ख्रिस्ताला *"वल्हांडणाचा यज्ञपशू*" म्हणत आहे. पौल म्हणतो, *... कारण आपला "वल्हांडणाचा यज्ञपशू" जो ख्रिस्त त्याचे आपल्यासाठी अर्पण झाले. ( १ करिंथ ५:७)* वल्हांडणाचे कोकरू नर निर्दोष, दोषरहित असणे आवश्यक होते. कोकरू हे देवाच्या परिपूर्ण, पापरहित पुत्राचे, ख्रिस्ताचे प्रातिनिधिक आहे. दाराच्या दोन्ही बाह्यांना रक्त लावणे ही आज्ञाधारकपणाची व विश्वासाची कृती होती. इस्राएल लोकांचा बचाव या त्यांच्या विश्वासाने आज्ञापालन करून केलेल्या कृतीमुळेच झालेला आपण पाहातो. या विश्वासामुळेच म्हणजे विश्वासाने आज्ञापालन केल्यानेच आम्हालाही आध्यात्मिक स्वातंत्र्य मिळावे आणि आमचे तारण व्हावे याचसाठी ख्रिस्ताने आपले रक्त सांडले. आम्ही त्या अनमोल रक्ताची आठवण ठेवावी. प्रियांनो, तुमच्या हृदयरूपी दारावर कोकऱ्याच्या रक्ताचा शिक्का लावला आहे का? आम्हाला देवाने नाशापासून वाचविण्यासाठी निवडले आहे. म्हणून आम्ही ख्रिस्ताच्या रक्ताच्या सुरक्षेच्या बाहेर जाऊ नये. 


         

Monday, 25 January 2021

कृपेचे धन



                 *✨कृपेचे धन ✨*


*"त्याच्या कृपेच्या विपुलतेप्रमाणे त्या प्रियकरात त्याच्या रक्ताच्या द्वारे आपल्याला मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा मिळाली आहे."*✍

                      *(इफिस १:७)*


                           *...मनन...*


           *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


    आपण कृपेच्या काळात अगदी शेवटच्या क्षणी येवून ठेपलो आहोत. आपण पापात होतो, देवाच्या इच्छेविरुद्ध वागणारे होतो. जग आणि जगातील गोष्टीमध्ये आपण स्वतःला पूर्णपणे झोकून दिले होते. आपले जीवन त्या कधीही न विझणाऱ्या अग्नीच्या सरोवराकडे चालले होते. त्या दुष्टाच्या राज्यात आपला प्रवेश होणार होता. पण प्रभुने आपणावर महान प्रीति केली. आपल्याला त्या बंधनातून बाहेर आणायची योजना आखली आणि त्याच्या एकुलत्या एक पुत्राला आपल्या साठी दिले.


    होय, प्रियांनो मी आपल्यासाठी त्या वधस्तंभावर खिळलेला जो येशू त्याविषयी बोलत आहे. त्याच्या पवित्र रक्ताने त्याने आपले सर्व पाप धुवून काढले आणि आपल्याला पवित्र बनवले. हि आपल्या प्रभू येशूची कृपा नाही तर काय म्हणावे! हे आपणासाठी एक धन आहे.. "कृपेचे धन!" पापांच्या क्षमेद्वारे आपल्याला कृपेचे धन प्राप्त होते. जेव्हा आपण येशूकडून क्षमा प्राप्त करतो, तेव्हा आपल्या जीवनात कृपा येते. तसेच जेव्हा आपण इतरांना क्षमा करतो तेव्हा कृपेची विपुलता आपल्यामध्ये येते. आपण जेवढी क्षमा करू तेवढे कृपेचे धन आपण प्राप्त करू. पौल म्हणतो की, *तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा; जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हांला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. (इफिस ४:३२)* त्यामुळे आपल्याला सदैव क्षमा करणाऱ्या आत्म्याची गरज आहे. आपल्या आत्म्यामध्ये कोणतीच चिडचिड, द्वेष, (नाराजी) किंवा वाईट भावना असू नये. आपण जेव्हा इतरांना क्षमा करणार नाही, तेव्हा आपण कृपेचे धन गमावतो. प्रतिदिवशी आपण आत्मपरिक्षण केले पाहिजे. "हे प्रभो, माझ्या हृदयात कोणती नाराजी आहे का? मी माझ्या हृदयात कडूपणा राखलाय का?"


    *.... त्याच्या कुशीत भाला भोसकला; आणि लगेच रक्त व पाणी बाहेर निघाले. (योहान १९:३४)* जेव्हा येशूच्या कुशीत भोसकण्यात आले तेव्हा लागलीच त्यातून रक्त आणि पाणी वाहू लागले. रक्त हे क्षमा दर्शविते आणि पाणी प्रेम व कृपा दर्शविते. जेव्हा आपल्याला भोसकण्यात येते म्हणजे लोक आपल्या विरुद्ध बोलतात, निंदा, छळ, अपमान करतात तेव्हा क्षमा आणि क्षमा करणारे प्रेम लगेच आपल्या हृदयातून बाहेर यायला पाहिजे, त्याठिकाणी त्याचे *'कृपेचे धन'* असणार. जेव्हा आपल्याकडे कृपेची विपुलता असेल तेव्हा इतर निष्फळ लोकांमध्ये आपण फलदायी बनू आणि सर्वदा हिरवेगार राहू. जेव्हा सर्व झोपेत असतील तेव्हा आपण जागृत राहून प्रार्थना करू शकू. जेव्हा सर्व लोक निराश अवस्थेत असतील तेव्हा आपण उत्साहित होऊ. आणि इतरांनाही उत्साहीत करू शकू. कृपेलाच हे शक्य आहे. जेव्हा सर्व लोकांची आत्मिक जीवनात अधोगती होत असेल आणि पवित्र जीवन व्यतित करणे त्यांना अशक्य वाटेल त्यावेळी देवाची कृपाच आपल्याला अधिकाधिक देवाच्या पवित्रतेविषयी बोध करेल. *"त्या एकाच्या अपराधाने, त्या एकाच्या द्वारे, मरणाचे राज्य चालू झाले. तर त्यांस कृपा व नीतीमत्वाचे दान यांची विपुलता मिळते ते विशेषेकरून त्या एका येशू ख्रिस्ताच्याद्वारे जीवनात राज्य करितील."  (रोम ५:१७)* आपण जर या विपूल कृपेमध्ये वाढत गेलो तर नक्कीच खिस्त आपल्यामध्ये राज्य करेल.


        

परमेश्वराला अनुसरून चाला



      *✨परमेश्वराला अनुसरून चाला✨*


*कारण हा देव आमचा सनातन देव आहे, तो सर्वकाळ आमचा मार्गदर्शक होईल..✍*

                   *(स्तोत्र ४८:१४)*


                           *...मनन...*


           *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


     ह्या सुंदर वचनाद्वारे आपण पाहातो की, परमेश्वर खरोखरच आमचे मार्गदर्शन करतो. पण कधी ? आपण त्याचे ऐकले नाही तर तो आपल्याला मार्गदर्शन करणार नाही किंवा आपले साहाय्य करणार नाही. परंतु जे त्याच्या मार्गाने चालतात त्यांना मात्र तो खूप आशीर्वादित करतो. स्तोत्रकर्ता म्हणतो, *हे परमेश्वरा, तुझे मार्ग मला दाखीव, तुझ्या वाटा मला प्रगट कर. ( स्तोत्र २५:४)* होय प्रियांनो, आपणही परमेश्वराजवळ हीच विनंती केली पाहिजे. खरा विश्वासणारा त्याच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराला प्रथम स्थान देतो, त्याला अनुसरण्यास तो नेहमीच तयार असतो. आणि त्यासाठी तो परमेश्वराचे मार्ग, परमेश्वराच्या वाटा जाणून घेण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. आम्ही जे करावे अशी देवाची आमच्याकडून इच्छा असते, ते करण्यासाठी आपण आपले सर्व सामर्थ्य खर्च करावे. आपल्याला बऱ्याच वेळा असे वाटते की माझ्याच शहाणपणाने किंवा माझ्याच शक्तीने मी सर्व चांगल्या गोष्टी करीत आहे परंतु देवाच्या साहाय्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही, म्हणून देवाच्या मार्गदर्शनाने आपण चालावे. त्याच्या हाताखाली आपण लीन आणि नम्र व्हावे. पापांबद्दल पश्चाताप करून, आपल्या पापांची जबाबदारी स्वीकारून ते सोडून द्यावेत. म्हणजे परमेश्वर आपल्या पापांची क्षमा करून आपल्याला सर्व प्रकारचे साहाय्य करील.आपण वाइटाला धरून बसलेले आणि चांगुलपणाचा केवळ मुखवटा धारण केलेले असे नसावे. देव मनुष्याच्या पापांचा तिटकारा करतो परंतु तो त्याच्यावर प्रेमही करतो. 


    म्हणून प्रियांनो, जोवर जीवन आहे तोवर आशा आहे. मनुष्याने आपली पापे कबूल करून सोडून द्यावीत, पश्चाताप करून देवाच्या मार्गदर्शनाने चालावे, म्हणजे तो त्याचे विधी पाळणाऱ्यांना मार्ग दाखवतो, त्यांना हाती धरितो. स्तोत्रकर्ता म्हणतो की, *तो नम्र जनांना न्यायपथाला लावतो. तो दीनांना आपला मार्ग शिकवितो. ( स्तोत्र २५:९)* त्याच्या मार्गाने चालणारे विश्वासू लोक सदैव त्याची आठवण ठेवतात, आणि त्याला न आवडणाऱ्या गोष्टी ते करीत नाही. आपण देवाकडे वळलो तर तो आपले पाय जाळ्यांतून सोडवील. स्तोत्रकर्ता म्हणतो, *माझे नेत्र परमेश्वराकडे नित्य लागले आहेत, म्हणून तो माझे पाय जाळ्यातून सोडवील. ( स्तोत्र २५:१५)* आम्ही आमचे नेत्र आमच्या उत्पन्नकर्त्याकडे लावले तर तो जगातील सर्व प्रकारच्या मोहपाशांपासून आपल्याला सोडवील आणि देवाची सेवा करण्यासाठी आपल्याला मुक्त करील, स्वतंत्र करील. अशा आशीर्वादित माणसाबद्दल लिहिले आहे की, *तुझा प्रकाश अंधकारात झळकेल, निबिड अंधकार तुला मध्यान्हाचे तेज असा होईल. (यशया ५८:१०)* होय प्रियांनो, आमच्या आजूबाजूला कितीही दुःख, नैराश्य, संकटे, अंधकार, अशांतता असली तरी आम्ही आनंदी आणि देवाच्या छत्रछायेखाली सुरक्षित असे असू. आपल्याला परमेश्वराचे मार्ग समजतील व आपण त्याच्याच मार्गाने चालू. तो म्हणतो, *परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल, तो अवर्षणसमयी तुझ्या जिवास तृप्त करील, तुझ्या हाडांना  मजबूत करीन. (यशया ५८:११)* आपले चांगले पोषण व्हावे म्हणून तो अवर्षणसमयी सुद्धा आपल्याला सर्व चांगल्या गोष्टींचा पुरवठा करून आम्हाला तृप्त करील आणि आपली हाडे मजबूत करील. कमकुवत हाडे असतील तर माणसाचे मन आणि शरीर दोन्हीही खंगत जातात, परंतु देव आपल्याला बलवान करीत आहे. आमच्या शरीरासाठी पोषक असणारे अन्न देऊन आम्हाला आशीर्वादित करीत आहे. आमच्या आध्यात्मिक उन्नत्तीसाठी आम्हाला साहाय्य करीत आहे.


     परमेश्वराच्या मार्गदर्शनाने चालणाऱ्या माणसाचे जीवन, *भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे आणि पाणी कधीच न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे होईल. ( यशया ५८:११)* म्हणजेच आपल्याला नवजीवन मिळून आपली चांगली जोपासना, चांगली वाढ, उन्नत्ती होईल. आणि आपण विपुल फळ देणारे असे होऊ. म्हणून प्रियांनो, देवच आपल्याला मार्ग दाखवितो, त्याच्या मार्गदर्शनाशिवाय, त्याच्या सामर्थ्याशिवाय आणि त्याच्या साहाय्याशिवाय आपण बलहीन आहो, हे आपण ओळखावे आणि त्याच्याच मार्गाने चालावे. आपण नेहमी नम्र व आज्ञाधारक असावे. देवाच्या इच्छेप्रमाणे सदाचरण करावे म्हणजे तो आपल्याला आशीर्वादित करील.