Wednesday, 30 December 2020

अजून कोठवर ?



            *✨अजून कोठवर ?✨*


 *हे परमेश्वरा, तू मला कोठवर विसरणार ? सर्वकाळ काय ? तू माझ्यापासून आपले मुख कोठवर लपवणार ?..✍🏼*

                   *( स्तोत्र १३:१ )*


                           *...मनन...*


           *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!* 


    "कोठवर ?" असा प्रश्न कधी ना कधी आपल्या सर्वांनाच पडतो. कोठवर ? हा प्रश्न यशया आणि हबक्कुक या देवाच्या विश्वासू संदेष्ट्यांनीही विचारला. ( यशया ६:११, हबक्कुक १:२) त्याचप्रमाणे आमच्या प्रभू येशू ख्रिस्तानेही लोकांच्या अविश्वासू असण्याबद्दल म्हटले, *"हे विश्वासहीन व कुटिल पिढी ! मी कोठवर तुम्हांबरोबर असू ? कोठवर तुमचे सोसू ?" ( मत्तय १७:१७)* कशामुळे आम्हाला असा प्रश्न पडतो ? कदाचित अन्याय, दीर्घकाळ चालू असणारे आजारपण, वाढत्या वयातील वेगवेगळ्या समस्या, आसपासच्या लोकांच्या वागण्यातील चुकीची प्रवृत्ती पाहून निराश झाल्यामुळे इत्यादि अनेक गोष्टी आपल्या समोर समस्या बनून उभ्या असतात. परंतु आमचा भरवंसा आमच्या देवावर असला पाहिजे दाविद राजाप्रमाणे. आम्ही अशावेळी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली पाहिजे. याकोब लिहीतो, *"माझ्या बांधवांनो, प्रभूच्या उपस्थितीपर्यंत धीर धरा." ( याकोब ५:७)* स्तोत्रकर्ता म्हणजे दाविद राजा खूप खिन्न, खचलेला आणि उद्विग्न झालेला दिसत आहे. दाविद राजाला शत्रूंनी चोहोकडून घेरलेले आहे. अशा वेळी शोकाच्या परिणामातून तातडीच्या प्रार्थनेचा स्वर उमटतो. आणि पालट झाल्याच्या अनुभवातून शांती, विसावा लाभतो. खऱ्या प्रार्थनेत गरजेची प्रत्येक बाजू देवापूढे मांडली जाते. दाविद परमेश्वराची प्रार्थना करत आहे आणि प्रार्थनेचे उत्तर मिळाले म्हणून दाविद परमेश्वराची स्तुती करत आहे, तो म्हणतो, *"परमेश्वराने माझ्यावर फार उपकार केले आहेत, म्हणून मी त्याची स्तुतीस्तोत्रे गाईन." ( वचन ६)*


    या ठिकाणी हा प्रसंग शौलासंबंधी आहे. दाविद परमेश्वराकडे या शत्रूचा ( शौलाचा) नाश व्हावा अशी विनंती करीत नाही. कारण संधी मिळाली असूनही त्याने शौलाला मारले नाही हे आपण पाहातो. दाविद म्हणतो, *परमेश्वराच्या अभिषिक्तावर आपला हात टाकायचे माझ्याकडून न घडो. ( १ शमुवेल २६:११)*  देव खूप दूर असल्यासारखे वाटते तेव्हा आम्ही खचून जातो, आमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत असे वाटते. दीर्घकाळापासून होणारे क्लेश आम्हाला त्रासून सोडतात. आम्हाला ताबडतोब, एका क्षणात उत्तर हवे असते. पण काही गोष्टी लगेच सुस्थिर करता येत नाहीत. त्या सोसाव्याच लागतात. पण देवाच्या लोकांनी काही महत्वपूर्ण गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. नीतिमान लोकांच्या प्रार्थनेची उत्तरे कदाचित लवकर मिळणार नाहीत, पण देव त्यांच्या प्रार्थना ऐकतोच ऐकतो. आजार, आर्थिक अडचण किंवा काही अवघड कौटूंबिक समस्यातून जात असताना देवाने आपल्याला सोडल्याची भावना आपल्याला होते. अशा वेळी पवित्र आत्म्याने आपल्याला शांती व धीर द्यावा अशी प्रार्थना करावी. पवित्र शास्र आम्हाला शिकवते की, आपण आत्मिकरित्या तारले गेलो आहोत आणि देवाबरोबर आपले व्यक्तिगत नाते आहे. ते भावना किंवा परिस्थितीवर आधारित नाही, तर आमच्या ठायी असलेल्या दृढ विश्वासाद्वारे आहे. ही वस्तुस्थिती आपल्याला आनंदी व प्रसन्न होण्यास कारण होते. 


     प्रियांनो, जर आपण येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे देवावर विसंबून राहात आहोत तर मग देवाने आपल्या प्रार्थनेच्या उत्तराला केलेल्या उशिराचा अर्थ त्याने आम्हाला सोडून दिले आहे असा होत नाही. उलट आपल्या जीवनाद्वारे काही तरी उद्देश सिद्धिस न्यावा अशी त्याची योजना असू शकते. ( पाहा २ करिंथ १२:७-१०, इब्री १२:१०,११) आम्ही आमच्या अडचणीत, संकटात देवाला आपली गाऱ्हाणी सांगू शकतो. आम्ही त्याचे साहाय्य मागावे ही त्याची इच्छा आहे. दुःख, क्लेश संपतीलच असे नाही, परंतु दाविद राजाने दुःख- संकटातही स्तोत्रे लिहीली, गीते गाईली कारण त्याला माहीत होते तो देवाचे लेकरू आहे, देव त्याला साहाय्य करण्यास समर्थ आहे. काय आम्ही देवाचे लाडके मूल आहोत काय ? देव आम्हाला साहाय्य करण्यास समर्थ आहे यावर आमचा विश्वास आहे काय ? प्रियांनो, आम्ही दुःख- संकटातही देवाच्या प्रीतीवर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे, देवाच्या हाती सर्व सोपवून विश्वासाने त्याच्यावरच अवलंबून राहिले पाहिजे.


ए. डब्ल्यू. थोरोल्ड लिहीतात की, *"आध्यात्मिक जीवनाचे शिखर अखंड सूर्यप्रकाशात सुखानंद अनुभवणे नाही तर देवाच्या प्रीतीवर निःशंक आणि परिपूर्ण विश्वास हेच ते शिखर आहे."*


         

Tuesday, 29 December 2020

वचन जपा



                  *✨वचन जपा✨*


*शिवाय अधिक निश्चित असे संदेष्ट्याचे वचन आमच्याजवळ आहे; ते काळोख्या जागी प्रकाशणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे; तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल..✍🏼*

                     *( २ पेत्र १:१९ )*


                           *...मनन...*


           *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!* 


    पेत्र आपल्या पत्रात एका विशिष्ट गोष्टीचा उल्लेख करीत आहे. आपण काल बघितले होते की उत्तरेकडून सुवर्णप्रभा येत आहे, ज्या सीयोन पर्वतावर आपला प्रभू विराजमान आहे. जे आपल्या प्रभूचे नगर आहे. आजही प्रभू प्रकाश याविषयी आपल्याला बोलत आहे. कारण प्रभू येशूचे आगमन जवळ आले आहे. होय, आपला प्रभू येशू आपल्या असंख्य देवदूतांसह लवकरच येत आहे. म्हणून पेत्र बोलत आहे की संदेष्ट्याचे वचन आमच्याजवळ आहे.. ते वचन काय आहे याविषयी तो लिहितो की, ते काळोख्या जागी प्रकाशणाऱ्या दिव्यासारखे आहे. म्हणजेच देवाचे वचन हे दिवा आहे. ते प्रकाश देणारे आहे. त्या प्रकाशात आपल्याला चालायचे आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो, *तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. ( स्तोत्र ११९:१०५)* प्रभू येशू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे.. होय, हा प्रकाश खरा प्रकाश आहे. या जगातील दिवे, विद्युत दिवे, आकाशातील सूर्य, चंद्र आणि तारे हे सर्व या प्रकाशापूढे फिके आहेत. या सर्वांपेक्षा अधिक तीव्र आणि प्रखर असा हा प्रकाश आहे. दिव्य तेजाने युक्त असा हा अत्यंत तेजस्वी प्रकाश आहे. प्रभू येशू ख्रिस्त हाच जगाचा प्रकाश आहे हे आपण कसे समजू शकतो ? जेव्हा प्रभू येशूला वधस्तंभावर खिळले आणि त्याने आपला प्राण पित्याच्या हातात सोपवला तेव्हा संपूर्ण जगभर अंधार पडलेला आपण पाहातो. वचन सांगते, *सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पडला. ( मार्क १५:३३)* यावरून आम्हाला समजू शकते की आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा खरोखरच प्रकाश आहे.


    वरील वचनाद्वारे आता पेत्र असे बोलत आहे की, हे जे वचन आहे, किंवा हा जो प्रकाश आहे, किंवा हा जो दिवा आहे तो आपल्याला दिवस उजाडेपर्यंत व पहाटेचा तारा उगवेपर्यंत म्हणजे ख्रिस्ताच्या आगमनापर्यंत सांभाळला पाहिजे, जपला पाहिजे. जे देवाचे वचन आपण आपल्या जीवनात स्वीकारले आहे ते येशूच्या आगमनापर्यंत आपल्याला टिकवता आले पाहिजे. कारण वचनात जीवन आहे. दिव्यासारखे प्रकाशने म्हणजे आपण पूर्ण पावित्र्य, शुद्धता राखले पाहिजे. कारण देवाचे वचनच आपल्याला शुद्ध करते. वचनाच्या द्वारे आपण रोज शुद्ध आणि पवित्र होऊन सदैव देवाचा महिमा केला पाहिजे. आपले पावित्र्य जर आपण राखले तर आज जरी प्रभू येशूचे आगमन झाले तरी आपल्याला काहीच भीती नसणार. आपण निश्चितच प्रभूच्या आगमनात उचलले जाणार. 


    म्हणून प्रियांनो, जग आणि जगातील गोष्टींकडे लक्ष केंद्रित न करता आपण आपल्या प्रभूला प्रसन्न केले पाहिजे. आमच्या प्रभूला कशाने संतोष होईल हे प्रथम पाहिले पाहिजे. आम्ही सर्व परिस्थितीत त्यालाच प्रथम स्थान दिले तर तो विश्वासयोग्य देव आहे. तो आपल्याला त्या अंधःकारापासून सुरक्षित ठेवील. योहान आपल्या पत्रात लिहितो की, *जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तो तुम्हाला विदित करतो; तो संदेश हा की, देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठायी मुळीच अंधार नाही. ( १ योहान १:५)* म्हणून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणात जागा द्यायला पाहिजे. म्हणजे अंतःकरणात असलेली सर्व अंधाराची कामे नष्ट होतील. योहान म्हणतो, *तरी एकप्रकारे मी तुम्हांस नवी आज्ञा लिहितो. ती त्याच्या व तुमच्या बाबतीत खरोखर तशीच आहे; कारण अंधार नाहीसा होत आहे, व खरा प्रकाश आता प्रकाशत आहे. ( १ योहान २:८)* खरोखरच आमचा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला, जे आम्ही पूर्वी अंधकारात होतो, त्या आपल्या सर्वांना काळोखातून प्रकाशात आणण्यासाठी प्रकाश असा या भूतलावर आला आहे. वचन सांगते, *त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून तू त्यांचे 'डोळे उघडावे,' आणि त्यांच्या पापांची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे. ( प्रे. कृत्ये २६:१८)*


       

Monday, 28 December 2020

उत्तर दिशेकडे वळा



          *✨उत्तर दिशेकडे वळा✨*


*"तुम्ही ह्या डोंगराभोवती पुष्कळ दिवस फिरत राहिलां आहां; आता उत्तरेकडे वळा;"..✍🏼*

                  *( अनुवाद २:३ )*


                           *...मनन...*


           *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!* 


      इस्राएल लोकांनी तांबडा समुद्र पार करून अरण्यात प्रवास केला. तेव्हा अनेक दिवस ते सेईर प्रदेशातून तेथील डोंगर भागात फिरत राहिले होते. आपण पाहातो की अरण्यात असताना परमेश्वराने त्यांची प्रत्येक गरज पूर्ण केली होती. देवदूतांचे अन्न म्हणजेच स्वर्गीय मान्ना त्यांना देवाने खावयास देऊन त्यांना तृप्त केले. वचन सांगते की, त्यांचे वस्त्र कधी जूने झाले नाहीत किंवा जीर्ण झाले नाहीत, इतका दूरचा प्रवास करत असतानाही त्यांचे पाय देखील कधी सूजले नाहीत, त्यांच्या चपला झिजल्या नाहीत. इतकेच केवळ नाही तर अगदी त्यांनी मांस खाण्यासाठी कुरकुर केली तर ती देखील त्यांची इच्छा परमेश्वराने पूर्ण केली. कारण परमेश्वर त्यांच्यावर प्रेम करीत होता. परंतु आपण पाहातो की, त्या इस्त्राएल लोकांपैकी कित्येक लोकांनी परमेश्वराचे भय धरले नाही. त्यांनी कधी परमेश्वराला धन्यवाद दिला नाही. कित्येक लोकांवर परमेश्वराचा कोप भडकून त्याने अग्नीने त्यांचा नाश केलेला देखील आपण वाचतो. 


    होय प्रियांनो, या वर्षात प्रभूने कशाप्रकारे तुम्हाला चालवले याची आठवण करा. कशाप्रकारे प्रभूने आम्हाला सांभाळले त्याची आठवण करा. कोरोनासारख्या महारोगातून त्याने आम्हाला सुरक्षित ठेवले. अनेक वेळा संकटे आली, वादळ वारे आले, महापूर आला... परंतु आपला विश्वासयोग्य परमेश्वर सदोदित  आपल्या बरोबर होता. त्याने सर्व काही शांत केले. या कठीण परिस्थितीमध्ये देखील अजूनही त्या इस्त्राएल लोकांसारखे आजचे काही विश्वासणारे दिसून येतात. ते मनापासून परमेश्वराचे भय बाळगीत नाही, त्याचा धन्यवाद करीत नाही, आपल्या जीवनात प्रभूला प्रथम स्थान देत नाही. याउलट आज अनेक लोक स्वतःच्याच उदोउदो करताना दिसून येतात. ते स्वतःचे प्रदर्शन करीत आहेत. आणि ज्या देवाने, ज्या प्रभू येशूने तुम्हाला आम्हाला सुरक्षित ठेवले, सुखरूप ठेवले त्याचा महिमा करताना, स्तुती करताना दिसत नाहीत. प्रवासात प्रभूने वाचवले. कामाच्या ठिकाणी, येतांना जातांना सुरक्षित ठेवले, घरातील काम करीत असताना आपल्या सर्व बहिणींना सांभाळले. आजार, कष्ट, दुःख यात प्रभूने अधिक कृपा दिली. आम्हालाच केवळ सांभाळले असे नाही तर आपली आई,वडील, बहीण, भाऊ, पती पत्नी, मुले, इतर आप्त या सर्वांनाही प्रभूने मोठ्या करुणेने सांभाळले. प्रियांनो, परमेश्वराने अजून आपल्यासाठी काय करायला हवे ? प्रियांनो, प्रभूला सर्व गोष्टींसाठी मनापासून धन्यवाद द्या. त्याची उपकारस्तुती करा.


    पूढे वचनात आपण पाहातो की, आता परमेश्वराची इच्छा आहे की आपण उत्तरेकडे वळावे.. होय उत्तर दिशेलाच आपले उत्तर आहे. का आपल्याला उत्तर दिशेला वळायचे आहे ? काय आहे उत्तर दिशेला ? प्रियांनो, कारण उत्तर दिशेकडून एक सुवर्णज्योत आपल्याकडे येत आहे. तो महान गौरव आपल्याकडे येत आहे, ते पवित्र तेज आपल्याकडे येत आहे. मोशे परमेश्वराला भेटण्यासाठी जेव्हा पर्वतावर जात असे, जेव्हा तो परत येई तेव्हा त्याचे मुख त्या सुवर्ण तेजाने भरलेले असे. आज त्या तेजाची आपल्याला गरज आहे. ते तेज आपल्यातील अंधकार दूर करील. ते तेज आपल्यातील दुष्ट विचार नष्ट करील. ते तेज तुम्हाला आणि मला प्रकाशित करील. वचन वाचू या.. *उत्तर दिशेकडून सुवर्णप्रभा येते, देव भयजनक तेजाने मंडित आहे. ( ईयोब ३७:२२)* 


    होय प्रियांनो, चला आपण उत्तरेकडे जाऊ या. आपला परमेश्वर भयजनक तेजाने, महिम्याने भरलेला आहे. ही सुवर्णप्रभा येते कोठून ? असे आहे तरी काय उत्तर दिशेकडे ? सूर्याच्या किरणांपेक्षाही तेजस्वी किरणे आहेत ही. संपूर्ण शरीर नाही तर आत्मा, प्राण, शरीर तेजस्वी करणारी ही सुवर्णप्रभा आहे. हीच सुवर्णप्रभा आपल्याला पूर्ण पवित्र, शुद्ध करीत आहे. कशासाठी पवित्र करत आहे ? प्रभूच्या राज्यासाठी, सार्वकालिक जीवनासाठी. उत्तर दिशेला कोण आहेत ? आपण बघूया... स्तोत्रकर्ता म्हणतो, *उत्तर सीमेवरील सीयोन डोंगर, राजाधिराजाचे नगर, उच्चतेमुळे सुंदर व सर्व पृथ्वीचा आनंद आहे. ( स्तोत्र ४८:२)* किती सुंदर !! उत्तर दिशेकडे सीयोन डोंगर आहे.. जे आपल्या देवाचे नगर आहे... होय प्रियांनो, सीयोन डोंगराकडे त्या उत्तर दिशेकडे जाऊ या. या संपूर्ण वर्षात अनेक वेळा आपण प्रभूपासून दूर गेलो असू, पण आता प्रभू येशूचे आगमन जवळ आले आहे. आज पूर्ण मनाने आपण एक निश्चय करू या आणि प्रभूला आमच्या जीवनात प्रथम स्थान देऊया. तेव्हाच त्याचा महिमा, त्याचे तेज आपल्यावर पडेल आणि येशूच्या आगमनात आपण उचलले जाऊ.


         

Saturday, 26 December 2020

अतिपवित्र देव



              *✨अतिपवित्र देव✨*


*आणि जे दिसले ते इतके भयंकर होते की, मोशे म्हणाला, ' मी अति भयभीत' व ' कंपित' झालो आहे.. ✍*

                    *( इब्री १२:२१)*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


    इस्राएल लोकांना देवाने नियमशास्र दिले तेव्हा ते सिनाय पर्वताजवळ राहात होते. देवाने त्यांना प्रगट व्हायचे ठरविले तेव्हा त्याने त्या सर्वांना पवित्र आणि शुद्ध होण्यास सांगितले होते. नंतर आपण पाहातो की, पर्वतावर मेघ उतरले. विजा चमकू लागल्या आणि भूमिकंप झाला. तेव्हा त्यासमयी मोशेला सुद्धा भिती वाटली. परमेश्वर देव हा अतिपवित्र असून तो मनुष्य नाही किंवा मनुष्यांपैकी कोणी नाही. तो अति थोर न महान देव आहे हे इस्राएल लोकांना समजावे म्हणून तो अशाप्रकारे प्रगट झाला. *सर्व सिनाय पर्वतावर धूर पसरला कारण परमेश्वर अग्नीतून त्याच्यावर उतरला. भट्टीच्या धूरासारखा त्याचा धूर वर चढला व सर्व पर्वत थरथरू लागला. शिंगाचा आवाज अधिकच वाढू लागला तेव्हा मोशे बोलू लागला व देव त्याला आपल्या वाणीने उत्तर देत गेला. ( निर्गम १९:१८,१९)* खरोखरच देव किती पवित्र आहे हे आम्ही समजून घेतले पाहिजे. 


    परमेश्वराने ख्रिस्तामध्ये जो नवा करार केला आहे त्याप्रमाणे आपण स्वर्गीय स्थानाकडे आलो आहोत. आपण सियोन पर्वत म्हणजेच जिवंत देवाचे नगर, स्वर्गीय यरूशलेमेत आलो आहोत. तेथे लाखो देवदूत आहेत. ही नगरी देवाच्या खऱ्या मंडळीचे दर्शक आहे. प्रभूच्या मंडळीतील त्याचे सर्व लोक हे स्वर्गीय राज्याचे वारीस आहेत. देव खरा न्यायाधीश आहे आणि तो खऱ्या आणि स्वर्गीय ज्ञानाने सर्वांचा न्याय करील. ते सर्व प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे नीतिमान ठरविण्यांत आले आहेत. परमेश्वराने त्यांच्याबरोबर जो नवा करार केला आहे तो स्थिर आहे. कारण ह्या कराराचा मध्यस्थ स्वतः प्रभू येशू ख्रिस्तच आहे. त्याचे रक्त क्षमेसाठी ओतले गेले आहे. *नव्या कराराचा मध्यस्थ येशू, आणि शिंपडण्याचे रक्त ह्यांच्याजवळ आला आहात, त्या रक्ताचे बोलणे हाबेलाच्या रक्ताच्या बोलण्यापेक्षा उत्तम आहे. ( इब्री १२:२४)* हाबेलाचे रक्त हे *'न्याय कर'* अशी हाक मारते, तर ख्रिस्ताचे रक्त *'क्षमा कर '* अशी हाक मारते. 


    देवाने सिनाय पर्वतावरून इस्राएल लोकांना आज्ञा दिल्या होत्या. त्यांनी त्या मानल्या नाहीत त्यामुळे देवाचा क्रोध त्यांच्यावर पडला व अविश्वास आणि आज्ञाभंग ह्यामुळे हजारोंचा रानात नाश झाला. देवाने ख्रिस्ताला ह्या जगात पाठविले व तो त्याच्याद्वारे आमच्याबरोबर बोलत आहे. *तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे, त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारीस करून ठेविले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. ( इब्री १:२)* आणि पूढे असेही म्हटले आहे की, जे प्रभू येशू ख्रिस्ताचे ऐकणार नाहीत त्यांचा निभाव लागणार नाही. *कारण पृथ्वीवर आज्ञा सांगणाऱ्यांचा अवमान करणारे जर निभावले नाहीत, तर स्वर्गातून आज्ञा सांगणाऱ्यांपासून बहकल्यास आपण विशेषेकरून निभावणार नाही. ( इब्री १२:२५)*


    परमेश्वर इस्राएलाशी बोलला तेव्हा पर्वत थरथरले व देवाचे गौरव प्रगट झाले. आणि पृथ्वी किती अस्थिर किंवा हलणारी आहे हे त्यांना समजले. परमेश्वराचा क्रोध ह्या जगावर येईल तेव्हा आकाशातील ग्रह व तारे हेसुद्धा कंपायमान होतील. कारण सेनाधीश परमेश्वर म्हणतो, *आणखी एकदा लवकरच मी आकाश व पृथ्वी, समुद्र व कोरडी जमीन, ही हलवून सोडीन. ( हाग्गय २:६)* प्रियांनो आम्ही ख्रिस्ताच्या वाणीकडे लक्ष दिल्यामुळे कधीही न हलणाऱ्या, स्थिर अशा देवाच्या राज्यात आलो आहोत म्हणून देवाचे उपकार मानू या. देवाने आपल्याला सोपविलेली जबाबदारी म्हणजेच देवाची सेवा, त्याचे आदरयुक्त भय धरून त्याची सेवा करूया. जेणेकरून देवाला संतोष होईल अशाप्रकारे आमचे आचरण असावे..  *सदासर्वकाळ आमच्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा प्रभू येशू त्याच्याकडे सदैव पाहात राहू या.*

 

*देवाच्या दृष्टीने त्याला संतोष देणारे जीवन जगण्यास स्वतः प्रभू आम्हाला साहाय्य करील.*


      

Friday, 25 December 2020

ज्ञानी होऊ या


               

               *✨ज्ञानी होऊ या✨*

      

 *“यहूद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करण्यास आलो आहोत.” (मत्तय २:२)*


                           *...मनन...*


           *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!* 


    आपण या वचनातून थोडक्यात मागी /ज्ञानी लोकांनी यरुशलेमच्या लोकांना केलेला प्रश्न वाचतो. आपण कल्पना करू शकतो की या ज्ञानी लोकांनी/ज्योतिष्यांनी फक्त येशूला शोधण्यासाठी दुरच्या पूर्वेकडून मध्य पूर्वेकडे, मोठ्या किंमतीवर कितीतरी मैलांचा प्रवास पूर्ण केला असेल. हे ज्ञानी लोक सत्याच्या शोधात कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार होते. 


   येशूचा जन्म यरुशलेमपासून सहा मैलांच्या अंतरावर बेथलहेममध्ये झाला होता. सर्व प्रकारचे आध्यात्मिक उपक्रम यरुशलेममध्ये घडले. संपूर्ण जगाचे सर्व प्रमुख आणि मुख्य नेते यरुशलेममध्ये असत, परंतु त्यांच्यातील कोणीही येशूला शोधण्याचा प्रयत्न केला नाही, करीत नाही. केवळ बाहेरील लोक-ज्ञानी लोकांनी जे दुसर्‍या संस्कृतीचे होते, ते येशूचा शोध घेत होते.


    बेथलेहेममधील व्यापारी नेत्यांनाही ते समजले नाही.आणि आपण जरी त्याला शोधले नाही किंवा तो आपल्याला सापडला नाही तर आपणही त्याला समजू शकणार नाही. प्रभू येशू म्हणतो सत्य तुम्हांस समजेल व सत्य तुम्हांस बंधमुक्त करील. पण ते ज्ञानी, ज्योतिषी येशूचा शोध घेत होते. सत्याचा शोध घेत होते. ते देवाला शोधण्यासाठी खूप उत्सुक होते. त्याला मिळविण्यासाठी ते कोणत्याही प्रमाणात जाण्यास तयार होते. म्हणजेच, आपणही तेच केले पाहिजे. देवाला शोधण्यासाठी आपण आपल्या वाटेच्या मध्यभागी काहीही अडखळण असले तरी ते पार केले पाहिजे.


    येशू म्हणाला की स्वर्गातील राज्य त्या मोत्यासारखे आहे, ज्याकडे जाण्यासाठी आपण सर्व काही विकायला तयार आहोत. येशूच्या जन्माविषयी भूतकाळाच्या त्या ज्ञानी लोकांना/ज्योतिष्यांना हे अगदी चांगले समजले असावे असेच यातून दिसते.


    हे ज्ञानी लोक प्रभू येशूला शोधण्यासाठी, त्याची उपासना करण्यासाठी सर्वकाही सोडून त्याग करण्यास तयार होते. आपल्या घराच्या सर्व सुखसोयींचा त्याग करुन त्यांचा तो वेळ दीर्घ आणि कठीण प्रवासात गेला कारण त्यांचा एक चांगला आणि खरा हेतू होता आणि तो म्हणजे येशूला शोधायचा. कारण त्यांना त्याची उपासना करायची होती.


    ज्ञानी (मागी) लोक माझ्यासाठी ख्रिसमसच्या कथेतील ही सर्वात आकर्षक व्यक्तिरेखा आहेत. आम्हाला त्यांच्याबद्दल फारसे माहिती नाही. ते कोण आहेत आणि कोठून आले हे आम्हाला ठाऊक नाही. पवित्र शास्त्र त्यांना "मागी/ज्ञानी" म्हणते. मागी/ ज्ञानी हे तत्वज्ञ, वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रज्ञ यांचे मिश्रित रूप होते. ते खूप सुशिक्षित होते. परंतु आपण त्यांच्याबद्दल एवढेच जाणत आहोत. पण आपल्याला माहिती आहे की ते ज्ञानी होते. उलट, ख्रिसमसच्या कथेत त्याने प्रदर्शित केलेल्या बुद्धिमत्तेवरून आपण बरेच काही शिकू शकतो.

ज्ञानी पुरुषांकडून शिकण्यासारख्या इतर धड्यांपैकी आपण सत्य शोधणे देखील शिकतो. त्यांना देवाबद्दलचे सत्य, स्वतःबद्दलचे भूतकाळ आणि त्याचे भविष्य जाणून घ्यायचे होते. ज्ञानी लोकांनी विचारले, *"यहूद्यांचा राजा होण्यासाठी जन्मलेला बाळ कोठे आहे?" (मत्तय २:२)* ज्ञानी लोक येशूचा शोध घेत होते. आजही काही सुज्ञ पुरुष आणि स्त्रिया सत्याचा शोध घेत आहेत. जेव्हा सत्याची कल्पना येते तेव्हा जीवनात दोन प्रकारचे लोक असतात; कल्पित आणि साधक.  ते फक्त सत्यांबद्दल अनुमान लावतात. देव कसा आहे, कल्पित लोक विचार करतात की त्यांना हे माहित आहे. देवाविषयी बोलणे आणि वाद घालणे ते पसंत करतात, परंतु ते फक्त अनुमान लावतात. कारण त्यांना खरोखर सत्य जाणून घ्यायचे नसते. त्यांना फक्त त्याच्याबद्दल बोलायचे आहे. असे लोक कधीच प्रभू येशू ख्रिस्ताला प्राप्त करु शकत नाहीत. 


    दुसरीकडे, जे सत्याच्या शोधात असतात त्यांना ते सापडते. त्यांचेयावर देव प्रेम करतो. अन्वेषक चार गोष्टी करतात: ते प्रश्न विचारतात, ते अभ्यास करतात, ते सत्याचा शोध घेतात, ते आपल्या आजूबाजूला काय घडत आहे याची काळजी घेतात.


    जे लोक शोधतात त्यांना तो सापडतो. पवित्र शास्त्र म्हणते, *"पण तेथून जरी तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला शरण गेलात आणि पूर्ण जिवेभावे त्याच्या शोधाला लागलात तर तो तुम्हांला पावेल." (अनुवाद ४:२९)* आपण खरोखर गांभीर्याने सत्याचा शोध घेत असाल तर आपण अपयशी होऊ शकणार नाही.


   प्रियांनो, जसे ज्ञानी लोकांनी सर्व परिस्थितीला सामोरे जाऊन येशूला शोधले.. आपणही आपल्या राजाला, आपल्या प्रभूला, आपल्या तारकाला मनापासून शोधूया आणि त्याला आपल्या जीवनात, आपल्या हृदयात स्थान देऊ या!!


     *!!.

Thursday, 24 December 2020

ख्रिसमस, ख्रिस्तजन्मदिन का खिस्तजयंती?

 *ख्रिसमस, ख्रिस्तजन्मदिन का खिस्तजयंती?*




ह्या वर्षी दोघांनी मला ह्या विषयावर प्रश्‍न विचारले. एक बंधू म्हणाले की, ‘‘ख्रिस्तजयंती या शब्दावर दरवर्षी वाद निर्माण होतात. कारण प्रचलित अर्थानुसार जयंती ही फक्त मृत व्यक्तीच्या संदर्भात वापरतात. टिळकांनी हा शब्द वापरून चूक केली का?’’ दुसर्‍या एका बहिणीने विचारले, ‘‘ख्रिस्तजन्मदिन का ख्रिस्तजयंती कोणता शब्द बरोबर आहे?’’ तेव्हा येशू ख्रिस्ताच्या जन्मानिमित्त आपण जो उत्सव साजरा करतो त्यासाठी नेमक्या कोणत्या शब्दाचा वापर करावा याविषयी मी माझे वैयक्तिक मत मांडतो. प्रथम आपण जयंती शब्दाचा शब्दकोशातील अर्थ पाहू :


*जयंती*


‘अवतारी पुरुषाच्या जन्मदिवसाचा समारंभ’ - मराठी शब्दरत्नाकर

‘देव किंवा साधुसंत यांच्या जन्मतिथीचा उत्सव’ - मराठी व्युत्पत्ती कोश

‘देवाची, पुण्यपुरुषाची अथवा थोर पुरुषाची जन्मतिथी; त्या दिवसाचा उत्सव; वाढदिवस’ - अभिनव मराठी-मराठी शब्दकोश.


आता २५ डिसेंबर ही येशूची जयंती आहे काय ते आपण पाहू :


सर्वप्रथम आपण हे लक्षात घेऊ या की, २५ डिसेंबर ही येशूची जन्मतारीख नाही. येशूचा जन्म कधी झाला याविषयी कोणालाच निश्‍चित ठाऊक नाही. त्यामुळे २५ डिसेंबरला ‘ख्रिस्तजन्मदिन’ म्हणता येत नाही. ती लबाडी होईल आणि कोणत्याही असत्यावर ख्रिस्ती सत्याची उभारणी करता येत नाही.


दुसरी गोष्ट, २५ डिसेंबरला ‘ख्रिस्तजयंतीही’ म्हणता येणार नाही. कारण येशू हा आदी आणि अंत आहे. तो सर्वगुणसंपन्न परमेश्‍वर आहे. त्यामुळे जन्ममरण ह्या मानवी कल्पना त्याला लागू होत नाही. त्याची जयंतीही पाळता येत नाही. जयंती पाळली तर पुण्यतिथीही पाळावी लागेल. त्यामुळे २५ डिसेंबरला त्याची जयंती म्हणणे ही मानवी कल्पना आहे. लोकांनी अनंतकालिक देवाला मानवनिर्मित कल्पनेच्या चौकटीत बसवलेले आहे.


तिसरी गोष्ट, २५ डिसेंबरला ‘ख्रिसमस’ म्हणणेही बरोबर नाही. ख्रिसमस हा शब्द ख्राईस्ट + मास अशा दोन शब्दांपासून तयार झाला आहे. ख्रिस्त म्हणजे अभिषिक्त. हा ग्रीक शब्द आहे जो मूळ हिब्रू शब्द मशीहापासून आलेला आहे. आणि मास शब्दाचा अर्थ आहे रोमन कॅथलिकांचा ख्रिस्ताच्या मरणाच्या स्मरणार्थ केला जाणारा प्रभुभोजनाचा विधी. म्हणून ख्रिसमस म्हणजे ख्रिस्ताच्या जन्माच्या स्मरणार्थ केलेले प्रभुभोजन असा त्याचा अर्थ आहे, त्यात येशूच्या जन्माचा काही उल्लेख येत नाही. उलट मरणाच्या स्मरणार्थ विधी केला जातो.


*ख्रिस्तजन्मोत्सव हाच योग्य शब्द*


आपण पाहिले की २५ डिसेंबर येशूच्या जन्माची तारीख नाही, तरी त्या तारखेला आपण येशूच्या जन्माची आठवण करून उत्सव साजरा करतो. त्यामुळे त्याला ‘ख्रिस्तजन्मोत्सव’ म्हणणेच योग्य ठरेल असे मला वाटते. इतर शब्दांमुळे जे प्रश्‍न उपस्थित केले जातात ते या शब्दाने होत नाहीत.


पण जर खरी तारीख तुम्हांला ठाऊक नाही तर कशाला ख्रिस्तजन्मोत्सव साजरा करता? बायबलमध्ये तसे काही सांगितलेले नाही. खरे तर तुम्ही रोमी लोकांचा सण साजरा करता असे काही जण आक्षेप घेतात.


आता २५ डिसेंबर ही येशूच्या जन्माची तारीख नाही हे आपणांस मान्य आहे. तसेच ऐतिहासिक दृष्ट्या ती रोमी लोकांच्या एका सणाची तारीख होती हेही खरे आहे. पण येशू जन्मला हे सत्य पवित्र शास्त्रात दिले आहे. ते नाकारता येत नाही. तो आमच्यासाठी जन्मला ह्याचा आम्हाला आनंद वाटतो आणि त्यासाठी आम्हांला एखादा दिवस नेमून त्याच्या जन्माचा उत्सव साजरा करायचा असेल तर काय हरकत आहे?


संत पौल रोमकरांस पत्रात म्हणतो की, ‘‘कोणी माणूस एखादा दिवस दुसर्‍या दिवसापेक्षा अधिक मानतो. दुसरा कोणी सर्व दिवस सारखे मानतो. तर प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खातरी करून घ्यावी. जो दिवस पाळतो, तो प्रभूकरता पाळतो, आणि जो पाळीत नाही तो प्रभूकरता पाळत नाही; आणि जो खातो तो प्रभूकरता खातो, कारण तो देवाचे आभार मानतो; जो खात नाही, तो प्रभूकरता खात नाही, आणि तोही देवाचे आभार मानतो. कारण आपल्यातील कोणी स्वतःकरता जगत नाही आणि कोणी स्वतःकरता मरत नाही’’ (रोम.१४ः५-७). तेव्हा आपणांस रोमी लोकांच्या सणाच्याच दिवशी जर ख्रिस्ताच्या जन्माची आठवण करायची असेल, तर त्याला कोणी हरकत घेता कामा नये. मात्र आपण तो दिवस ‘प्रभूकरता’ पाळावा. त्याच्या वचनाच्या विरुद्ध इतर कोणत्याही विपरीत गोष्टी करून आपण त्याला खिन्न करू नये. त्या दिवशी आपण त्याची भक्ती करावी. तो दिवस त्याच्या जन्माविषयी व तत्संबंधी घडलेल्या गोष्टी बोलण्यात घालवावा. त्याच्या जन्माविषयी ख्रिस्तीतरांना सुवार्ता सांगावी. आणि त्याच्या जन्माचा उत्सव पाळत असताना मंडळीतील व मंडळीबाहेरील गोरगरिबांचीही आठवण ठेवावी. 


ह्या बंधुभगिनींच्या प्रश्‍नांची उत्तरे दिल्यावर त्या बंधूने दुसरा प्रश्‍न विचारला, ‘‘अवतार व देहधारण यात फरक काय?’’ चला तर, तेही आपण पाहू :


*अवतार*


उपासना संगीतात एका गाण्यात ‘देवाचा अवतार पाहिला देवाचा अवतार’ असे कवी म्हणतो. पण येशू हा देवाचा अवतार नव्हता. पवित्र शास्त्रात कुठेच ‘अवतार’ हा शब्द वापरला नाही, तर येशूने ‘देहधारण’ केले असे म्हटले आहे. ‘‘शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली, आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होते.’’

येशूच्या देहधारणाची ही कल्पना अवतारापेक्षा अनेक बाबतीत भिन्न आहे :


१. ख्रिस्तीतरांत अवतार म्हणजे अनेक देवदेवतांनी वेळोवेळी घेतलेले मानवी किंवा पशुपक्ष्यांचे जन्म आहेत. पण आदी व अंत असणाऱ्या येशूने एकदाच देहधारण केलेले आहे.


२. ख्रिस्तीतरांत दुष्टांचा व दुष्ट प्रवृत्तींचा संहार करून धर्माची पुनःस्थापना करण्यासाठी अवतार घेतले जातात. पण येशूने जे देहधारण केले ते दुष्टांचा संहार करण्यासाठी नाही, तर दुष्टांवर प्रीती करण्यासाठी केले. तो म्हणतो, ‘‘मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे’’ (योहान.१०ः१०). तसेच त्याने ठरावीक देशातील, किंवा ठरावीक लोकांसाठी हे देहधारण केले नाही तर हे सर्व मानवजातीसाठी केले. योहान म्हणतो, ‘‘दुसर्‍या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो (योहान) म्हणाला, हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!’’ (योहान.१ः२९). त्याला सर्व मानवजातीच्या पापांचा दंड चुकता करायचा होता. त्यांच्या पापासाठी त्याला प्रायश्‍चित्त घ्यायचे होते. त्यासाठी जे निर्दोष व निष्कलंक रक्त हवे होते ते त्याने दिले व सर्व मानवजातीसाठी मुक्तीचा मार्ग मोकळा केला.


३. ख्रिस्तीतरांत अवतार हे स्त्रीपुरुषांच्या किंवा देवदेवता व स्त्रिया यांच्या लैंगिक संबंधातून निर्माण झाले. पण येशूने केलेले देहधारण हे लैंगिक संबंधातून झालेले नाही. त्याची आई मरीया ही कुमारी असताना देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने गरोदर राहिली. हे यासाठी झाले की, येशू जे प्रायश्‍चित्ताचे रक्त मानवजातीच्या पापासाठी वधस्तंभावर सांडणार होता, ते निर्दोष व निष्कलंक असायला हवे होते. येशू स्त्रीपुरुषाच्या संबंधातून जन्मला असता, तर आद्य मातापिता आदाम व हव्वा यांचा पापी स्वभाव घेऊन जन्मला असता व प्रायश्‍चित्तासाठी पापी स्वभावाच्या पुरुषाचे पापी रक्त देवाने मान्य केले नसते. तेव्हा देवानेच त्याला कुमारीपासून जन्माला घालण्याची योजना आखली व ती पूर्णत्वास नेली.


४. इतर अवतार आधी मानव होते. पण त्यांच्या चमत्कारी कृत्यांमुळे त्यांना देव मानले गेले. तरी ते देवासारखे परिपूर्ण, सर्वगुणसंपन्न नव्हते. त्यांच्या हातून चुका होत होत्या. एवढेच नव्हे तर ते दैहिक वृत्तीने वागत, खोटे बोलत, चोरी करीत, लैंगिक पापे करीत. पण त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या पापांचेही उदात्तीकरण केले. तसे येशूचे नव्हते. येशू हा परिपूर्ण देव होता व परिपूर्ण मानव होता. त्याच्या हातून एकही पाप झाले नाही. तो म्हणतो, ‘‘तुमच्यापैकी कोण मला पापी ठरवतो’’ (योहान.८ः४६).


५. सर्व अवतारांचा शेवट मृत्यूत झाला. ते मरणातून परत जिवंत झाले नाहीत. पण येशू मानवजातीच्या पातकांसाठी वधस्तंभावर जरी मृत्यू पावला, तरी तो तिसर्‍या दिवशी मृत्यूवर विजय मिळवून पुन्हा जिवंत झाला. एवढेच नाही तर पृथ्वीवर ४० दिवस राहून तो सर्वांदेखत सदेह स्वर्गात गेला.


६. ख्रिस्तीतरांत येथून पुढे अवतार येतच राहतील. पण येशूचे देहधारण एकदाच झाले आहे. ते पुनःपुन्हा होणार नाही. आता येशू आपल्याला घ्यायला येईल, तेव्हा तो पुनरुत्थित झालेल्या गौरवी शरीराने येणार आहे.

हा ख्रिस्ती विश्वास आहे. ही ख्रिस्ती आशा आहे की, जसा तो पुनरुत्थित झाला तसे त्याच्यावर विश्‍वास ठेवून त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकरणारेही पुनरुत्थित होतील व देवासह सदासर्वकाळ जिवंत राहतील!


तेव्हा वाचकांनो, आपले मेल्यानंतर काय होईल ह्याची आपणांस खातरी नसेल, तर येशूवर विश्‍वास ठेवा. त्याला आपला तारणारा व प्रभू म्हणून स्वीकारा. तो तुम्हांला हमखास नरकापासून वाचवून स्वर्गातील अनंतकालिक जीवनात नेईल. कारण दुसऱ्या कोणत्याही अवताराने तुमचा उद्धार व्हावा म्हणून स्वतःचे बलिदान केलेले नाही... आणि पापांत राहणारे कोणीही, मग ते अवतार का असेनात, पापी लोकांचा उद्धार करू शकत नाही. 


●●●

Tuesday, 22 December 2020

परमेश्वराची स्तुती करा



           *✨परमेश्वराची स्तुती करा✨*


*हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत..✍*

                  *( स्तोत्र १९:१४)*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


   होय प्रियांनो, परमेश्वराचीच स्तुती करा. परमेश्वराचीच प्रशंसा करा. आम्ही आमच्या ओठांनी कुणाची स्तुती करतो ? कुणाची प्रशंसा करतो? आज जगामध्ये आपण पाहातो की, लोक आपले काम एखाद्या व्यक्तीकडून करून घेण्यासाठी त्याची खोटी स्तुती, खोटी प्रशंसा करतात. ह्या जगात सात्विक, सरळमार्गी, विश्वासू लोक फारच कमी उरले आहेत. आणि लोक प्रशंसा करण्यापेक्षा खुशामद करण्यात गुंतले आहे. प्रशंसा म्हणजे दूसऱ्याने केलेली एखादी चांगली गोष्ट किंवा एखाद्याचे सद्गुण ह्यामुळे सहजपणे स्तुतीचे शब्द अंतःकरणापासून ओठांतून बाहेर पडतात. परंतु खुशामद करण्यामागे आपला स्वार्थ साधण्याचाच हेतू असतो, आणि त्यासाठीच दूसऱ्याची मेहेरबानी व्हावी हा प्रयत्न असतो. स्तुती प्रशंसा एखाद्याला उत्तेजन देण्यासाठी असते तर खुशामद दूसऱ्याचे मन वळवून स्वार्थ साधून घेण्यासाठी असते. स्तोत्रकर्ता म्हणतो, *ते एकमेकांशी असत्य भाषण करितात, ते दूजाभाव ठेवून खुशामदीचे शब्द बोलतात. ते म्हणतात, आमचे ओठ आमचेच आहेत, आमचा धनी कोण ?( स्तोत्र १२:२,४)* 


   आम्ही आमचा स्वार्थ साधण्यासाठी कुणाला तरी खुशामदीचे शब्द बोलायला आम्हाला मोह झाला तर आम्ही हा विचार करायला पाहिजे की, आमचे हे ओठ प्रभूने आम्हाला त्याची स्तुती करण्यासाठी दिले आहेत. माझे ओठ जर प्रभूचे असतील तर माझ्या प्रत्येक शब्दांतून त्याचेच प्रतिबिंब दिसून येईल. त्याचीच वचने माझ्या ओठांवर येतील. आणि देवाची वचने शुद्ध, पवित्र आहेत. दाविद म्हणतो, *परमेश्वराची वचने शुद्ध वचने आहेत, भट्टीत सात वेळा शुद्ध करून, जमिनीवरील मूशीत ओतलेल्या रूप्यासारखी ती आहेत. ( स्तोत्र १२:६)* आम्ही परमेश्वराची स्तुती करावी म्हणून स्तोत्रकर्ता  म्हणतो, *परमेश्वराची परमश्रेष्ठ स्तुती त्यांच्या कंठी असो, दुधारी तरवार त्यांच्या हाती असो. ( स्तोत्र १४९:६)* म्हणजेच देवाची स्तुती आम्ही अखंड केली पाहिजे आणि त्याच्या वचनाची तरवार आम्ही हाती घेतली पाहिजे. कारण *देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतु ह्यांचे परिक्षक असे आहे. ( इब्री ४:१२)* म्हणून दाविद म्हणतो की, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत. 


      परमेश्वराची प्रशंसा करण्यासाठी शलमोन राजा म्हणतो, *त्याची वाणी परममधूर आहे, तो सर्वस्वी मनोहर आहे. ( गीतरत्न ५:१६)* आम्ही आमच्या वाणीने केवळ आमच्या प्रभूचीच प्रशंसा केली पाहिजे. यशयाला परमेश्वराने पाचारण केले तेव्हा तो म्हणतो की मी अशुद्ध ओठांचा आहे, परंतु आपण पाहातो परमेश्वराने त्याला शुद्ध आणि पवित्र करून त्याच्या सेवेसाठी निवडले. आणि पूढे तोच मी अशुद्ध ओठांचा आहे, असे म्हणणारा यशया म्हणत आहे की, *शिणलेल्यांस बोलून धीर कसा द्यावा ते समजावे म्हणून प्रभू परमेश्वराने मला सुशिक्षितांची जिव्हा दिली आहे. ( यशया ५०:४)* परमेश्वर आम्हाला परिपूर्ण करण्यास समर्थ आहे. याकोब आपल्या पत्रामध्ये म्हणत आहे की, *आपण सगळेच पुष्कळ चुका करितो. कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय. तो सर्व शरीरही कह्यांत ठेवण्यास समर्थ आहे. ( याकोब ३:२)*


    म्हणून प्रियांनो आम्ही बोलण्यात चुकू नये म्हणून सांभाळा. आम्ही कळतनकळत वाईट लोकांची किंवा वाईट गोष्टींची तर प्रशंसा करत नाही आहोत ना ? हे तपासून पाहू या. आणि आमच्या मुखाने आम्ही केवळ देवाचीच स्तुती, स्तवन, प्रशंसा करू या. देवाचाच जयजयकार करू या. त्याचेच नाव उंच करू या.


*जो आपले तोंड सांभाळितो तो आपला जीव राखितो. ( नीति १३:३)*


        

Saturday, 19 December 2020

बायबल मधील डोंगर, पर्वत.

 ✍️ जनरल नॉलेज.

👉बायबल मधील डोंगर, पर्वत.


1) आरारत पर्वत.. इथे नोहाची बोट थांबली.


2) मोरिया डोंगर...इथे इसहाकला अर्पण करावयास सांगितले.याच डोंगरावर शलमोनाने मंदिर बांधले.


3) सियोन पर्वत... इथे दहा आज्ञा मिळाल्या.


4) होर पर्वत... याच पर्वतावर अहरोनाचा मृत्यू झाला.


5) सेईर डोंगर.. याच ठिकाणी एसाव रहात होता.


6) पिसगा पर्वत.. येथूनच मोशेने वतन दत्त पहिला.


7) कर्मेंल पर्वत. स्वर्गातून अग्नी याच पर्वतावर उतरला.


8) हेब्रोन ... याच डोंगराखालून योसेफ आपल्या भावांना भेटण्यास गेला.


9) गिलबोवा डोंगर. याच  डोंगरावर शोऊल व त्याच्या पुत्राचा वध झाला.


10) ताबोर डोंगर... याच डोंगरावर येशूला भेटावयास एलीया व मोशे आले.


11) जॅतुन डोंगर.... याच डोंगरावर येशूला धरून देण्यात आले.याच डोंगरावरून येशूने स्वर्गारोहण केले.


🔥👉बायबल मध्ये  एकूण 35 पर्वताचा उल्लेख केला आहे.डोंगर येशूचे प्रार्थना करण्याचे आवडते स्थळ होते.

✍️🔥Ps:Shekhar🔥

सेतानाला ही डोंगर फार आवडतो. सेतानाला उंचावर रहायला आवडते डोंगरावरून लोकांवर नजर ठेवायला त्याला सोपे होते.

काय तुमच्या आसपास एखादा डोंगर अथवा टेकडी आहे?जर असेल तर तुम्ही रेड झोन मध्ये आहात. तुम्हाला येशूची गरज आहे. कारण आता येशू सर्वात उंचावर म्हणजे स्वर्गात आहे. तेथून तो तुमच्यावर आणी सेतानावर नजर ठेऊन आहे. आजच आपल्या जीवनात  येशूला बोलवा आणी सुरक्षित रहा.


🙏            🔥            🙏

आलीशाचे चमत्कार

 🍁आलीशाचे चमत्कार 🍁


आलिशा नावाचा अर्थ - परमेश्वर उद्धार आहे.


आलिशा  शेतकरी होता.


1) तो तेथून निघाला तेव्हा त्याला शाफाटाचा पुत्र अलीशा भेटला; तो बैलांची बारा जोते चालवून शेत नांगरत असे, आणि तो स्वतः बाराव्या जोताबरोबर होता. त्याच्याजवळ जाऊन एलीयाने आपला झगा त्याच्यावर टाकला.

१ राजे 19:19 


तसेच काही त्याला भविष्य वक्ता म्हणत


यरीहो येथल्या संदेष्ट्यांचे शिष्य त्याला लांबून पाहून म्हणाले, “एलीयाचा आत्मा अलीशाच्या ठायी उतरला आहे.” त्यांनी सामोरे येऊन त्याला जमिनीपर्यंत लवून नमन केले.

२ राजे 2:15 


अलीशाने केलेले चमत्कार

1) पाणी दुभंगणे

एलीयाचा जो झगा त्याच्या अंगावरून खाली पडला होता तो त्याने उचलून घेतला आणि तो परत जाऊन यार्देनेच्या तीरावर उभा राहिला.  एलीयाच्या अंगावरून पडलेला झगा पाण्यावर मारून तो म्हणाला, “एलीयाचा देव परमेश्वर कोठे आहे?” त्याने तो पाण्यावर मारताच पाणी दुभंगले आणि अलीशा पलीकडे गेला.

२ राजे 2:13‭-‬14 


2) अशुद्ध पाण्यापासून स्वच्छ पाणी करणे.

त्या नगराचे रहिवासी अलीशाला म्हणाले, “पाहा, हे नगर मनोहर स्थळी वसले आहे, हे आमच्या स्वामीला दिसतच आहे; पण येथले पाणी फार वाईट असल्यामुळे जमिनीत काही पिकत नाही.”  त्याने म्हटले, “एक नवे पात्र माझ्याकडे आणा व त्यात मीठ घाला.” त्यांनी ते पात्र त्याच्याकडे आणले.  मग तो पाण्याच्या झर्‍यानजीक गेला व त्यात ते मीठ टाकून म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, मी हे पाणी चांगले करतो, ह्यापुढे ह्याने मृत्यू येणार नाही व पीक बुडणार नाही.”  अलीशाच्या ह्या वचनानुसार ते पाणी चांगले झाले, ते आजवर तसेच आहे.

२ राजे 2:19‭-‬22 


3) तेल विकून कर्ज द्यायला लावली.

ती त्याच्यापासून गेली आणि आपल्या पुत्रांसह आपल्या घरात जाऊन तिने दार बंद केले; ते तिच्याकडे भांडी आणत ती भांडी ती भरत जाई.  सर्व भांडी भरल्यावर ती आपल्या पुत्रांना म्हणाली, “मला आणखी एक भांडे आणून द्या;” त्यांनी म्हटले, “आता एकही भांडे उरले नाही;” तेव्हा तेल वाढायचे थांबले.  तिने जाऊन देवाच्या माणसाला हे सांगितले. तो म्हणाला, “जा, तेल विकून आपले कर्ज फेड व जे शिल्लक राहील त्यावर आपला व आपल्या पुत्रांचा निर्वाह कर.” 

२ राजे 4:5‭-‬7 


4)  शूनेमकरिण स्त्रीचा मुलगा जिवंत केला.


आणि आत गेल्यावर त्याने त्यांच्यामागे दार लावून घेतले व परमेश्वराची प्रार्थना केली.  मग माडीवर जाऊन त्या मुलावर पडून त्याने आपले तोंड त्याच्या तोंडाला, आपले डोळे त्याच्या डोळ्यांना, आपले हात त्याच्या हातांना लावले; त्याच्यावर त्याने पाखर घातली तेव्हा मुलाच्या देहास ऊब आली.  मग त्याला सोडून तो घरात इकडेतिकडे फिरू लागला; व पुन्हा वर चढून त्या मुलावर त्याने पाखर घातली तेव्हा मुलाने सात वेळा शिंकून डोळे उघडले.  मग त्याने गेहजीला हाक मारून सांगितले, “त्या शूनेमकरिणीला बोलाव.” त्याने बोलावल्यावर ती त्याच्याकडे आली तेव्हा तो तिला म्हणाला, “आपल्या पुत्राला उचलून घे.”  ती आत जाऊन त्याच्या पाया पडली, त्याला जमिनीपर्यंत लवून तिने नमन केले, नंतर ती आपल्या मुलाला घेऊन बाहेर गेली.

२ राजे 4:33‭-‬37 


5 )  संदेयासाठी यासाठी केलेला चमत्कार .

 त्यांनी ती भांड्यातून काढून त्या माणसांना वाढली. ती खाताच लोक ओरडून म्हणाले, “देवाच्या माणसा, बहुगुण्यात मरण आहे.” त्यांच्याने ते खाववेना.  अलीशा म्हणाला, “थोडे सपीठ आणा, ते त्याने त्या बहुगुण्यात टाकून त्यांना म्हटले, आता ह्या लोकांना ते वाढा म्हणजे ते ते खातील.” मग त्या बहुगुण्यात काही अपायकारक पदार्थ राहिला नाही.  बआल-शालीशा येथील कोणी मनुष्य आपल्या प्रथमउपजातील जवाच्या वीस भाकरी आणि धान्याची हिरवी कणसे पोत्यात घालून देवाच्या माणसाकडे घेऊन आला. अलीशा त्याला म्हणाला, “ह्या माणसांना हे वाटून दे, त्यांना हे खाऊ दे.”  त्याचा सेवक म्हणाला, “काय? शंभर माणसांना एवढेसे वाटून देऊ?” तो म्हणाला, “हे लोकांना वाटून दे; त्यांना हे खाऊ दे; परमेश्वर म्हणतो, त्यांनी खाल्ल्यावर ह्यातून काही उरेलही.”  तेव्हा ते त्याने लोकांना वाढले आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्यांनी ते खाल्ल्यावर त्यातले काही उरले.

२ राजे 4:40‭-‬44 


6)  नामानाचे कोड बरे केले.

 मग त्याचे सेवक त्याच्याकडे येऊन म्हणाले, “बाबा, संदेष्ट्याने आपल्याला काही अवघड काम सांगितले असते तर आपण केले नसते काय? तर स्नान करून शुद्ध व्हा, एवढेच त्याने आपल्याला सांगितले, ते आपण का करू नये?”  मग त्याने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यार्देनेत जाऊन सात वेळा बुचकळ्या मारल्या; तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला.

२ राजे 5:13‭-‬14 


7) कुराड पाण्यावर तरंगलि

एक जण तुळई तोडून पाडत असता कुर्‍हाड दांड्यातून निसटून पाण्यात पडली तेव्हा तो ओरडून म्हणाला, “हायहाय! स्वामी, मी ती मागून आणली होती.”  देवाच्या माणसाने विचारले, “ती कोठे पडली?” त्याने ती जागा दाखवल्यावर अलीशाने एक लाकूड तोडून तेथे टाकले तेव्हा लोखंड पाण्यावर तरंगू लागले.

२ राजे 6:5‭-‬6 


8) सर्वात मोठा चमत्कार आलिशाच्या हाडकांना

मेलेल्या माणसाचा स्पर्श होतो आणि तो जिवंत होतो.

तेव्हा लोक एका मनुष्याला मूठमाती देत असताना त्यांच्या नजरेला एक टोळी पडली; आणि त्यांनी ते प्रेत अलीशाच्या कबरेत टाकले, तेव्हा अलीशाच्या अस्थींना स्पर्श झाल्याबरोबर तो मनुष्य जिवंत होऊन आपल्या पायांवर उभा राहिला.

२ राजे 13:21 

☘️🍁☘️🍁☘️🍁☘️🍁🍁

Friday, 18 December 2020

आज्ञा पाळणारा पेत्र



           *✨आज्ञा पाळणारा पेत्र✨*


*"देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नकोस"..✍*

               *( प्रे. कृत्ये १०:१५)*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


     कर्नेल्य हा सैन्यातील एक अधिकारी होता. तो यहूदी नव्हता तरीही जिवंत देवाला मानणारा होता. तो देवाच्या दृष्टीने जे योग्य ते करीत असे. तो नीतिमान व आपल्या कुटूंबातील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा होता. तो नित्य प्रार्थना करीत असे आणि संपूर्ण सत्य समजण्याची इच्छा त्याला होती. देवाच्या सहवासात राहण्याची ओढ त्याला होती. *अशा मनुष्यालाच देवाचे आशीर्वाद मिळतात.* कर्नेल्याला अधिक सत्य समजावे म्हणून देवाने त्याच्याकडे देवदूत पाठवून पेत्राला बोलावून घेण्याची त्याला आज्ञा केली. आणि कर्नेल्याने पेत्राला बोलावण्यासाठी माणसे पाठवली. आपण पाहातो की, ती माणसे अजून वाटेत होती तोवरच देवाने एका दृष्टांताद्वारे पेत्राच्या मनाची तयारी करून घेतली. यहूदी लोक यहूदी नसलेल्या म्हणजेच परराष्ट्रीय लोकांना तुच्छ समजत असत. आणि त्यांच्याबरोबर जेवण करीत नसत. ते त्यांना अशुद्ध मानीत असत. ते त्यांच्याबरोबर कसलाच संबंध ठेवीत नसत. आणि ख्रिस्त हा भेदभाव पेत्राद्वारे नष्ट करणार होता. ह्या दृष्टांताद्वारे तो पेत्राला हेच शिकवीत होता. पेत्रानेही देवाची इच्छा काय असावी ह्याचा विचार केला आणि आत्म्याच्या प्रेरणेने जाण्यास तयार झाला. *जेव्हा आम्ही देवाचे वचन वाचतो आणि त्यावर विचार करतो, तेव्हा देव वचनाद्वारे आम्हाला काय सांगत आहे हे लक्षात घेतले पाहिजे.*


    यहूदी लोकांना काही ठराविकच प्राणी मारून खाण्याची परवानगी होती आणि देवाने पेत्रासमोर सोडलेल्या पात्रामध्ये तर सर्व प्रकारचे प्राणी होते. परमेश्वर त्याला म्हणत आहे, *'पेत्रा, उठ; मारून खा.'* परंतु पेत्र ते नाकारून देवाला म्हणत आहे की, *"नको, नको, प्रभू'; कारण निषिद्ध आणि अशद्ध असे काही मी कधीही खाल्ले नाही."* प्रियांनो, प्रभू म्हणजे आमचा मालक किंवा धनी, आणि त्याची आज्ञा पाळणे दास ह्या नात्याने आमचे कर्तव्य आहे. परंतु तीन वेळा असे झाले आणि पेत्राने ते नाकारले. नंतर पेत्राने जो दृष्टांत पाहिला त्यावरून देव त्याला काहीतरी शिकवीत आहे हे त्याच्या लक्षात आले. आणि आत्मा त्याला म्हणाला, *"पाहा, तीन माणसे तुझा शोध करीत आहेत, तर उठ, खाली ये आणि काही संशय न धरता त्यांच्याबरोबर जा, कारण मीच त्यांना पाठवले आहे." ( प्रे. कृत्ये १०:१९,२०)* आणि पेत्र  लागलीच कर्नेल्याने पाठविलेल्या माणसांबरोबर जाण्यास तयार झाला. *प्रभू आपल्याला जे करायला सांगत आहे ते करण्यास आपण मोठ्या आनंदाने तयार व्हावे.*


     पेत्र कर्नेल्याकडे गेला आणि कर्नेल्याने व त्याच्या सर्व लोकांनी मोठ्या आनंदाने देवाचे वचन ग्रहण केले आणि आपण पाहातो की, त्या वचन ऐकणाऱ्या सर्वांवर म्हणजेच परराष्ट्रीयांवर पवित्र आत्मा उतरून आला. पेत्र म्हणतो, *"कोणाहि मनुष्याला निषिद्ध किंवा अशुद्ध म्हणू नये असे देवाने मला दाखविले आहे."* आणि देव पक्षपात करणारा नाही. तर सर्वांवर सारखीच प्रीति करणारा आहे. म्हणून प्रियांनो, आपणही देवाच्या आपल्या जीवनाबाबतीत असलेल्या इच्छा, योजना जाणून घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू या. देवाच्या आज्ञांचे पालन करू या. 


       

Thursday, 17 December 2020

ख्रिस्ताच्या आनंदाने भरलेले असा



  *✨ख्रिस्ताच्या आनंदाने भरलेले असा✨*


*प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हा म्हणेन, आनंद करा..✍🏼*

                   *( फिलिप्पै ४:४)*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


    ख्रिस्त कोण आहे हे जाणून घेऊन आपण त्याच्या ठायी आहोत हे लक्षात घेऊन आनंदी असा. कारण ख्रिस्ताच्या ठायीच आनंद आहे. आणि हा आनंद आपल्या सभोवतालच्या परिस्थितीमुळे मिळत नाही तर तो आपल्या अंतःकरणात भरलेला असतो. फिलिप्पै येथील मंडळीबद्दल पौल खूप समाधानी आहे. कारण त्यांनी त्यांच्या वर्तणूकीने आणि देवावर दाखवीत असलेल्या विश्वासामुळे पौलाला मोठा आनंद दिला आहे आणि म्हणून पौलाची त्यांच्यावर प्रीती आहे. पौल त्यांना ते त्याचा आनंद आणि मुकूट आहेत असे म्हणत आहे. तो म्हणतो, *तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा होतांना जरी मी स्वतः अर्पिला जात आहे तरी मी त्याबद्दल आनंद करितो, आणि त्याचाच तुम्हीही आनंद माना व माझ्याबरोबर आनंद करा. ( फिलिप्पै २:१७,१८)* पौलाची इच्छा आहे की त्यांनी विश्वासामध्ये स्थिर राहावे आणि प्रीति, आनंद, शांती ह्या पवित्र आत्म्याच्या फळांनी भरून जावे. 


   आपण आनंदी राहण्यासाठी आम्ही आपले विचार शुद्ध व निर्मळ राखले पाहिजेत. कारण आत्मिक आरोग्याचे हे खरे लक्षण आहे. आपण व्यर्थ काळजी, चिंता करीत बसू नये, तर प्रार्थनेद्वारा सर्व काळजी, चिंता प्रभूवर सोपवून द्यावी. असे लिहिले आहे की, *कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. ( फिलिप्पै ४:६)* प्रार्थना करणे म्हणजे देवाच्या सान्निध्यात विश्वासाने जाणे होय. विनंती करणे म्हणजे उत्तराच्या आशेने आपली बाब प्रभूसमोर मांडणे होय आणि आभारप्रदर्शनासह ही कृती देवावरील अढळ असा विश्वास प्रगट करते. असे जर आपण करू तर देवापासून येणाऱ्या स्वर्गीय शांतीचा ओघ आपल्या अंतःकरणात सदैव राहील आणि आपली अंतःकरणे सदोदित आनंदी राहतील. 


    आनंदी राहण्यासाठी पौल सांगतो त्याप्रमाणे जर आपण केले तर निश्चितच सर्व दुःख देणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनातून पळ काढतील आणि आपले जीवन आनंदी होईल. त्यासाठी पौल म्हणतो की, *जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती त्यांचे मनन करा. ( फिलिप्पै ४:८)* म्हणजेच 

    *जे काही सत्य -* म्हणजे जे खोटे, अप्रामाणिक, बेभरवशाचे, आहे त्यावर विश्वास ठेवून दुःखी होऊ नका. तर पौल म्हणतो त्याप्रमाणे आम्ही राहावे. पौल म्हणतो, *अज्ञान्यासारखे नव्हे तर ज्ञान्यांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. ( इफिस ५:१५)* 

   *जे आदरणीय म्हणजे -*  ज्या गोष्टींचा आदर बाळगता येईल असे आणि सन्मानास पात्र आहे ते अंगीकारा म्हणजे तुमचा आनंद टिकून राहील.

  *जे न्याय्य -* देवाच्या वचनाप्रमाणे व देवाला संपूर्ण मान्य असे राहा.

   *शुद्ध -* जे शुद्ध, पवित्र, निर्भेळ आहे, नैतिक दृष्ट्या स्वच्छ आहे त्याचाच स्वीकार करा

   *प्रशंसनीय -* ज्यामुळे केवळ  शांतीच प्रस्थापित होते, देवाची प्रशंसा होते, तणाव निर्माण होत नाही असे.

   *श्रवणीय -* जे काही आमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, वृद्धीसाठी आहे ते,जे वि्ध्वंसक नसेल ते. 

   *सद्गुण -* ते देवाच्या ठायी असलेले सर्व चांगले आचरण सर्व सद्गूण असे आमच्या देवाच्या चांगल्या गुणांनी भरलेले असतात.

   *स्तुती -* ह्या सर्व गोष्टी अंगीकारल्यामुळे आपण सदैव आनंदी राहतो. आणि देवाची स्तुती करतो. आणि ख्रिस्ताच्या   आनंदाने भरलेले असे होऊ शकतो. 


       प्रियांनो, आनंदी राहण्यासाठी ह्याशिवाय दूसरे काहीही करण्याची आवश्यकता नाही. आपण देवावर पूर्ण जिवेभावे विश्वास ठेवून त्याच्या मार्गाने चालू या आणि आनंदी होऊन त्याचे आशीर्वाद प्राप्त करून घेऊ या.


        

Tuesday, 15 December 2020

देवाच्या घरात दुष्काळ नाही



      *✨देवाच्या घरात दुष्काळ नाही✨*


 *"तुझ्या घरातील समृद्धीने त्यांची तृप्ती होईल, आणि तू आपल्या सुखांच्या नदीचे पाणी त्यांस पाजशील"..✍🏼*

                 *( स्तोत्र ३६:८ )*


                           *...मनन...*


           *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!* 


   देवाच्या घरात म्हणजेच देवाच्या मंदिरात समृद्धी आहे, विपूलता आहे. देवाच्या घरात कुठल्याच चांगल्या गोष्टींची कमतरता नाही, दुष्काळ नाही. देवाच्या घरात आशीर्वादांची आणि सर्व चांगल्या गोष्टींची रेलचेल आहे. त्यातूनच आपली तृप्ती होते. आपण नेहमी चर्चमध्ये असलेल्या प्रार्थना सभांमध्ये सहभागी झालो पाहिजे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आम्ही देवाचे घर सोडून इतर ठिकाणी व्यर्थ भटकता कामा नये. कारण आमच्यासाठी गरजेच्या असलेल्या सर्व गोष्टी देवाने आमच्यासाठी राखून ठेवल्या आहेत. आम्ही जर देवाचे घर सोडून भटकलो तर आमची स्थिती खूप दयनीय होते. आणि देवापासून दूर गेल्यामुळे आमचे पतन होते. बायबल मध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत की जे देवाला सोडून दूर गेले आणि त्यामुळे त्यांचे वाईट झाले. बायबलमधून काही उदाहरणे पाहूया -


     अब्राहाम हा विश्वासणाऱ्यांचा बाप, आज्ञांकितपणाचा व अर्पणांचा पुरूष आहे. तो राष्ट्रांचा जनक आहे. अशा अनेक गोष्टी आपण त्याच्याविषयी ऐकलेल्या आहेत. परंतु पतनाचा एक वाईट अनुभव आपण त्याच्या जीवनात पाहातो. जसे त्याच्या विश्वासाच्या द्वारे आणि आज्ञांकितपणाच्या द्वारे आपल्याला अनेक धडे शिकता येतात. तसेच त्याच्या जीवनातील या पतनाद्वारेही शिकायला मिळते. *तेथून निघून अब्राम प्रवास करीत नेगेबकडे गेला. पूढे देशात दुष्काळ पडला; तेव्हा काही दिवस मिसरात जाऊन राहावे म्हणून अब्राम तिकडे निघून गेला, कारण त्या देशातला दुष्काळ फार तीव्र होता. ( उत्पत्ती १२:९,१०)* येथे आपण पाहातो की, कनान देशातील दुष्काळ पाहून अब्रामचा आरंभीचा धार्मिक उत्साह मावळला. त्याला देशांतर करून इजिप्तमध्ये जावे लागले. बेथेल सोडून तो दक्षिणेकडे गेला. *"बेथेल"* म्हणजे *"देवाचे घर"* बेथेलात दुष्काळ नसतो.अब्राहामाने बेथेल सोडायला नको होते. जेव्हा आपण देवाचे घर सोडून जातो तेव्हा दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. आपल्या पित्याच्या घरात तर भाकरीची रेलचेल आहे.


    आपण पाहातो की, देशात दुष्काळ पडला आणि अन्नान्नदशा झाली म्हणून एक इस्राएली कुटुंब आपला देश सोडून आश्रयासाठी परक्या मवाब देशात जाऊन राहिले. थोड्या दिवसांसाठी स्वदेश सोडून गेलेले असे ते त्या परक्या देशातच राहिले. *"बेथेलहेम"* म्हणजे *"भाकरीचे घर"* हे बेथेलहेम म्हणजे भाकरीचे घर सोडून ते दूर गेले. परंतु त्या देशामध्ये नामीने आपला पती आणि दोन्ही मुलांना गमावले. आणि त्यामुळे तिला आपल्या देशाची आठवण झाली. *"देवाने आपल्या लोकांचा समाचार घेऊन त्यांस अन्न दिले आहे."* हे ऐकून घोर निराशेत तिला आशेचा किरण दिसला आणि तिने स्वदेशी परत जाण्याची तयारी केली. *"परत जाणे"* म्हणजे पश्चाताप करणे, देवापासून दूर गेलेल्याने माघारी फिरणे. तिने पश्चाताप करून परत देवाकडे येण्याची तयारी केली.


    प्रियांनो, आमच्यामध्ये आध्यात्मिक अन्नाची कमी असेल आणि देवाच्या वचनाची इच्छा तुमच्या मनात नसेल तर आम्ही चुकीच्या दिशेने चाललो आहोत. जर आम्हाला भरपूर आध्यात्मिक अन्न मिळत नसेल तर मग मिसर देशाच्या अन्नाकडे आम्ही वळू शकतो, त्यासाठी आग्रह धरू शकतो, परंतु आम्ही लक्षात ठेवावे की ते आम्हाला कधीही तृप्त करू शकणार नाही. आमच्या देवाच्या घरातील, भाकरी खाऊनच आमची भूक भागवली जाणार आहे. जे देवाचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करतात ते देवाच्या कृपेने सर्व प्रकारच्या संकटातून, अडचणीतून निभावतात. आपल्या जीवनात येणाऱ्या समस्या, ह्या आपण जर देवावर भरंवसा ठेवला आणि त्याच्या आज्ञा पाळल्या तर देव त्याचे हेतू पूर्ण करण्यासाठी त्यातून मार्ग काढतो. देव आमचे पतन होऊ देत नाही तर आम्हाला आमच्या चुकांची क्षमा करून आम्हाला साहाय्य करतो. म्हणून आम्ही देवाचे घर, देवाचे मंदिर सोडून, देवापासून दूर जाऊ नये तर सदैव देवाच्या समक्षतेत राहावे.


        

आम्ही कशावर विश्वास ठेवावा



    *✨आम्ही कशावर विश्वास ठेवावा✨*


*देवाचा आत्मा तर ह्यावरून ओळखावा, देह धरून आलेल्या येशू ख्रिस्ताला जो जो आत्मा कबुल करितो तो तो देवापासून आहे..✍🏼*

                 *( १ योहान ४:२ )*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


     योहानाने ह्या अध्यायामध्ये आपण कशावर विश्वास ठेवला पाहिजे आणि कशावर विश्वास ठेवू नये हे अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. कारण शेवटच्या दिवसांमध्ये अनेक खोटे संदेष्टे ह्या जगामध्ये उठणार आहेत. आणि त्यांची पारख आपल्याला करता यायला पाहिजे ह्यासाठी की कोणी आपल्याला फसवून देवाविरोधात असलेल्या गोष्टी करायला लावू नये. 

    आपण कशावर विश्वास ठेवला पाहिजे ? वचनाद्वारे पाहू या -


    *१) येशू ख्रिस्त देहाने- देह धारण करून आला ह्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे -* तो देहधारी प्रभू आहे. तो मानवी देह धारण केलेला देव होता. मानवाच्या पापांसाठी मानवाच्या ऐवजी मरण सोसावे आणि मानवाची पापे स्वदेहाने वधस्तंभावर वाहून न्यावी यासाठी त्याने मनुष्यरूप धारण केले. योहान लिहितो, *शब्द देही झाला आणि त्याने आम्हांमध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले ते पित्यापासून आलेल्या एकूलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होते. ( योहान १:१४)* जे त्याचे स्वकीय, त्यांनीही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, *मी आणि माझा पिता एक आहोत ( योहान १०:३०)* असे त्याने सांगूनही त्यांनी तो देह धारण करून आलेला देव आहे ह्यावर विश्वास ठेवला नाही. आपण असे करू नये म्हणून सावध असा.


   *२) आपण ख्रिस्ताच्या देवत्वावर विश्वास ठेवला पाहिजे -* तो देवाचा एकुलता एक पुत्र आहे आणि तो ख्रिस्त आहे, मसीहा आहे असा आपण विश्वास ठेवला पाहिजे, जो हे स्वीकारितो त्याने जगावर जय मिळविला आहे आणि जो हे नाकारितो तो लबाड आहे. जून्या करारात संदेष्ट्यांद्वारे आधीच त्याच्याबद्दल सांगितले होते, भविष्यलेखात सांगितलेला मसीहा तोच आहे. शिमोनाला तर येशू जन्मास आला तेव्हा त्या बाळामध्ये ख्रिस्ताचा साक्षात्कार झाला. तो म्हणतो, *हे प्रभू, तू आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस, कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. ( लूक २:२९,३०)* अशाप्रकारे आम्हीही त्याच्या देवत्वावर विश्वास ठेवला पाहिजे.


   *३) देव प्रीति आहे ह्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे -* ख्रिस्ताच्या प्रीतीशी तुलना करता येईल अशी जगामध्ये एकही व्यक्ती नाही. *"देव प्रीति आहे"* ह्या महान सत्यामध्येच प्रीतीचे सामर्थ्य दिसून येते. ख्रिस्ताच्या प्रीतीचे अनेक उदाहरणे आपल्याला बायबल मध्ये पाहावयास मिळतात. त्याने स्वतः प्रीति करून आपल्याला एकमेकांवर, वैऱ्यांवर प्रीति करण्याची आज्ञा केली आहे. *त्याने तुम्हां आम्हांवर प्रीति केली, त्याची प्रीति आपल्या ठायी पूर्णत्व पावली आहे..पहिल्याने त्याने आम्हांवर प्रीति केली म्हणून आपण प्रीति करतो*


   *४) ख्रिस्त आमचा तारणारा आहे, ह्यावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे -* आमच्या पापांचे प्रायश्चित्त व्हावे आणि आम्ही तारले जावे ह्यासाठी देवाने ख्रिस्ताला पाठविले. *कारण पापाचे वेतन मरण आहे ( रोम ६:२३)* देवाच्या प्रीतीपासून पाप आम्हाला दूर करते. आम्हाला अटकाव करते. ख्रिस्ताने वधस्तंभावर तुमच्याआमच्या पापांची शिक्षा सर्वस्वी स्वतःचे अर्पण करून घेतली. आणि आम्हाला तारण प्राप्त झाले आहे. नियमशास्राप्रमाणे पूर्वी जो बली वारंवार अर्पण करावा लागत असे, तो ख्रिस्ताच्या अर्पणाने एकदाचाच अर्पण करून आमच्यासाठी त्याने प्रायश्चित्त करून कायमची आमची सूटका केली आहे. प्रायश्चित्त आवश्यक आहे. *ख्रिस्ताच्या बलिदानाच्या द्वारेच आम्हाला सार्वकालिक जीवन लाभले आहे*


   प्रियांनो, आम्ही भ्रांतीत पडू नये तर ख्रिस्तच आमचा तारणारा आहे, आमचा प्रभू आहे, ह्यावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. योहान आपल्या पत्रात लिहीत आहे की, *जो सत्य आहे त्याला ओळखण्याची बुद्धी त्याने आपल्याला दिली आहे. जो सत्य आहे त्याच्या ठायी, म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या ठायी, आपण आहों. हाच खरा देव आणि सार्वकालिक जीवन आहे. (१ योहान ५:२०)* 


        

Monday, 14 December 2020

बंद दार

 *प्रकटीकरण ३: २१*


               *बंद दार*


      *पहा मी दाराशी उभा आहे व दार ठोकत आहे; जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन, आणि तो माझ्याबरोबर जेवील.*  *प्रकटीकरण 3:२०*


      बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला घरात येण्यासाठी दार ठोकावे लागते किंवा बेल वाजवावी लागते.  हाक मारावी लागते. *कारण दार बंद असतं, कडी आतून लावलेली असते.* कदाचित कामात, टीव्ही पाहण्यात किंवा इतर काही कारणांमुळे दार कोणी वाजवतयं हे लक्षात येत नाही. म्हणूनच

जोवर घरातील कोणी दार उघडीत नाही तोवर कोणालाही आत येता येत नाही. *कारण दार आतून बंद आहे*.

    आमच्या हृदयाची अवस्था अशीच आहे. ह्या हृदयाचे दरवाजे आम्ही आतून बंद करून घेतले आहेत. *प्रभू आमच्या हृदयाच्या दाराबाहेरच उभा आहे आणि आत यायचंय प्रभूला!!* 

  कशासाठी ख्रिस्ताला आत यायचे आहे? आमची सहभागीता त्याला हवी आहे, जेवायचं आहे प्रभूला आमच्या घरात आणि आमच्याबरोबर!! ही खरी तर सुवर्णसंधी आहे आमच्यासाठी.. 

  पण आमच्या हृदयाच्या दारावर ख्रिस्ताने दिलेली ही थाप , त्याची वाणी, वाजवलेली बेल काही ऐकायला येत नाही.. कारण हे जग आणि जगातील मोह आवरता येत नाहीत आपल्याला. प्रभू येशू दोष देत आहे की तू शीतही नाहीस , उष्ण पण नाहीस. चर्चच्या मंडळींचे सभासद आहोत तर आपण परिपूर्ण आहोत ,नीतिमान आहोत हा गैरसमज आहे, तोच गैरसमज जो प्रभूच्या सहभागीतेपासून दूर ठेवतो तोच ख्रिस्त येथे दूर करू पहातो , कारण आमचा नाश होऊ नये अशी प्रभूची इच्छा आहे .प्रभू म्हणतो, *"श्रीमंत होण्यासाठी अग्नीने शुद्ध केलेले सोने  माझ्यापासून विकत घे ,तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसावयास शुभ्र वस्त्र विकत घे*".  कारण *तुला वाटते तू श्रीमंत आहे,धन मिळवले, पण तू दीन, दरिद्री, उघडा, आहे हे तुला कळत नाही*.   जगातील ह्याच मोहमायात, मान सन्मानात , बेगडी प्रतिष्ठेत इतके दंग झालेलो असतो आम्ही मग प्रभूच दार ठोठावणे, त्याची वाणी कशी ऐकायला येणार?

   यावरच तर मात करायची आहे, कारण प्रभू येशूबरोबर बसून जेवणं याहून कोणती श्रीमंती, कोणती प्रतिष्ठा मोठी आहे? जेव्हा ख्रिस्तासाठी ह्या हृदयाचे दार आपण उघडतो तेव्हा आणखी एक सन्मानाची गोष्ट प्रभू करतो ती म्हणजे प्रभू ज्या पित्याच्या राजासनावर आहे तेथे प्रभू बरोबर बसायला मिळणार आहे.

     *पण ह्या हृदयाच्या दाराची कडी मात्र आतूनच बंद आहे, आणि प्रभू येशु दाराच्या बाहेर उभा राहून ठोकत आहे, उघडणार नाही का हृदयाचं दार आपण??* *नाहीतर ओकून टाकले जाणार आहोत आपण*.. 

     *प्रभू येशु तू मारीत असलेली हाक, तुझं आमच्या हृदयाचं दार ठोठावणे ऐकून आम्ही हृदयाच्या दाराची कडी उघडावी असे कर*

        

विजयाची रहस्ये



               *✨विजयाची रहस्ये✨*


*ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले, आणि सर्व नांवांपेक्षा जे श्रेष्ठ नांव ते त्याला दिले, ह्यांत हेतु हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावात टेकला जावा..✍*

            *( फिलिप्पै २:९,१० )*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


    आमचा प्रभू येशू ख्रिस्त विजयी राजा आहे. त्याने खूप मोठा विजय मिळविला आहे, त्याने मृत्युची सर्व बंधने तोडून टाकून, मरणाची नांगी मोडून टाकून मृत्युवर विजय मिळविला आहे. आज आम्ही जे विश्वासणारे, ख्रिस्ताला अनुसरणारे त्या आम्हाला देखील आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या वादळवाऱ्यात, तुफानात दृढ, भक्कम, खंबीर असे टिकून राहण्यासाठी, विश्वासात अढळ राहण्यासाठी विजय मिळविणे क्रमप्राप्त आहे. कारण आम्ही विजयी राजाची प्रजा आहों. 

आपण कशाप्रकारे विजय मिळवू शकतो ते वचनाद्वारे पाहू या -


  *१) वधस्तंभ हे विजयाचे रहस्य आहे -* हा देवाचा मार्ग आहे, आमचा कोकरा वधस्तंभावर मरण पत्करून, मरणावर विजय मिळवून, पुन्हा उठला आणि स्वर्गात राजासनावर  देवाच्या उजवीकडे बसला आहे. आमच्या जीवनात वधस्तंभाचे चिन्ह किंवा खूण हाच आमचा खरा विजय आहे. पौल म्हणतो, *आम्ही स्वतःवर नव्हे तर मृतांना सजीव करणाऱ्या देवावर भरंवसा ठेवावा. ( २ करिंथ १:९)* जेव्हा आम्हाला आमचे भवितव्य, भविष्यकाळ, आमचे प्रियजन, आणि अगदी आमचे स्वतःचे जीवन सुद्धा देवाच्या हाती सोपवून देणे शक्य होते तेव्हा आम्ही महाविजयी होण्यास स्वतंत्र आणि पाशरहित असे होतो.


  *२) पुनरुत्थानाचा संदर्भ घेऊन जगणे -* ख्रिस्ताने मरणावर विजय मिळवून, पुनरुत्थानाद्वारे आम्हाला एक नवीन आशा प्राप्त करून दिली आहे. आम्ही पुनरुत्थानावर विश्वास ठेवून मार्गक्रमण केले पाहिजे, आमचे जीवन पुनरूत्थानाचा संदर्भ घेऊनच जगले पाहिजे. पौल म्हणतो, *ख्रिस्त मेलेल्यांतून उठविला गेला आहे, तो महानिद्रा घेणाऱ्यांतले प्रथमफळ असा आहे, कारण मनुष्याच्या द्वारे मरण आहे, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानहि आहे. ( १ करिंथ १५:२०,२१)*


  *३) छळ होणार हे मान्य करून त्याला धैर्याने तोंड देणे -* आमच्या जीवनात जेव्हा वादळे, संकटे येतात तेव्हा आम्ही आमची मने, अंतःकरणे आणि आमचा विश्वास देवाकडे लावून त्या वादळावर मात करू शकतो. वादळे आमच्यावर मात करू शकत नाहीत. आपण देवाच्या शक्तीला कार्य करू द्यावे. देवाचे सामर्थ्य आम्हाला वादळाच्या वर वर नेईल. आमच्या जीवनात आजार, संकटे, दुःख, शोकाचे प्रसंग, अपयश, निराशा घेऊन येणाऱ्या वादळी वाऱ्यांवर आरूढ होण्यास देव आम्हाला शक्ती, सामर्थ्य देतो. आणि आम्ही त्यावर विजय मिळवितो. असे लिहिले आहे की, *तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवी शक्ती संपादन करतील, ते गरूडाप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. ( यशया ४०:३१)*


*श्रीमंती, सुबत्ता आणि संकटांचा अभाव हे आमच्या विजयाचे रहस्य नाही, तर छळ, संकटांमध्येही विजय हेच विजयाचे रहस्य आहे.*


  *४) ख्रिस्ताचा सेवक, सैनिक होणे -* विश्वासणाऱ्याच्या शील, स्वभावावर वधस्तंभाची खूण आहे. डोंगरावरील प्रवचनानुसार स्वाभाविक वर्तणूक आणि प्रत्यक्ष लढाईतील वर्तन ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. साधारणतः एका सैनिकामध्ये दया, शांती, क्षमा, कृपा ह्या गोष्टींना मुळीच स्थान नाही, परंतु देवाचे जे सेवक आहेत, सैनिक आहेत, ते प्रीति, आनंद, शांती, आत्मसमर्पण आणि स्वार्थत्याग ह्या आध्यात्मिक शस्रांनी त्यांचे ध्येय साध्य करून घेतात. आम्ही देवाने आम्हाला सोपवून दिलेली कामगिरी त्याचा सैनिक ह्या नात्याने व्यवस्थित पूर्ण करावी. पौल म्हणतो, *जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हाला पाचारण करीत आहे त्याला शोभेल असे तुम्ही चालावे. ( १ थेस्सल २:१२)*


*छळ सोसणाऱ्यांबरोबर पूढे पूढे जाऊन आम्ही महाविजयी व्हावे आणि आमच्यावर प्रीति करणाऱ्या देवाच्या द्वारे आम्ही जिंकणारे व्हावे अशीच आमच्या जीवनाद्वारे प्रभूची इच्छा आहे.*

         

         

Sunday, 13 December 2020

देव दया करतो



              *✨देव दया करतो✨*


*ज्या कोणावर मी दया करितो त्याच्यावर मी दया करीन आणि ज्या कोणावर मी करूणा करितो त्याच्यावर मी करूणा करीन..✍*

                      *( रोम ९:१५ )*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


    परमेश्वराची दया अगाध आहे. तो प्रेमस्वरूप आहे. तो प्रीतीपूर्ण देव आहे, तो सर्वांबरोबर प्रीतीने वागतो. देव आपल्या परिपूर्ण स्वभावाप्रमाणे वागतो. तो सर्वसमर्थ आहे, तरी आपल्या स्वभावाविरूद्ध वागू शकत नाही. तो न्यायी देव आहे. तो कोणावरही अन्याय होऊ देत नाही. *कारण सर्व जगाचा न्यायाधीश योग्य न्याय करणार नाही काय? ( उत्पत्ति १८:२५)* देव ज्ञानाने परिपूर्ण आहे आणि तो आपल्या ज्ञानानेच कृती करितो. देव कुणावर दया करितो ? प्रियांनो, परमेश्वर सर्वांवर सारखीच प्रीति करतो. त्याने सर्वांना आपल्याकडे येण्याचे आमंत्रण दिले आहे. तो म्हणतो, *अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या. ( मत्तय ११:२८)* आणि प्रभूने म्हटले आहे की, *...जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही. ( योहान ६:३७)*  म्हणून आज आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून, आमच्या सर्व काळजी, चिंता, आमचे दुःख, कष्ट, आमचा सर्व भार त्याच्यावर सोपवून देऊ या. त्याच्या आमंत्रणाचा स्वीकार करू या. कारण जो कोणी ह्या आमंत्रणाचा स्वीकार करतो आणि देवाकडे येतो, त्याला देवापासून दया प्राप्त होते. *देवाची दया सर्वांसाठी आहे. ( रोम ११:३२)* परंतु तरीही असे असूनही तो कित्येकांना कठीण हृदयाचेही बनवतो. आपण पाहातो, मिसरातून चारशे वर्षांच्या बंदीवासातून इस्राएल लोकांची सूटका करण्यासाठी जेव्हा मोशेला परमेश्वराने पाचारण केले होते, तेव्हा फारोच्या कठीण हृदयाला परमेश्वराने अधिक कठीण केले, ह्यासाठी की, त्याच्याद्वारे परमेश्वराचे गौरव व्हावे आणि त्याचे नाव दिगंतापर्यंत पोहोचावे. परमेश्वर म्हणतो, *तथापि मी तुला आपले सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव साऱ्या पृथ्वीवर प्रगट व्हावे यासाठीच मी तुला राखिले आहे. ( निर्गम ९:१६)* फारोने देवाच्या आज्ञा न पाळण्याचा निश्चय केला आणि देवाने त्याला जो आपले मन कठीण करतो त्याचा शेवट कसा होतो ह्याचे उदाहरण असे बनविले. 


   देवाने दया केली नसती तर ! देवाने इस्राएल लोकांनी त्याच्याविरूद्ध इतके बंड करूनही त्यांना स्वतःचे लोक म्हटले, शेकडो वर्षे ते बंड करीत राहिले. त्यामुळे *हे माझे लोक नव्हेत. ( होशेय १:९)* असे होशेय संदेष्ट्यांद्वारे देवाने सांगितले. परंतु तरीही तो दया करणारा आमचा प्रभू असल्यामुळे त्याने इस्राएल लोकांना टाकून दिले नाही. तर परमेश्वराने त्यांच्यावर दया करीन आणि ते पुन्हा देवाचे लोक होतील असे होशेयला सांगितले. ( होशेय २:२३) तो म्हणतो, *ते तुम्ही पूर्वी 'लोक नव्हता,' आता तर 'देवाचे लोक आहात; तुम्हांस दया मिळाली नव्हती,' आता तर 'दया मिळाली आहे.' ( १ पेत्र २:१०)* प्रियांनो, देवाची दया किती महान अशी आहे. त्याने इस्राएल लोकांचा समूळ नाश केला नाही. सदोम व गमोराप्रमाणे इस्राएल लोकांचा नाश तो करणार नाही असे अभिवचन त्याने दिले होते. *सेनाधीश परमेश्वराने आम्हांसाठी यत्किंचित शेष राखून ठेविले नसते तर आम्ही सदोमासारखे झालो असतो, गमोऱ्याप्रमाणे बनलो असतो. ( यशया १:९)* परंतु देव दयाळू आहे आणि तो इस्राएल लोकांवर दया करणारा देव आहे. त्याने इस्राएल लोकांवर दया करून त्यांच्या सर्व अपराधांची क्षमा केली. आजही तो आमच्यावर दया करून आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा करीत आहे. गरज आहे ती आम्ही देवाची दया प्राप्त करून घेण्यासाठी त्याच्याकडे येण्याची, त्याच्या आज्ञांचे पालन करण्याची आणि त्याची परिपूर्ण इच्छा जाणून घेऊन त्यानुसार वागण्याची. 

 

       

Friday, 11 December 2020

ख्रिस्ती जीवन



                  *✨ख्रिस्ती जीवन✨*


*कारण ते देवाच्या पुत्राला स्वतःपूरते नव्याने वधस्तंभावर खिळतात व त्याचा उघड अपमान करतात..✍*

                         *( इब्री ६:६)*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


      वरील वचनाद्वारे आपण पाहतो की, लेखक ह्या वचनाद्वारे लोकांना इशारा देत आहे. त्याची इच्छा आहे की त्यांनी ख्रिस्ताची शिकवण विसरू नये. कारण त्यांचे तारण झाले आहे, ते ख्रिस्ताला ओळखत आहेत, पण तरीही आत्मिक बाबतीत त्यांची वाढ झाली नसल्यामुळे ख्रिस्ताच्या सुवार्तेच्या मूळच्या गोष्टी ते विसरले होते व देवाविषयीची तीच सत्ये त्यांना पुन्हा एकदा शिकविण्याची गरज आहे. त्यांच्याविषयी लेखक म्हणतो, *तुम्ही ऐकण्यात मंद झाला आहात* कारण आतापावेतो त्यांनी स्वतःच शिक्षक व्हावयास पाहिजे होते. ज्याला फक्त नव्या जन्माविषयीची सुवार्ता माहीत आहे, व जो फक्त आपल्या तारणाचाच विचार करतो, ज्याची आध्यात्मिक वाढ झालेली नाही, ज्याला देवाचे वचन व नीतीने चालण्याविषयीचे शिक्षण यांंची माहिती नाही अशा लहान बाळकांसारखे ते झाले आहेत. अशा लोकांबद्दल लिहिले आहे की, *तुम्हाला दूधाची गरज आहे, जड अन्न चालत नाही, कारण दूधावर राहणारा नीतिमत्वाच्या वचनाशी अपरिचित असतो, कारण तो बाळक आहे. ( इब्री ५:१२,१३ )*


    आपण पाहातो की, त्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला व देवापासून मिळणारा आशीर्वाद मिळविला व त्यांना पवित्र आत्मा मिळाला म्हणजेच त्यांनी देवाच्या अभिवचनांचा, समक्षतेचा अनुभव घेतला आहे. असे लिहिले आहे की, *ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानाची रूची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले, आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रूची घेतली ( इब्री ६:४,५)* आणि तरीही *ते जर पतित झाले* म्हणजेच ख्रिस्ती जीवनात पूढे न जाता ते अविश्वासाने राहिले, ख्रिस्तावर अवलंबून राहण्याचे त्यांनी बंद केले आहे. पौल म्हणतो, *ते सत्याविषयी चुकले आहेत ( २ तीमथ्य २:१८)* अशा परिस्थितीमध्ये त्यांना पश्चाताप होईल असे त्यांचे पुन्हा नवीकरण करणे अशक्य आहे असे पौल म्हणत आहे. इब्री लोकांस पत्रामध्ये भूमीबद्दल संदर्भ घेऊन खूप सुंदर उदाहरण दिले आहे. असे लिहिले आहे की, *जी भूमी आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन आपली लागवड करणाऱ्यांना उपयोगी अशी वनस्पती उपजविते, तिला देवाचा आशीर्वाद मिळतो. ( इब्री ६:७)* ह्याचा अर्थ जेव्हा आपण सुवार्ता ऐकतो, आणि ख्रिस्ताच्या समक्षतेमध्ये येतो तेव्हा जे आम्ही ऐकले आहे, ग्रहण केले आहे त्याप्रमाणे आचरण करून आणि इतरांनाही देवाच्या समक्षतेमध्ये घेऊन आले पाहिजे, देवाबद्दलच्या विश्वासामध्ये इतरांनाही वाढण्यास मदत केली पाहिजे. कारण आमच्यामधून शंभर पट पीक मिळावे अशी देवाची इच्छा आहे.  म्हणजे मग आम्हीही आशीर्वादित केले जाऊ. आणि याउलट बायबल मध्ये आणखी एक उदाहरण सांगितले आहे. ते असे की, *पण जी भूमी कांटेकुसळे उपजविते ती नापसंत व शापित होण्याच्या बेतांत आली आहे, तिचा शेवट जाळण्यात आहे. ( इब्री ६:८)* जर भूमीने चांगले पीक दिले नाही, कांटेकुसळेच उपजविली तर ती नापसंत करण्यात येईल. आम्ही आम्हाला सोपवून दिलेली कामगिरी पार पाडली नाही तर आम्ही देवाच्या पसंतीस न उतरलेले असे ठरू. आम्ही देवाचे कामकरी आहोत. आणि देवाचे वचन पेरणे आणि देवाची सुवार्ता अनेकांपर्यंत पोहोचविणे हेच आमचे काम आहे. ते आम्ही केले नाही तर कांटेकुसळे उगविणाऱ्या भूमीप्रमाणे आम्हीही होऊ आणि देवाच्या राज्यासाठी अयोग्य ठरवले जाऊ.


    म्हणून प्रियांनो, आम्ही देवाच्या आज्ञा पाळून त्याच्यावर प्रीति केली पाहिजे. आपला विश्वास टिकवून ठेवून व प्रभूवर प्रीति करून इतरांची सेवा करणे हे विश्वासणाऱ्यांच्या जीवनात दिसून यावे. ख्रिस्तावरील विश्वासाने पूढील काळातील आशीर्वादांची खात्री आम्हाला मिळते. कारण आम्ही करत असलेले कार्य व पवित्र जनांची सेवा ही तो विसरून जाणार नाही तर आम्हाला त्याचे प्रतिफळ दिल्याशिवाय तो राहणार नाही. म्हणून इब्री लोकांस पत्राचा लेखक म्हणतो, *तुम्ही आळशी होऊ नये, तर विश्वासाच्या व धीराच्या योगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे होतात त्यांचे तुम्ही अनुकारी व्हावे. ( इब्री ६:१२)*  ह्या वचनाप्रमाणे आमचे आचरण असावे. आम्ही आळशी नसावे. देवाच्या राज्याची सुवार्ता अनेकांपर्यंत घेऊन जाणारे असे आम्ही असावे.


*आपल्याला जगाचा आत्मा नव्हे, तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे, ह्यासाठी की, "जे देवाने आपल्याला कृपेने दिले" ते आपण ओळखून घ्यावे. ( १  करिंथ २:१२)*


      

Thursday, 10 December 2020

नवे हृदय



                  *✨नवे हृदय ✨*


*सर्व रक्षणीय वस्तुंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे..✍*

                    *( नीति ४:२३ )*


                           *...मनन...*


        *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


     आपण आपल्या सांसारिक जीवनात खूप काही गोष्टींसाठी धावपळ करतो. खूप कष्ट करून, जॉब करून आपल्याला आनंद देणाऱ्या किंवा आपल्याला आवडणाऱ्या वस्तु घेत असतो. आणि त्यास अधिक महत्व देऊन आपण त्या खूप जपतो. उदाहरणार्थ.. मोटार सायकल, कार, दागदागिने, मोबाईल इत्यादि वस्तु आपण आपल्या वैयक्तिक सुखासाठी, आनंदासाठी घेतो आणि त्यांचा अगदी मनापासून सांभाळ करतो. परंतु या सर्व वस्तु सांभाळून आपण आपल्या देवाला प्रसन्न करू शकतो का ? या वस्तूंचे रक्षण करून आपण देवाच्या राज्यात जाऊ शकतो का ? नाही प्रियांनो... आपण या वस्तूंमुळे ना देवाला प्रसन्न करू शकत ना देवाच्या राज्यात जाऊ शकत. आपण प्रभूची इच्छा जाणून घेतली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. वरील वचनाद्वारे प्रभू आम्हाला सांगत आहे की, सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर. होय प्रियांनो, आपले अंतःकरण आपण कसे ठेवतो याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत.


   मनुष्याला गरजेचे आहे की, त्याने आपल्या अंतःकरणाचे रक्षण करावे. कारण त्यात जीवनाचा उगम आहे. आणि जीवन म्हणजे प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो स्वतःच म्हणतो, *मार्ग, सत्य व जीवन मी आहे.* सर्व बरे वाईट विचार अंतःकरणातूनच निर्माण होतात आणि मनुष्य पापात पडतो. जीवनाचा उगम तेथे आहे, म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त तेथे अंतःकरणात आहे आणि म्हणून आपण सर्व वाईट विचार, कुकल्पनांपासून दूर राहावे. कारण जिथे ख्रिस्त आहे तिथे ह्या गोष्टींना जागा नाही. आपण पाहातो की, मनुष्याला बाहेरून जाऊन भ्रष्ट करील असे काहीच नाही तर मनुष्याच्या अंतःकरणातून निघणारे वाईट विचार मनुष्याला विटाळविते. येशू म्हणतो, *जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला विटाळविते. कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्म, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिवीगाळी ही निघतात. ( मत्तय १५:१८,१९)*


    जेव्हा ख्रिस्त आमच्या जीवनात असतो तेव्हा आपोआपच ह्या जगिक गोष्टींपासून आम्ही दूर केले जातो. आमचे अंतःकरण ख्रिस्ताकडे, ख्रिस्ताविषयीच्या गोष्टींकडे लागलेले असते. आमच्या जीवनातील प्रत्येक क्षण आम्ही ख्रिस्ताला दिलेला असतो. प्रत्येक गोष्टींमध्ये प्रथम स्थान ख्रिस्ताला दिलेले असते. आम्ही संपूर्णपणे ख्रिस्तमय झालेले असे दिसून येतो. प्रेषित पौलाप्रमाणे आपले जीवन असावे. पौल म्हणतो, *मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे, आणि ह्यापूढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्याठायी जगतो, आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे, त्याने माझ्यावर प्रीति केली व स्वतःला माझ्याकरिता दिले. ( गलती २:२०)*


    देवापासून विभक्त असलेले जीवन मात्र ह्याउलट असते. तेथे सर्व जगिक गोष्टींचा अंगीकार केलेला दिसून येतो. प्रभूला प्राधान्य न देता जगिक गोष्टींचा उदोउदो करत असलेले असे आणि देवापासून विभक्त असलेले असे अंतःकरण आपणांस पाहावयास मिळते. प्राचीन इस्राएली लोकांची अवस्था अशीच झालेली आपण पाहातो. त्यांच्या ठायी असलेल्या पापांमुळेच त्यांना बंदीवासात जावे लागले. आणि त्यांच्यामुळे देवाचे नाव सर्व राष्ट्रांमध्ये अपवित्र झाले होते. तरीही परमेश्वर त्यांना म्हणत आहे की, *मी तुमचा सर्व अधर्म घालवून तुम्हांस स्वच्छ करीन, तेव्हा नगरे वसतील व पडीत जागा बांधण्यात येतील असे मी करीन. ( यहेज्केल ३६:३३)* परमेश्वराने त्यांना खूप सुंदर अभिवचन देऊन आशीर्वादित केले. प्रभू परमेश्वर म्हणतो, *मी तुम्हांस नवे हृदय देईन, तुमच्या ठायी नवा आत्मा घालीन, तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हांस मांसमय हृदय देईन. ( यहेज्केल ३६:२६)* किती सुंदर अभिवचन दिले आहे परमेश्वराने त्यांना !! ज्यांनी देवाच्या सर्व आज्ञा मोडल्या, मूर्तिपूजेच्या मागे लागले त्यांना प्रभूने इतके सुंदर अभिवचन दिले. कारण परमेश्वर खरोखरच आम्हांवर खूप प्रीति करतो. तो आमचे हट्टी, कठीण, सर्व प्रकारच्या दुष्टतेने भ्रष्ट झालेले हृदय काढून टाकून आम्हाला देवाचे ऐकणारे, देवाच्या आज्ञा पाळणारे शुद्ध हृदय देईल आणि त्यासाठी, आम्ही जगीक गोष्टींची नाही तर देवाची इच्छा करणारे असले पाहिजे, देवाचे पवित्र वचन जतन करून ठेवणारे असले पाहिजे. मग परमेश्वर आम्हाला नवीन शुद्ध अंतःकरण देईल. देवाच्या या अद्भूत देणगीबद्दल आम्ही देवाची स्तुती करू या. देवाचे आभार मानू या.


   *!!..प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो..!!*      


     *

Wednesday, 9 December 2020

उचित समय



                 *✨उचित समय✨*


*सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो, भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो..✍*

                 *( उपदेशक ३:१)*


                   *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


    उपदेशक पुस्तकाचा लेखक सर्वांचा काही उचित काळ असतो हे सांगत असताना पूढे मानवाच्या नित्य जीवनातील आणि अनुभवातील असे अनेक प्रसंगाचे वर्णन त्याने केले आहे. जसे की, जन्म व मृत्युचा समय, रोपण्याचा व उपटण्याचा समय, वधण्याचा व बरे करण्याचा, मोडून टाकण्याचा व बांधण्याचा, रडण्याचा व हसण्याचा, शोक करण्याचा व नृत्य करण्याचा, प्रेम करण्याचा व द्वेष करण्याचा अशा अनेक समयांचे वर्णन केलेले आम्हाला पाहावयास मिळते. कारण प्रत्येक गोष्टींचा एक उचित काळ असतोच. आणि त्या त्या वेळीच म्हणजे योग्य समयीच ती गोष्ट घडत असते. आमच्या जीवनात सर्व काही परमेश्वराच्या योजनेनुसारच घडून येत असते. म्हणून आम्ही शांत राहून देवाच्या इच्छेप्रमाणे, योजनेप्रमाणे घडून येण्याची वाट पाहावी.


   प्रियांनो, ऋतू बदलतात, मौसम बदलतात. आमची परिस्थिती देखील कायम आहे अशी राहात नाही तर तीही बदलत राहाते. चांगल्या बदलाचे आम्ही आनंदाने स्वागत करतो परंतु अनेकदा जीवनात कठीण प्रसंग येतात, दुःखाचे, निराशेचे, हानीचे त्याचे आपण स्वागत करू शकत नाही पण त्यांचा स्वीकार करण्यावाचून काहीच पर्याय नसतो. परंतु सर्व परिस्थिती बदलली तरी आमचा देव कधीच बदलत नाही. तो कधीही न बदलणारा देव आहे. मलाखी संदेष्ट्याच्या द्वारे तो म्हणतो, *मी परमेश्वर बदलणारा नव्हे. ( मलाखी ३:६)* देव आहे तसाच राहतो. तो कधीच बदलत नाही, पालटत नाही म्हणूनच जरी आमच्या जीवनात कठीण प्रसंग आले तरीही आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून चालत असलो तर आम्हाला भिती बाळगण्याचे किंवा चिंता करण्याचे काहीच कारण नाही. आम्ही त्याच्यावर विसंबून राहू शकतो. कारण तो आमची काळजी घेतो आणि सदैव आमच्या बरोबर असतो. संकटसमयी तो आम्हाला साहाय्य करतो आणि आम्हाला संकटातून सोडवितो. स्तोत्रकर्ता म्हणतो, *देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे, तो संकटसमयी साहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. ( स्तोत्र ४६:१)* 


    परमेश्वर सदोदित आमच्या सन्निध असतो. आमच्या अंतःकरणाचे रक्षण करण्यास त्याची शांती समर्थ आहे. पौल म्हणतो, *कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. ( फिलिप्पै ४:६,७)* परमेश्वराची प्रीति आम्हां विश्वासणाऱ्यांच्या फक्त बाह्य शरीराचेच रक्षण करीत नाही तर आमच्या जीव आत्म्यांना देखील सुरक्षित ठेवते. परमेश्वराची आम्हांवरील प्रीति आम्हाला सावरून धरते. आम्हाला देवापासून दूर करीत नाही. पौल म्हणतो, *उंची, खोली, किंवा दूसरी कोणतीहि सृष्ट वस्तु, ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीति आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करावयाला समर्थ होणार नाही. ( रोम ८:३९)* 


*ह्या नेहमी नेहमी बदलणाऱ्या समयात कधीही न बदलणारा आमचा देव आम्हाला सुरक्षित ठेवतो.*


        

Tuesday, 8 December 2020

हृदयात वचन आहे काय?

 *स्तोत्र १९ : ७ - ११*


    *हृदयात वचन आहे काय?*


     *म्हणून तुम्ही माझी ही वचने आपल्या ध्यानीमनी साठवून ठेवा*. 

        *अनुवाद ११ : १८.*


     निशायला कामानिमित्त नेहमीच एक शहरातून दुसऱ्या शहरात जावे लागते. त्याची एक सवय आहे की तो नेहमी प्रवासाला जाताना आपल्या सुटकेस मध्ये एक पुस्तक ठेवायचा . आणि त्याचे वाचनही करायचा. त्याचा हा नियम कधी चुकत नाही.पुस्तकाशिवाय त्याला अगदीच करमत नाही. त्यात तो अगदी रमून जातो. त्यामुळे तो कधीच अनावश्यक विचार करीत नाही किंवा कोणाच्या विरोधात बोलत बसण्यात वेळही वाया घालवीत नाही. आपलं काम बरं आणि  आपलं पुस्तक बरं !!

     देवाने आपल्याला सांगून ठेवले आहे की तुमच्या ध्यानी मनी ,तुमच्या हृदयात ही वचने नेहमीच जपून ठेवा.

   कारण जेव्हा हे वचन आमच्या हृदयाच्या सुटकेस मध्ये हे वचन आम्ही जपून ठेवतो तेव्हा आपोआप त्या वचनाचे मनन आणि चिंतन होतच राहते त्यामुळे त्याचा उलगडा आणि त्याचे  प्रकटीकरण परमेश्वर आपल्याला करीत असतो. त्यामुळे जीवनातील नकारात्मक विचार , निघून जातात. ह्या उत्तम आशा वचनाच्या चिंतनामुळे उत्तम आणि देवाला आवडणाऱ्या देवाच्या सानिध्यात नेणाऱ्या गोष्टी आमच्या आचरणात यायला लागतात.आमचा जीव त्यात रमून जातो.

    *जेव्हा ह्या देवाच्या वचनांचा उलगडा होतो ती वचने बावनकशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आणि मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड लागतात.* आणि रोजच्या जीवनात त्याचा अनुभव येतोच.ही वचने आमचे हृदयाला आनंदीत करतात. कितीही कठीण प्रसंग आला असेल तरीही अंतरीचा हा आनंद लोप पावत नाहीच. हे बायबल  जे देवाचे वचन आहे ते आम्हाला अंधारातून  प्रकाशाकडे घेऊन जाते. आमचे अध्यात्मिक नेत्र प्रकाशमान करते. त्यामुळे अंधकाराच्या साम्राज्यापासून ते दूर ठेवते. कारण जेव्हा देवाचे वचन हृदयात असते तेव्हा आमच्या पावलांना दिव्यासारखे होत आमच्या जीवनाच्या मार्ग उजळून टाकते. आणि जेव्हा हे वचन आमच्या आचरणात येते तेव्हा जी आशीर्वादाची फळे मिळतात ती इतरांनाही दिसतातच. 

      *आमच्या हृदयाच्या सुटकेसमध्ये हे  देवाचे वचन आहे काय? जर आम्हाला वरील सर्व आशीर्वाद हवे आहेत तर जपून ठेऊ हे देवाचे वचन सदैव आमच्या हृदयात !!*      *सर्व समर्थ ईश्वरा तुझे पवित्र वचन सदैव माझ्या हृदयात राहूदे* *आमेन.*

      

Monday, 7 December 2020

आध्यत्मिक दैन्यावस्था

 *याकोब ४:२-३*


                 *प्रार्थनेची*

     *आध्यत्मिक दैन्यावस्था*


  *तुम्ही इच्छा धरता तरी तुम्हाला प्राप्त होत नाही ; तुम्ही घात व हेवा करता तरी हवे ते मिळविण्यास तुम्ही समर्थ नाही ; तुम्ही भांडता व लढता ; तुम्ही मागत नाही ; म्हणून तुम्हाला प्राप्त होत नाही.*  *याकोब ४:२*.


      देवाकडे मागणे म्हणजेच प्रार्थना करणे . पण वरील वचनात आमची अध्यात्मिक दैन्यावस्था  यामुळे प्रार्थनेकडे होणारे दुर्लक्ष हेच प्रकर्षाने जाणवते. याकोब हीच जाणीव करून देत आहे की, खुपकाही आपल्या इच्छा असतात, आपल्या जीवनात अमुक एक गोष्ट व्हावी , किंवा आपल्याला काही हवं असते पण मिळत नाही. जेव्हा मिळते नाही तेव्हा आपण आपले मार्ग शोधायला लागतो की जे देवापासून नसतात तर आपल्या बुद्धीने ठरवलेले असतात  त्यामुळे  वचनात सांगितल्या प्रमाणे घात, हेवा, भांडण वगैरे अशा मार्गावर आपली जर पावले पडत असतील तर ती अध्यात्मिक दैन्यावस्था निश्चितच असते. *कारण आम्ही देवाकडे मागतच नाही.*  *प्रार्थना हे एक असं दार आहे की आपण जे उघडलं तर परमेश्वराच्या उत्तम योजना   व परमेश्वराच्याच  संकल्पानुसार  आमच्या इच्छा पूर्णत्वास जातात. पण हे प्रार्थनेचे दार आपणच बंद करून ठेवतो. प्रभू येशू म्हणतो , जेव्हा तुम्ही प्रार्थना करता*. जेव्हा म्हणतो प्रभू, जर प्रार्थना करता असं म्हणत नाही. *जर* म्हणजे केली तर केली नाही केली प्रार्थना तरी ठीक आहे. पण *जेव्हा* हा शब्द  प्रार्थना केलीच पाहिजे ही आज्ञा दर्शवितो. प्रभू येशू म्हणतो प्रार्थना करा, मागा तरच मिळेल. पण आमचा अध्यात्मिक आळस आड येतो.

    एक इंटिरिअर डेकोरेटर त्याच्या मित्राच्या घरी गेला , दोघे खूप चांगले मित्र होते. त्याने मित्राच्या घराची हॉलची  अरेंजमेंट पाहिली , त्याच्या मनात 

 आले की जर या मित्राने सोफा आहे तिथे न ठेवता दुसऱ्या दिशेला ठेवला, टीव्ही , डायनिंग टेबलची रचना बदलून घेतली तर मस्तं हॉल दिसेल , छान गेटअप येईल. पण हा इंटिरिअर डेकोरेटर मित्र काहीच करू शकत नाही जोवर त्याचा मित्र विचारीत नाही तोवर. कारण कितीही चांगला मित्र असला तरी घर त्याच आहे, अधिकार त्याचा आहे त्याच्या घरात काय कसे असावे यावर.पण जर ह्या इंटिरिअर मित्राला त्याने विचारले तर नक्कीच त्याच घर  हा मित्र उत्तम करून देईलच .. अगदी असेच आपण प्रभूला जेव्हा विनवतो तेव्हा तो नक्कीच उत्तम ते देतो.

    परमेश्वराने सुध्दा आम्हाला निवडीचा अधिकार दिला आहे आणि इच्छा स्वातंत्र्य दिले आहे. म्हणूनच आपण परमेश्वराच्या इच्छेलाच निवडले आणि प्रार्थना पूर्वक मागितले तर परमेश्वराच्या उत्तम योजनाच आपल्या जीवनात आनंद निर्माण करतील. हेवा, घात, भांडणं अशा अध्यात्मिक दैन्यावस्थेकडे  नेणाऱ्या गोष्टींना वावच राहणार नाही. 

    *फक्त गरज आहे ती अध्यात्मिक आळस आणि दैन्यावस्था झटकून सदैव प्रार्थनेत तत्पर राहण्याची !!*

   *सामर्थ्यशाली पित्या आम्ही निरंतर प्रार्थना करून तुझ्या उत्तम योजना आमच्या जीवनात सफल व्हाव्यात यासाठी तुझ्या पासून मिळणाऱ्या आशीर्वादाचे दरवाजे प्रार्थनेद्वारे सतत उघडे ठेवावेत असे कर.* *आमेन*

      

Sunday, 6 December 2020

परीक्षेत पडू नका



            *✨परीक्षेत पडू नका✨*


 *तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला ( प्रभू येशूला) अरण्यात नेले..✍🏼*

                      *( मत्तय ४:१ )*


                           *...मनन...*


           *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!* 


    अरण्यात सैतानाकडून येशूची परीक्षा झाली. ह्या वचनावरून आपल्याला आठवण होते ती रानामध्ये इस्राएल लोकांच्या झालेल्या परीक्षेची. प्रभू येशूने चाळीस दिवस उपास केला. देवाच्या इच्छेचे, त्याच्या योजना, हेतू, मार्ग यांचे परिपूर्ण पालन करण्याच्या मार्गापासून येशूला दूर न्यावे म्हणून सैतानाने त्याची परीक्षा घेतली. ही परीक्षा येशूच्या कार्यध्येयाच्या पूर्तीसाठी दिव्य उद्देशाने योजिलेली मोहपरीक्षा होती. सैतानाचे सर्व प्रयत्न स्वतःला उंच करून घेण्याच्या मानवी इच्छेला आवाहन करणारे असे होते. परंतु आपण पाहातो की, प्रभू येशूने सैतानाने सुचविलेल्या मोहांना बळी न पडता देवाच्या लिखित वचनांच्या द्वारे सैतानाचे सर्व बेत हाणून पाडले आणि तो देवाच्या वचनाच्या अधीन झाला. सैतानही देवाच्या वचनांचा आधार घेऊन प्रभू येशूला मोहात पाडण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु सैतानाकडून आलेली प्रत्येक सूचना, प्रत्येक मोह प्रभू येशूने शास्रवचनाच्या आधारेच धूडकावून लावले. प्रभू येशूच्या या अनुभवातून आम्ही कोणते धडे शिकणे आवश्यक आहे ते स्पष्ट होते. आम्हां विश्वासणाऱ्यांची परीक्षा होत असता आम्ही काय करावे, कसे तोंड द्यावे ते यातून आम्हाला शिकता येईल. सैतानाकडून आमची परीक्षा होते तेव्हा आम्ही ख्रिस्ताप्रमाणे देवाच्या अधीन व्हावे, पवित्र वचनाद्वारे त्याचे बेत, त्याच्या योजना हाणून पाडाव्यात. तरच आमचा निभाव लागू शकतो आणि आम्ही ठाम राहू शकतो.


   आमचा सर्वात मोठा शत्रू सैतान हा आहे. त्याच्याबरोबर आमचे आध्यात्मिक युद्ध सतत चालूच असते. त्यासाठी आम्ही सतत तयार असले पाहिजे. इफिस सहाव्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे देवाची शस्रसामग्री धारण केली पाहिजे. पवित्र आत्मा आणि देवाच्या पवित्र वचनांचा योग्य उपयोग करून सैतानाला थोपवले पाहिजे. वचनाद्वारे आम्हाला सामर्थ्य प्राप्त होते. देवाच्या वचनाचे वाचन, मनन करून त्याचे आमच्या जीवनात लागूकरण केले पाहिजे. देवाचे वचन आम्ही आमच्या अंतःकरणात साठवून ठेवले पाहिजे. ते तोंडपाठ करून त्यायोगे आमचे मन भरून टाकले पाहिजे. याकोब लिहीत आहे की, *"म्हणून सर्व मलिनता व उचंबळून आलेला दुष्टभाव सोडून, तुमच्या जिवाचे तारण करण्यास समर्थ असे मुळावलेले वचन सौम्यतेने स्वीकारा." ( याकोब १:२१)* पवित्र आत्मा आम्हाला देवाच्या वचनाचे पालन करण्यासाठी प्रेरणा देईल आणि साहाय्य करील. म्हणून प्रियांनो, आम्ही पवित्र आत्म्याला त्यासाठी प्रतिसाद दिला पाहिजे, त्याच्यावर अवलंबून राहिले पाहिजे. मोहाचा सामना करण्यासाठी आणि त्यावर विजय मिळविण्यासाठी पवित्र शास्रातील प्रत्येक उपयुक्त वचनाद्वारे देवाचे साहाय्य घेतले पाहिजे. पवित्र वचनाच्या साहाय्याने त्याला हरवले पाहिजे. सर्वात महत्वाचे म्हणजे आम्ही देवाच्या अधीन व्हावे. 


    

Saturday, 5 December 2020

अनुग्रह के परमेश्वर में विश्वास करते हैं।

 _*अनुग्रह के परमेश्वर में वीसवास करते हैं।*_


_*इसलिये आओ, हम अनुग्रह के सिंहासन के निकट हियाव बान्धकर चलें,* कि हम पर *दया हो, और वह अनुग्रह पाएं, जो आवश्यकता के समय हमारी सहायता करे॥*_

_*इब्रानियों 4:16*_


_क्या आप कईयो से जैसे है जो एक "धार्मिक" परमेश्वर में विश्वास करते हैं? क्या आप मानते हैं कि जब आप कम पड़ते हैं, तो परमेश्वर आप के खिलाफ होता है, कि जब आप  असफल होते हैं, तो वह आपसे नाराज होता है, और जब आप गलतियां करते हैं, तो उसके साथ संगति काट दी जाती है?_

_*यह कोई आश्चर्य की बात नहीं है की एक सच्चे समाधान के लिए चलने की  बजाय,कई ईमानदार लोग विपरीत दिशा में भागते हैं जब वे दर्द कर रहे हैं होते हैं। तो एक बड़ा धोखा है,*_


_*परमेश्वर के बारे में एक शक्तिशाली, गलत धारणा जिसने निंद्रा,अपराध,भय, पराजय और व्यसन के दुष्चक्र में कई लोगों को फंसा दिया है*_

_*मेरे मित्र, मैं चाहता हूं की आप आज यह जान ले कि परमेश्वर असीम कृपा के परमेश्वर हैं वह "धामिक" के प्रति अपमानजनक है ,लेकिन जो लोग आहत हो रहे हैं, उनके प्रति दयालु है।*_ 

 _कोई फर्क नहीं पड़ता की आप     दौर से गुजर रहे हैं, जो भी व्यसन  आपको बांध सकते हैं, सही विस्वास आप को मुक्त कर सकता है। इस शक्तिशाली सत्य पर वीसवास करने के साथ शुरू करें:_


_*परमेश्वर अनुग्रह और क्षमा का परमेश्वर है। वह आपसे प्यार करता है, और वह आपकी गलतियों को आपके खिलाफ नहीं रखता है। अतीत में आपके द्वारा की गई गलतियों को आप परमेश्वर तक पहुंचने और आपकी सभी विफलताओं के लिए उनकी  क्षमा प्राप्त करने से पीछे हटने नहीं देंगे। प्रभु के बारे में सही मानना शुरू करो, उनके दिल और तुम्हारे लिये प्यार के बारे में सही विश्वास करो,ओर तुम्हारा पूरा जीवन रूपांतरित हो जाएगा। सही विश्वास करने से हमेशा सही जीवनयापन होता है,।*_

खरे आंधळे कोण

 *मत्तय २०:२९-३४*


          *खरे आंधळे कोण?*


     *त्यांनी उगे रहावे म्हणून लोकांनी त्यास धमकावले ; तरी ते अधिकच ओरडून म्हणाले ; प्रभो, दावीदाचे पुत्रा आम्हावर दया करा.* 

       *मत्तय २०: ३१*

    पुष्कळ लोकांचा स्वभाव असतो दुसऱ्यांना मागे खेचण्याचा! किंवा अति महत्वाच्या किंवा समाजातील मान्यवर अशा व्यक्तीच्या जर ते जवळचे असतील तर ते स्वतःलाच मोठे, महत्वाचे समजायला लागतात  स्वतःचे महत्व टिकवण्यासाठी किंवा  आमची मर्जी असेल तरच तुम्ही भेटू शकता हे इतरांच्या मनावर ठसवण्यासाठी .  येशूच्याही काळात असे लोक त्याच्या भोवती होते. जेव्हा हे दोन आंधळे येशूला  हाका मारू लागले तेव्हा येशूच्या जवळच्या लोकांनीच त्यांना धमकावले.. 

      पण हे दोघे गप्प बसले नाहीत तर आणखी मोठयाने हाका मारू लागले. ते ऐकून येशू स्वतः थांबला त्यांना जवळ बोलावून त्यांच आंधळेपण दूर केले. त्यांना प्रभू येशू दिसला आणि लाभला सुद्धा !! 

   *जो मनापासून प्रभूला हाक मारतो प्रभू येशु त्यांच्यासाठी वेळ देतो, भेट घेतो, आणि त्यांच्या जीवनात आणि त्याच मंडळीत कार्यसुद्धा करतो*. *कोणी कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरीही !!* मला नेहमी वाटते की हे दोन आंधळे खऱ्या अर्थाने डोळस  होते. कारण डोळ्यांनी जरी ते प्रभूला पाहू शकत नव्हते तरी त्यांच्या अंतकरणाने मात्र प्रभूला पुरतेपणी पाहिलं होतं, पूर्ण विश्वास ठेवला होता , म्हणूनच त्यांना जरी लोकांनी धमकावले तरीही त्या धमकावण्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी विश्वासाने प्रभू येशूला हाक मारली. *त्यांच्या अंतकरणाचा डोळसपणा  प्रभुनेच जाणला*.. म्हणूनच तो थांबला, आपला वेळ त्यांना दिला आणि शारीरिक आरोग्यही बहाल केले. 

    *खरे आंधळे तर त्यांना प्रभू येशूला भेटण्यापासून धमकावणारे, अडवणारेच होते*.. आजही अशा प्रभू येशूला भेटू न देणाऱ्या आंधळ्याची मंडळीत कमतरता नाही.. ते स्वतःही प्रभूला जाणत नाहीत ,भेटत नाहीत आणि इतरांनाही भेटू देत नाहीत.. *त्यांची अंतःकरणे ह्या युगाच्या दैवताने आंधळी केलेली असतात*. *म्हणजेच स्वार्थीपणा, अहंकार,  ह्यामुळे त्याच्यामध्ये आंधळेपण आलेले आहे*..      

*२करिंथ ४:४*.  आम्ही तर असे अंतःकरणाने आंधळे नाहीत ना की ज्यामुळे आम्हाला प्रभू येशू दिसत नाही आणि इतरांनाही दिसू देत नाही. जर आमच्यातही  असे आंधळेपण असेल तर प्रभूला विनंती करू की,

     *सर्वसमर्था तुझ्यापासून दूर नेणारे अंतःकरणाचे आंधळेपण आमच्यात असेल तर दूर कर.* *आमेन*...

     

मुकुटमंडित ख्रिस्त



             *✨मुकुटमंडित ख्रिस्त✨*


*ज्याच्यासाठी सर्व काही आहे, व ज्याच्याद्वारे सर्व काही आहे, त्याने पुष्कळ पुत्रांना गौरवात आणतांना त्यांच्या तारणाचा जो उत्पादक त्याला दुःखसहनाच्या द्वारे परिपूर्ण करावे हे त्याला उचित होते..✍*

                      *( इब्री २:१०)*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


     देवाचा पुत्र, प्रभू येशू ख्रिस्त किती श्रेष्ठ आहे आणि आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये ह्याकडे लेखक वाचकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आमच्या प्रभूचे देवपण आणि मानवपण हे इथे सांगितलेले आहे. मानवरूपात जन्म घेतल्यामुळे तो आमच्या सर्व गरजा समजून घेण्यास समर्थ आहे, कारण *तो परिपूर्ण मानव आहे.* त्याला मानवाच्या दुबळेपणाची जाणीव आहे. त्याचप्रमाणे *तो परिपूर्ण देवही आहे.* म्हणूनच तो आमच्या सर्व गरजांची परिपूर्ती करावयास समर्थ आहे. देवाने कधी असे योजिले नव्हते की पूढे कधीतरी देवदूत ह्या जगावर सत्ता चालवितील, परंतु देवाने मानवाच्या बाबतीत मात्र ही योजना केली होती. देवाने मनुष्याला ह्या जगाची निर्मिती केली तेव्हाच त्याला ह्या जगातील सर्व गोष्टींवर सत्ता दिली होती. ( उत्पत्ति १:२६ ते २८) परंतु आदामाने पाप केल्यामुळे ही त्याची सत्ता गेली. आणि आज सत्ता मिळविण्यासाठी मनुष्यांमध्ये स्पर्धा चालू आहे. मनुष्याने पाप केल्यामुळे ह्या जगात मरण शिरले. मनुष्य मरणाच्या अधीन आहे. तरी परमेश्वर त्याची आठवण करतो आणि मनुष्याला *वर उचलण्यास* तो तयार आहे. देवाने मनुष्यासाठी जे योजिले होते ते पूर्ण करण्यासाठी देवाने एक खूप आश्चर्यकारक योजना आखली. आणि देवाचा पुत्र ह्या जगात देहधारी होऊन आला. तो मनुष्य झाला. आणि आता हा मनुष्य म्हणजे देवाचा पुत्र ह्याला देवाने जगाचा अधिपती असे नेमिले आहे. *तूं त्याला गौरव व थोरवी ह्यांनी मुकुटमंडित केले आहे, आणि तूं आपल्या हातच्या कृत्यांवर त्याला नेमिले आहे, तूं सर्व काही त्याच्या अधीन, त्याच्या पायांखाली ठेविले आहे. ( वचन ७)* 


        मानवाला त्याच्या पापापासून सोडविण्यासाठी देवाने देवदूताला नाही, तर स्वतःच्या पुत्राला पाठविले आणि तेही देवदूताच्या रूपात नाही, तर मानवरूपात पाठविले. ह्यासाठी की, त्याने आमचा उद्धारक होऊन मानव म्हणून दुःख सोसावे आणि मानव म्हणूनच मरावे जेणेकरून मरणावर सत्ता गाजविणाऱ्या  सैतानाला हतबल करावे, त्याची मरणावरची सत्ता उलथून टाकावी. देवाने मनुष्यमात्रावर कृपा केली आणि ख्रिस्ताने मनुष्यांकरिता दुःखसहन सोसले, मरणाचा अनुभव घेतला. आणि आज *येशू ख्रिस्त गौरव व थोरवी ह्यांनी मुकुटमंडित आहे.* त्याच्याद्वारे देवाची मनुष्याच्या बाबतीतली योजना पूर्ण होणार आहे, ती ही की, *मनुष्य ह्या जगावर सत्ता चालवील.* ख्रिस्ताने मरण सोसून मानवांच्या पापांबद्दल प्रायश्चित्त केले आणि अशारितीने मनुष्याला देवाच्या आशीर्वादात येण्याचा मार्ग मोकळा झाला. त्याने आपल्या मरणाने, मरण व मरणावर सत्ता चालविणारा सैतान ह्यांची सत्ता दूर केली. जे मरणाच्या सत्तेत होते त्यांना बंधमुक्त केले. आणि त्याने मरणातून परत उठून अधोलोक व मरण ह्यांवरचा अधिकार त्याने मिळविला. सैतान मरणाच्या बंधनात आता कोणालाच जखडून टाकू शकणार नाही.


      म्हणून प्रियांनो, आम्ही आमच्या दुबळेपणाकडे म्हणजेच स्वतःकडे व स्वतःच्या अशक्तपणाकडे लक्ष लावू नये तर आमचे हे दुबळेपण, हे अशक्तपण दूर करण्यास समर्थ असणाऱ्या आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्ही लक्ष लावले पाहिजे. आमची नजर पृथ्वीवरील, जगीक गोष्टींकडे नाही, तर वर स्वर्गाकडे, जिथे आमचा प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या उजवीकडे बसला आहे, तिथे आमच्या मुकुटमंडित अशा ख्रिस्ताकडे आम्ही आमची नजर लावली पाहिजे.


       *

Thursday, 3 December 2020

स्वामीला उपयोगी पात्र



           *✨स्वामीला उपयोगी पात्र✨*


*जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करील, तर तो पवित्र केलेले, स्वामीला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले, असे मानाचे पात्र होईल..✍*

              *( २ तीमथ्य २:२१)*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


    प्रभूच्या दासाने कसे राहावे, त्याचे आचरण कसे असावे हे पौल तीमथ्याला सांगत आहे. *देवाचा एक चांगला शिपाई ह्या नात्याने आपण दुःख सोसले पाहिजे* असे पौल सांगत आहे. आमच्या सेवेचे क्षेत्र हेच आहे. येथे आम्ही कसोटीस उतरले पाहिजे. देवाच्या कार्याची *लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला* असे आपण असावे. ख्रिस्ताच्या ठायी कृपेमध्ये *बलवान होत जा* असे पौल म्हणतो. प्रभूला संतोष देण्यासाठी झटायचे होते आणि देवाच्या वचनातील नियमानुसार वागणे अगत्याचे होते. मंडळी जेव्हा एकत्र येते तेव्हा ती प्रभूसमोर असते. अशावेळी स्वतःची मते मांडून, वचनाचा दूसराच अर्थ लावून वाद घालू नये तर *देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी हो* असे पौल सांगत आहे. देवाच्या वचनाचा विपरीत अर्थ सांगून मंडळीचा नाश करणारा नव्हे तर *तू सत्याचे वचन नीट सांगणारा हो* असे पौल सांगतो. म्हणजे मंडळीची उन्नती करणारे झाले पाहिजे.


    तीमथ्याने नेहमी कसे राहावे हे सांगताना पौल म्हणतो, *प्रभूला उपयोगी पात्र* असा तू हो. पात्र कशाचे बनवले आहे, कोणत्या धातूचे बनवले आहे हे महत्वाचे नाही तर त्याचा योग्य उपयोग होतो का हे पाहिले पाहिजे. ते उपयोगी असावे ह्यासाठी ते स्वच्छ, साफ असावे आणि चांगल्या कामासाठी तयार केलेले असावे. प्रभू आपला उपयोग चांगल्या कामासाठी करतो का ? किंवा आपला उपयोग करता येत नाही किंवा आपण उपयोगी पात्र नाही म्हणून त्याने आम्हाला बाजूला काढून ठेवले आहे का ? असे होऊ नये म्हणून जपा. आणि प्रभूच्या उपयोगी येणारे पात्र बनण्यासाठी आपल्याला शुद्ध, पवित्र बनवा. पवित्र राहण्यासाठी काही गोष्टींपासून दूर राहावे लागते व काही गोष्टींच्या पाठीस लागावे लागते. जसे की, तरूणपणाच्या वासना म्हणजे, उतावीळपणा, तापट, संतापी वृत्ती, स्वतःच्या इच्छा पूढे करणे, वादविवाद करण्यास सरसावणे, आणि अनेक प्रकारच्या अनैतिक पापाच्या इच्छा किंवा पापाची बंधने ह्यापासून दूर राहिले पाहिजे. आणि ह्या गोष्टींच्या पाठीस लागावे - देवाच्या लोकांबरोबर सहभागितेमध्ये राहावे आणि देवाच्या विश्वासामध्ये अधिकाधिक वाढावे, विश्वासामध्ये स्थिर राहावे ही प्रत्येक विश्वासणाऱ्याची गरज आहे. सहभागितेमध्ये राहिले म्हणजे ते सर्व देवाचे लोक प्रभूचा धावा करणारे आणि एकमेकांना आधार देऊन एकमेकांना उत्तेजन देणारे असे असतात. उगाचच वायफळ वादविवादापासून दूर राहावे कारण वादविवाद भांडणास कारण होतो. आणि ख्रिस्ती माणसाने कधीही भांडू नये. *प्रभूच्या दासाने भांडू नये तर त्याने सर्वांबरोबर सौम्य, शिकविण्यात निपूण, सहनशील, विरोध करणाऱ्यांना सौम्यतेने शिक्षण देणारा, असे असावे. ( वचन २४,२५)* त्यामुळेच कदाचित विरोध करणाऱ्यांना पश्चाताप होईल आणि ते देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यास तयार होतील. देवाच्या कार्यामध्ये खरी सौम्यता खूप आवश्यक आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो, *...तुझ्या लीनतेमुळे मला थोरवी प्राप्त झाली आहे. ( स्तोत्र १८:३५)*


    ख्रिस्ती जीवनासंबंधाने आम्ही वाद घालू नये तर ते आम्ही जगावे. जगातील लोकांवर मात करण्यासाठी, त्यांच्याहून अधिक चांगले असे आमचे आचरण असावे, ह्यासाठी की, आमचे बोलणे, आमचे वागणे हे पाहून त्यांचे जीवन बदलले जाईल.  जगातील लोकांना आमचे जीवन एक आदर्श जीवन ठरावे आणि त्यांच्यासमोर कित्ता घालून देण्यासाठी उपयोगी यावे. आपल्या सेवाकार्यातील लीनता आणि विश्वासाची खात्री ह्यामुळे मंडळीविषयीची द्वेषभावना जाऊन मंडळीला तिचे योग्य स्थान प्राप्त होईल. आणि तिचा नाश होण्यापासून वाचेल. त्यासाठी त्यांना द्वेषाने दूर लोटून नाही तर प्रीतीने ख्रिस्ताकडे आम्ही ओढून घेतले पाहिजे. म्हणजे ते *सैतानाने त्यांना धरून ठेविल्यानंतर ते त्याच्या पाशांतून सुटून देवाच्या इच्छेस वश होण्याकरिता शुद्धीवर येतील. ( वचन २६)*


*"विजयी जीवन हीच ख्रिस्तासंबंधाने उत्तम साक्ष आहे "*


      

देव अनुकुल आहे.. तर..?



         *✨देव अनुकुल आहे.. तर..?✨*


*ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील ? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तरवार ही विभक्त करतील काय ?..✍*

                       *( रोम ८:३५)*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


     ख्रिस्तामध्ये आम्ही सुरक्षित आहोत याचे सुंदर वर्णन पौलाने केले आहे. ह्या शास्रपाठातून पौलाला सांगायचे आहे की, आमच्या जीवनात कितीही संकटे, दुःखे, हालअपेष्टा आली तरी ती आम्हां विश्वासणाऱ्यांना ख्रिस्तापासून, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून विभक्त करू शकत नाही. याउलट ही संकटे आम्हाला ख्रिस्ताच्या आणि आमच्यासाठी असलेल्या त्याच्या योजनांच्या, उद्दिष्टांच्या जवळ आणण्यास कारणीभूत होतात. देवाने आपल्या योजनेनुसार प्रत्येक विश्वासणाऱ्याला, नवीन जन्म पावलेल्या व्यक्तीला बोलाविले आहे. देवाच्या लेकरांना वेगवेगळ्या प्रकारच्या अत्यंत कठीण परिस्थितीमधून जावे लागते. परंतु देव सदैव आमच्याबरोबर आहे. सर्व गोष्टींवर त्याचे नियंत्रण आहे. आपले विचार, बोलणे व आचरण हे ख्रिस्ताच्या विचाराप्रमाणे, बोलण्याप्रमाणे, त्याच्या आचरणाप्रमाणे घडून यावेत ही देवाची योजना आहे. आम्ही कधीही ख्रिस्ताच्या प्रीतीच्या कक्षेबाहेर जाऊ शकत नाही. ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे जे नीतिमान ठरवले गेले आहेत आणि जे त्याच्याशी एकनिष्ठ राहातात, विश्वासू राहतात त्यांच्याबद्दल पौल लिहितो, *"देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील ? देवच नीतिमान ठरवणारा आहे." ( वचन ३३)*  आम्ही जर ख्रिस्ताचे निवडलेले आहोत, ख्रिस्ताच्या जवळ आहोत तर...


   *१)देव आपणांला अनुकुल असल्यास आपणांला प्रतिकूल कोण ? ( वचन ३१)* जेव्हा देव आमच्या बाजूला आहे तर आमच्यावर विजय मिळवू शकेल असा कोणता शत्रू आहे ? देवाने स्वतः आमचे तारण योजिले, आणि तो स्वतःच आमचे कल्याण व्हावे म्हणून कार्य करीत आहे व आम्हाला गौरवात नेण्यास समर्थ आहे तर तो आमच्या बाजूला असल्यामुळे आमचे शत्रू आमच्यावर विजय प्राप्त करू शकत नाही. कारण तो आमचा उत्तम मेंढपाळ आहे. ( स्तोत्र २३ वाचा) देवाने आपला पुत्र आम्हांकरिता दिला आणि त्यातून त्याच वेळी या जीवनातून पार होण्यासाठी आणि अंतिम तारण प्राप्त होण्यासाठी जे जे आवश्यक ते ते आम्हाला उपलब्ध करून दिले. ह्यावरून देवाच्या आमच्यावरील प्रीतीची आम्हाला खात्री पटते. त्याची प्रीति सर्वश्रेष्ठ आहे. आणि ही प्रीति आम्हाला उत्तम ते देईलच देईल. ह्याची आम्हाला खात्री आहे. वचन सांगते, *ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपणां सर्वांकरिता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही ? ( वचन ३२)* देव जे काही करितो आणि देवाच्या सर्व योजना त्याच्या लेकरांच्या कल्याणासाठीच असतात. 


   *२) आपणाला दोषी ठरवू शकेल असा कोण आहे ?* देवाने स्वतः आपल्याला निर्दोष असे ठरविले आहे. परंतु सैतान आमच्यातील दोष दाखविण्याचा प्रयत्न करत असतो, त्याचे तेच काम आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकात आपण पाहातो, जेव्हा दियाबल, म्हणजेच सैतान व त्याच्या दूतांना खाली पृथ्वीवर टाकण्यात आले, तेव्हा स्वर्गात मोठी वाणी ऐकू आली, *आमच्या बंधूंना 'दोष देणारा', आमच्या देवासमोर 'रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा' खाली टाकण्यात आला आहे. ( प्रकटी १२:१०)* पण जगाचा न्यायाधीश देव आहे. त्याने ख्रिस्तामध्ये आपल्याला नीतिमान ठरविलेच आहे. ( रोम ५:१) सैतान आरोप करितो, तरी *न्याय करण्याचा अधिकार केवळ ख्रिस्ताला आहे. ( योहान ५:२२)* ख्रिस्ताने तर आम्हाला निर्दोष ठरविता यावे ह्यासाठी मरण पावला आणि देवाच्या उजवीकडे बसून आमच्यासाठी मध्यस्थी करीत आहे. ( इब्री ७:२५)


   *३) ख्रिस्तापासून वेगळे करील असे कोण आहे किंवा अशी एखादी गोष्ट आहे का ?* इतके बलशाली किंवा समर्थ काहीच नाही, कोणीच नाही. जे खरोखरच ख्रिस्ताशी एकनिष्ठ आहेत, त्यांच्यावर कितीही कठीण परिस्थिती आली, संकटे आली तरी त्या परिस्थितीला ते धैर्याने तोंड देतात, परमेश्वर त्यांना सामर्थ्य पुरवतो. पेत्र म्हणतो, *ह्याचकरिता तुम्हांस पाचारण करण्यात आले आहे, कारण ख्रिस्तानेहि तुम्हांकरिता दुःख भोगले आणि तेणेंकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हांकरिता कित्ता घालून दिला आहे. ( १ पेत्र २:२१)* ज्याने आम्हांवर प्रीति केली, त्याच्या योगे सर्व दुःख, संकटात आपण विजयी ठरतो. देवाच्या प्रीतीपासून आम्हाला विभक्त करणे कोणत्याही शक्तीला शक्य नाही. 


    प्रियांनो, आम्ही आमच्या अडचणीत, संकटात देवाकडे आपले लक्ष लावू या. आणि त्याच्या महान प्रीतीवर विश्वास ठेवू या त्याबद्दल देवाची स्तुती करू या. आपल्याला देवाच्या प्रीतीपासून वेगळे करू पाहणाऱ्या अनेक गोष्टी सैतान आपल्या मनात घालीन, आम्हाला निराश करण्यासारख्या गोष्टी आमच्या जीवनात घडतील, परंतु ह्या सर्व गोष्टी देवासमोर अतिदुर्बल आहेत. देवाच्या आमच्यावरील प्रीतीपासून त्या आम्हाला क्षणभरही दूर करू शकत नाहीत हे आम्ही कायम लक्षात ठेवावे. देवावरील विश्वासामध्ये आम्ही स्थिर आणि अढळ राहावे.