Tuesday, 10 November 2020

इतरांच्या उन्नतीसाठी

 


          *✨इतरांच्या उन्नतीसाठी✨*


*तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरूद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापूढे मान वाकविण्यास लावतो..✍*

               *( २ करिंथ १०:५ )*


                        *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


     आपण या जगामध्ये राहातो. म्हणजेच सर्वसाधारण मानवी अस्तित्वाच्या मर्यादांमध्ये जगातील जीवनात सहभागी असतो. पौल म्हणतो जगाच्या रीतीप्रमाणे किंवा देहस्वभावाप्रमाणे म्हणजेच केवळ मानवी स्वभावाप्रमाणे किंवा शंकास्पद साधनसामग्री घेऊन तो युद्ध करीत नाही तर देवाची शस्रसामुग्री घेऊन तो युद्ध करीत आहे. आणि तो म्हणतो की, *आमच्या युद्धाची शस्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. ( वचन ४)* देवाची शस्रसामुग्री म्हणजे देवाचे पवित्र वचन. आणि बायबल मध्ये पवित्र वचनाला हातोडा म्हटले आहे. हा वचनाचा हातोडा घेऊन ही तटबंदी जमीनदोस्त करण्यास पौल निघाला आहे. तटबंदी म्हणजे नगराच्या वेशीच्या तटाचे बुरूज, ज्यांच्याद्वारे नगराचे रक्षण केले जाते. किंवा तटबंदी म्हणजे लढाईत तटबंदी पाडण्यासाठी उभारण्यात आलेले मोर्चे. परंतु येथे तटबंदी म्हणजे तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरूद्ध उंच उभारलेले सर्व काही. ही तटबंदी देवाचे वचन म्हणजे सुवार्तेद्वारे पाडून टाकली जाणार आहे.


     सुवार्तेची घोषणा करून, लोकांच्या विरोधावर मात करून, प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापूढे मान वाकविण्यास लावणे हेच पौलाचे कार्य होते. तटबंदी जमीनदोस्त करून तिच्या आश्रयाला असणाऱ्या सर्वांना ख्रिस्ताकडे आणणे, खोटे तर्कवाद नामशेष करणे आणि लोकांचे विचार ख्रिस्ताच्या प्रभुत्वाखाली आणणे हाच पौलाचा मुख्य उद्देश आहे. थोडक्यात विश्वासणाऱ्यांनी ख्रिस्ताचे प्रभुत्व मानावे व त्याच्या आज्ञा पूर्णपणे पाळाव्या. कारण आज्ञाभंगामुळे देवाचा क्रोध प्रगट होतो. म्हणूनच पौल म्हणतो, *तुम्ही आज्ञापालनात पूर्ण व्हाल तेव्हा सर्व आज्ञाभंगाबद्दल शासन करावयास आम्ही सिद्ध आहों. ( वचन ६)*


     आज बहुतेक ख्रिस्ती कार्याला शिस्त नाही. या कार्याचा आरंभ तर प्रबळ आवेगातून होतो, आमच्या मनात येणारा विचार घेऊन आम्ही ताबडतोब कृती करतो परंतु स्वतःला शिस्त लावीत नाही आणि ख्रिस्ताच्या आज्ञा पाळीत नाही. देवाचे आज्ञापालन करण्यातच खरा निश्चय, उत्साह, आवेश आहे. कोणतीही व्यक्ती तारणासाठी येशू ख्रिस्ताला समर्पित आहे. त्याचप्रमाणे देव, जग आणि पाप व सैतान यांच्यासंबंधी येशू ख्रिस्ताच्या विचारदृष्टीला बांधील आहे. म्हणजेच प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखावी आणि *ह्या युगाबरोबर समरूप होऊ नये, तर मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्यावे. ( रोम १२:२)* काही गोष्टी देवाच्या आत्म्याकडून मिळणाऱ्या दिव्य शक्तीनेच नष्ट कराव्या लागतात. अशा वेळी आम्ही झगडू नये तर बायबल सांगते त्याप्रमाणे, *"स्थिर उभे राहा आणि देव तुमचे तारण करील ते पाहा." ( निर्गम १४:१३)* इतकेच करावे आणि देवापासून होणारे तारण पाहावे.


*खोटे तर्कवाद, युक्तिवाद नष्ट केलेच पाहिजेत. मग लोक सुवार्तेच्या सत्याला वश होतील आणि ख्रिस्ताच्या प्रभुत्वाखाली त्यांना खरी जीवनप्राप्ती होईल.*

  

       

No comments:

Post a Comment