Tuesday, 3 November 2020

देव पक्षपाती नाही



          *✨देव पक्षपाती नाही✨*


 *जे माझे आहे त्याचे मी आपल्या मर्जीप्रमाणे करावयास मुखत्यार नाही काय ? अथवा मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यांत सलते काय ?..✍*

                 *( मत्तय २०:१५ )*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


      देवाच्या राज्याचा भाग असणे आणि त्याच्या हेतूंमध्ये सहभागी होणे ही आपण स्वकष्टाने मिळवू शकतो अशी गोष्ट नाही, तर तो विशेष अधिकार आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याला आहे. आम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचे परमेश्वराकडूनच आम्हाला प्रतिफळ मिळते. देव प्रतिफळ देणार आहे. परंतु कोणाला किती द्यायचे हे देव स्वतः ठरविणार आहे. आणि तो कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. ह्या अध्यायामध्ये या दृष्टांतामधून आपणांस पाहावयास मिळते की जेथे आजच्यासारखी सामाजिक कल्याणाची किंवा कामगार संघटनांची तरतूद नव्हती तर तेथे बेकारी, उपासमारीची परिस्थिती होती अशा त्या ठिकाणी या जमीनदाराचे हे कृत्य मोठ्या उदारपणाचे आहे. त्याने अगदी अखेरच्या तासापर्यंत, संध्याकाळ होत आली असतानाही आणि काहीही आवश्यकता नसतानाही, जे बेकार होते, दिवसभर ज्यांना काहीही काम मिळाले नव्हते अशा लोकांना काम देऊन, जास्तीचे कामकरी त्याच्या मळ्यामध्ये कामासाठी नेमले. परंतु त्याने त्यांना मजूरी देताना मात्र सकाळपासून जे काम करत होते त्यांच्याइतकीच मजूरी दिली. त्यामुळे आपल्यावर अन्याय झाला असे जे सकाळपासून काम करत होते त्यांना वाटले आणि ते कुरकुर करू लागले. खरे पाहिले असता त्यांचे जरी योग्य होते तरीही त्यात पक्षपातीपणा बिलकूल नव्हता. कारण त्याने ठरविलेली मजूरी त्यांना दिली होती. कोणा एकालाही कमी मजूरी दिली नाही. उदारपणे सर्वांना समान दिले, पक्षपात केला नाही. *ह्याप्रमाणे शेवटले ते पहिले व पहिले ते शेवटले होतील. ( वचन १६)*


     आमचा प्रभू न्यायी न्यायाधीश आहे. तो कोणावरही अन्याय होऊ देत नाही. तो ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रतिफळ देतो. देव पक्षपाती नाही. स्वर्गाचे राज्य देखील असेच आहे. देवाची कृपा मिळण्यासाठी आमच्या ठायी असलेल्या योग्यायोग्यतेच्या कल्पनांच्या कुठल्याही मर्यादा नाहीत. कारण देव आम्हाला देतो त्या गोष्टी आमच्या पात्रतेपलीकडच्या असतात. परंतु आम्ही त्यामध्ये समाधान न मानता, स्वतःची तुलना दूसऱ्यांबरोबर करतो. उधळ्या पुत्राच्या दाखल्यातील वडील भावाप्रमाणे आम्ही वागतो. आमच्या दृष्टीने जे अपात्र आहेत त्यांच्या बाबतीत देवाची उदार दृष्टी मान्य करणे आम्हाला खूप कठीण वाटते. स्वतःची तुलना इतरांबरोबर करणे हे धोक्याचे असल्याचा इशारा वचनाद्वारे आम्हाला मिळतो. कारण असे वागल्याने आम्ही अहंकारी, गर्विष्ठ होऊन इतरांना तुच्छ समजू लागतो. असे लिहिले आहे की, *आपण नीतिमान आहोत असा कित्येक स्वतःविषयी भरंवसा धरून इतर सर्वांना तुच्छ मानत होते. ( लूक १८:९)* किंवा मग आम्ही मत्सर करू लागतो आणि त्यांच्याप्रमाणे होण्याचा प्रयत्न करू लागतो आणि त्यांच्या गोष्टींचा लोभ धरू लागतो. याकोब म्हणतो, *तुमच्यामध्ये लढाया व भांडणे कशातून उत्पन्न होतात ? तुमच्या अवयवांत ज्या वासना लढाई करतात त्यांतून की नाही ? ( याकोब ४:१)* होय प्रियांनो, आमच्या ठायी असलेल्या द्वेष, मत्सर, ईर्षा ह्या गोष्टींमुळेच भांडणे, कलह होतो. 


     ह्या दाखल्याद्वारे प्रभू आम्हाला तीन चुकीच्या गोष्टींविरूद्ध इशारा देत आहे - १) उच्च पद, दर्जा मिळाल्यामुळे स्वतःला श्रेष्ठ समजू नये. २) देवाची आम्हांवरील कृपा, जिला आपण पूर्णपणे अपात्र आहोत ती सर्वांना सांगितली पाहिजे. ३) इतरांना मिळणारे आध्यात्मिक आशीर्वाद पाहून त्यांचा द्वेष, मत्सर करू नये. देवाने आम्हाला खूप आशीर्वादित असे जीवन दिलेले आहे. आम्ही जर इतरांबरोबर आमची तुलना न करता आमच्या आशीर्वादांवरच लक्ष केंद्रित केले तर परमेश्वराच्या कृपेने तुलना करीत बसण्याच्या आमच्यातील ह्या वाईट वृत्तीवर निश्चितच मात करता येईल. देवापासून रोज आणि रोज मिळणाऱ्या आशीर्वादांबद्दल आम्ही रोज आणि रोज त्याचे आभार मानले पाहिजेत, त्याला धन्यवाद दिले पाहिजेत. देव प्रत्येकाला आशीर्वादित करीलच करील. आम्ही इतरांना तुच्छ न लेखता, इतरांशी तुलना न करता देवाने दिलेल्या कृपेबद्दल, आशीर्वादांबद्दल देवाचे आभार मानले पाहिजेत. आणि देव पक्षपाती नाही हे ओळखून घेऊन देवाच्या ठायी असलेला चांगुलपणा ओळखला पाहिजे.


      *!!..प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो..!


                            

No comments:

Post a Comment