Thursday, 5 November 2020

जीवनसंगर

 


*जीवनसंगर*


_‘‘तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी मी विनंती करत नाही.’’ योहान १७:१५_


विश्वासणाऱ्यांनी ख्रिस्ताच्या मागे चालण्याचा आरंभ केल्याबरोबर लगेचच त्यांना स्वर्गात नेले तर एका अर्थी ते फारच छान होईल. तेथे ते सुरक्षित राहतील. मग त्यांना मोह परीक्षांना तोंड द्यावे लागणार नाही. शत्रूंशी संघर्ष करावा लागणार नाही, कोणते भेदभाव, अडचणी उरणार नाहीत. पण या जगात ख्रिस्ताचे कार्य कोण करणार? पापी लोकांना तारणाची शुभवार्ता कोण सांगणार, लोकांना पवित्र जीवनातून ख्रिस्ताचे सौंदर्य कोण दाखवणार? देवाची साक्ष देऊन त्याच्या लढाया लढण्यासाठी येथे कोणीच असणार नाही.

ख्रिस्ती लोकांना येथेच ठेवण्याचे आणखी एक कारण आहे. दऱ्या खोऱ्यांच्या सखलभागात वाढणारी झाडे मोठी दिमाखदार दिसतात कारण तेथे नाही वादळ नाही वारा-चहूबाजूंनी कडेकोट निवारा-मग ती जोमाने का वाढणार नाही? पण खरी डौलदार, शोभिवंत झाडे डोंगर टेकड्यांच्या माथ्यावर असतात तेथे ती कडक ऊन आणि तुफानी वारा यांना तोंड देत उभी असतात. माणसांचेही असेच आहे. उमदी, उदार माणसे ऐषआरामात, लाडाकोडात नव्हे तर अडचणी, कठिण परिस्थितीतच वाढून थोर होतात. खुद्द येशूदेखील संकटांच्या, संघर्षाच्या शाळेतच शिकून तयार झाला होता. जीवनात काहीच संघर्ष नसणे, कोठेतरी सपाट मैदानावर निवांत निवाऱ्यात, वादळ वाऱ्यापासून, अडचणीपासून दूर राहून मोठे होणे हे अगदीच सोपे आहे. कोणतीच चिंता नसणे, ओझी वाहवी न लागणे या प्रकारे वाढत गेल्याने अखेरीस त्यातून कोणत्या प्रकारचे जीवन साकार होणार? धन्यतेची उच्च शिखरे गाठावी हेच आमचे ध्येय असेल तर आपण संकटांच्या खाचखळग्यातून लढा देत संतोषाने पुढे चालले पाहिजे.

युद्धामध्ये विजय संपादन करून फौजा परत येतात तेव्हा जयजयकार करून त्यांचे स्वागत होते. पण सर्वात उच्चस्वराने जयजयकार कोणाचा होतो? ज्यांनी युद्धामध्ये अगदी कमी भाग घेतला त्यांचा? ज्यांचे ध्वज अगदी स्वच्छ, एकही सुरकुती नसलेले आहेत त्यांचा? नाही, ज्या पलटणीतील बहुतेक सैनिक युद्धात कामास आले, ज्यांचे ध्वज शत्रूच्या हल्ल्याने फाटले आहेत अशांचाच उच्चस्वराने जयजयकार होतो. उद्धार पावलेल्यांचे स्वर्गामध्ये स्वागत करते वेळेसही असेच होईल. ज्यांनी जास्तीत जास्त लढायांत भाग घेतला आहे, जे आपल्याठायी *प्रभू येशूच्या खुणा* अधिक प्रमाणात मिरवतात त्यांनाच श्रेष्ठ बहुमान मिळतील. तेव्हा ख्रिस्ती लोकांनी या जगात राहावे आणि कर्तव्यपूर्तीसाठी संघर्ष करताना बलवान व्हावे हेच इष्ट आहे.


*आम्हाला या जगात ठेवले आहे, एका विशिष्ट ठिकाणी, परिस्थितीत ठेवले आहे यामागे देवाचा काहीएक हेतू आहेच. तो लक्षात घेऊन त्याने सांगितले, आज्ञा दिली त्याप्रमाणे आम्ही आचरण करणे अगत्याचे आहे. येथील आचरणाचे प्रतिफळ खात्रीने मिळणारच आहे; याबद्दल शंका नसावी!*

No comments:

Post a Comment