Tuesday, 3 November 2020

रक्ताद्वारे नीतिमत्व

                 *✨रक्ताद्वारे नीतिमत्व✨*


*त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित्त होण्यास देवाने त्याला पूढे ठेवले, ह्यासाठी की, पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे..✍*

                       *( रोम ३:२५)*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


     नियमशास्राच्या पालनावाचून, देव न्यायीपणाने मनुष्याला निर्दोष ठरवू शकतो किंवा दूसऱ्या शब्दांत सांगायचे म्हणजे देव पाप्यांचे तारण करतो. परंतु कसे ? तर *प्रभू येशू ख्रिस्ताने खंडणी भरून आणि आपल्या पवित्र रक्ताने प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे.* देवाने पापी मनुष्याला निर्दोष ठरविण्यासाठी एक योजना आखली आणि त्या योजनेनुसार देवाने आपला एकूलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या भूतलावर पाठवले. *शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली, आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला. तो पित्यापासून आलेल्या एकूलत्या एकाचा गौरव असावा असा अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होता. ( योहान १:१४)* सर्व मनुष्यांनी पाप केल्यामुळे ते निर्दोष किंवा निष्पाप ठरू शकत नाहीत.  ह्यासाठी ख्रिस्त येशूने मनुष्याला पापाच्या दोषापासून मुक्त करण्यासाठी स्वतःचे मौल्यवान रक्त सांडून, खंडणी म्हणून स्वतःचे प्राण अर्पण केले. *त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळविलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. ( इफिस १:७)* 


      येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारेच केवळ नीतिमान ठरता येते. ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे देवाकडून विनामुल्य निर्दोष ठरविले जातात. ख्रिस्ताचे नीतिमत्व आमच्याकडे मोजण्यात येते, यालाच नीतिमान ठरवले जाणे असे म्हणतात. मनुष्य केवळ सत्कर्मे केल्यामुळे न्यायी ठरत नाही तर ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने न्यायी ठरतो. देवाने मनुष्याला पाप घडताच शिक्षा दिली नाही तर त्याने पश्चाताप करावा ह्याची सहनशीलतेने वाट पाहिली. आता, पापी मनुष्य नीतिमान ठरू शकतो, जेव्हा तो ख्रिस्ताचा आपला मुक्तीदाता म्हणून स्वीकार करतो. ह्यालाच विश्वासाने नीतिमान ठरवले जाणे म्हटले आहे. देव आमच्याकडे पाहातो तेव्हा त्याला आमच्यामध्ये किंचितही नीतिमत्व दिसत नाही. परंतु आम्ही *"ख्रिस्तामध्ये असलेले"* असे देवाच्या नजरेस पडतो, तेव्हा देवाच्या दृष्टीने आमच्यामध्ये असलेल्या विश्वासाद्वारे आम्ही नीतिमान ठरवले जातो.


    जून्या कराराच्या काळात वर्षातून एकदा प्रमुख याजक लोकांचे पाप कबूल करून पापासाठी वधलेल्या बकऱ्याचे रक्त घेऊन परमपवित्र स्थानात जात असे व तेथे असलेल्या दयासनावर ते शिंपडत असे. आणि देव इस्राएल लोकांच्या पापांची क्षमा करी. *इस्राएल लोकांसाठी त्यांच्या सर्व पापांबद्दल वर्षातून एकदा प्रायश्चित्त करण्यात यावे म्हणून हा तुम्हाला निरंतरचा विधी होय. ( लेवीय १६:३४)* परंतु आता येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणाच्या द्वारे त्याचे मौल्यवान रक्त सांडल्यामुळे आता दूसऱ्या बलीची गरज उरली नाही. तो एकदाच सर्वांच्या पापांसाठी मेला आणि सर्वांना पापदोषापासून तोच मुक्त करू शकतो. *ख्रिस्तावरील विश्वासाने पापी मनुष्य नीतिमान ठरतो.*


  *देव "विश्वासाच्या द्वारे", "कृपेने", व "ख्रिस्ताच्या रक्ताने"  पापी मनुष्याला नीतिमान ठरवितो.*


      

No comments:

Post a Comment