Tuesday, 3 November 2020

ख्रिस्ताची वधू

 *इफिस ५:२५-२७*


          *ख्रिस्ताची वधू*


     *अशासाठी की, त्याने तिला वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ व पवित्र करावे*...

            *इफिस ५: २६*..


       वधू म्हटलं की विवाहसोहळा डोळ्यासमोर येतो . आणि विवाहसोहळा म्हटलं की वधूची तयारी आलीच. मग कोणताही देश असो की कोणताही काळ असो, वधूच्या तयार होण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अगदी बायबलच्या काळापासून तर आताच्या आधुनिक काळातही वधूच तयार होण याला महत्त्व आहे. 

     जुन्या करारात एस्तेरच्या विवाहसंबंधाने वाचायला मिळते. सहा महिने गंधरसाचे तेल आणि सहा महिने सुगंधी द्रव्ये आणि इतर शुद्धतेच्या वस्तू तिला सुंदर दिसण्यासाठी आणि राजाच्या पसंतीस उतरावी म्हणून लावण्यात आल्या होत्या. राजाकडे जाण्यापूर्वी आणखी सौंदर्य प्रसाधने त्या मुली मागू शकत होत्या.. पण एस्तेरने काही मागितले नाही कारण ती जाणून होती की, *परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते*. *नीति ३१:३०*..

     नवीन करारात अशी एक वधू आपल्या भेटीला येते. तिलाही शुद्ध होण्याची, जलस्नानाची गरज होती  पसंतीस उतरण्यासाठी..  *ही वधू म्हणजे ख्रिस्ताची वधू म्हणजे मंडळी*.. जर आम्हाला ख्रिस्ताची वधू व्हायचे असेल तर वचनरुपी जलस्नानाने शुद्ध व्हायला पाहिजे.  *हेच नव्या जन्माचे स्नान आहे*. निकदेमाला त्या रात्री प्रभू हेच सांगत होता की, *आत्म्याने आणि पाण्याने जन्मल्या वाचून स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणार नाही*.. 

    ख्रिस्ताची वधू जर आम्हाला व्हायचे असेल तर, वचनरुपी जलस्नानाने आणि आत्म्याने शुद्ध व्हायला हवे. *त्यामुळे आमच्यातील द्वेषाच्या सुरकुत्या, लोभ,राग,कुरकुर,अहंकार ह्यांचे डाग नाहीसे होतात*.अशी पापविरहित वधू प्रभूला पसंत पडणारी आहे. 

  *विश्वास, प्रार्थना,सेवा, समर्पित जीवन ही परमेस्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची आभूषणे आहेत*.. कारण विश्वासाने दुसऱ्या मृत्यूचे भय उरत नाही. प्रार्थनेने आमची परिस्थिती बदलून जाते, पापी अवस्थेतुन पावित्र्याकडे वाटचाल सुरू होते. सेवेमुळे अनपेक्षित आशीर्वाद मिळतात .. आणि समर्पित जीवनामुळे देवाच्या योजना आमच्या जीवनात सिद्धीस जातात.. 

    *जर प्रभूची वधू व्हायचे तर आमच्या सौंदर्य प्रसाधनात १) प्रभूची प्रीति, २) देवाच्या वचनाची ओढ, ३) ख्रिस्ताच्या आज्ञापालनाचे सौंदर्य,४) ख्रिस्तावरील विश्वासाचे सामर्थ्य, ५) पश्चाताप,  ही सुगंधी द्रव्ये हवीत*

    *प्रार्थना करू आपण की प्रभू ख्रिस्ता आम्हाला तुझी मंडळी या नात्याने तुझी  वधू व्हायचे आहे म्हणून आम्हाला शुद्ध आणि पवित्र कर*..

       *आमेन*..


    

No comments:

Post a Comment