*✨प्रकाश आणि अंधार✨*
*तुझ्या शरीराचा दिवा तुझा डोळा होय; तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे सर्व शरीर प्रकाशमय असते; सदोष असला तर तुझे शरीरही अंधकारमय असते..✍🏼*
*( लूक ११:३४ )*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
या संपूर्ण परिच्छेदातून पौलाने आम्हाला आध्यात्मिक आंधळेपण आणि अंतःकरणाचे कठीणपण यांच्या संबंधात कडक इशारा दिला आहे. मनुष्याचा डोळा हे एक साधन आहे. डोळा हे शारीरिक व आध्यात्मिकदृष्ट्या प्रकाश आणि प्रतिमा आत येण्यासाठीचे शरीराचे प्रवेशद्वार आहे. डोळ्याद्वारे प्रकाश व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये पोहोचतो. निरोगी किंवा निर्दोष डोळा प्रकाश आत येऊ देतो, पण अधू किंवा सदोष डोळा त्या व्यक्तीला अंधारातच ठेवतो. जर डोळा निर्दोष असेल तर मनुष्य पूर्ण प्रकाश मिळवू शकतो आणि त्याद्वारे आत येणाऱ्या प्रतिमांना ओळखू शकतो परंतु डोळे अंध असतील तर तो अंधार त्याच्यासमोर असलेल्या गोष्टी बदलतो किंवा विकृत करून टाकतो. म्हणून पौल आम्हाला इशारा देत आहे, आपण प्रकाश म्हणून स्वीकारतो तो खरोखर प्रकाशच आहे, अंधार नाही याची खात्री आम्ही करून घेणे गरजेचे आहे. पौल म्हणतो, *म्हणून तुझ्यामधील प्रकाश अंधार तर नाही ना, हे पाहा. ( वचन ३५)*
आम्ही आमच्या डोळ्यांद्वारे काय पाहायचे आणि आमच्या जीवनात त्यातील काय घ्यायचे ह्याची काळजी घ्यायची आहे. कारण आम्ही ज्या गोष्टी पाहातो त्याच गोष्टी आमचे शारीरिक आणि आध्यात्मिक डोळे पाहात असतात. जर आम्ही पाहात असलेल्या गोष्टी किंवा प्रतिमा अधार्मिक किंवा दुष्ट असतील तर आध्यात्मिक दृष्ट्या त्या आमची मने भ्रष्ट करतील त्यामुळे देवाचे भय व त्याच्या आमच्या जीवनाबाबतीत असलेल्या योजना पूर्ण करण्यापासून आम्हाला परावृत्त करतील. याउलट आमचे आध्यात्मिक डोळे म्हणजे आमचे दृष्टीकोन, हेतू आणि इच्छा या देवाकडे आणि त्याच्या योजनांकडे लावलेले असतील तर आमच्यामध्ये आशीर्वाद, चारित्र्यगुण, आध्यात्मिक तारणाचा बाह्य पुरावा आणि देवावरील निष्ठा उत्पन्न करण्यासाठी त्याच्या वचनांचा प्रकाश आमच्या हृदयात प्रवेश करतो. वचन सांगते, *"तुझे सर्व शरीर प्रकाशमय असेल आणि त्याचा कोणताही भाग अंधकारमय नसेल, तर दिवा आपल्या उज्ज्वल ज्योतीने तुला प्रकाशमय करतो त्याप्रमाणे ते पूर्णपणे प्रकाशमय होईल." ( वचन ३६)* परंतु आमच्या इच्छा जर देवाच्या गोष्टींवर केंद्रित नसतील, तर देवाचे प्रकटीकरण व सत्य आमच्यापासून दूर राहील. आमचे जीवन अंधकारमय होईल. म्हणून आम्ही प्रकाश म्हटलेल्या ख्रिस्ताला आमच्या अंतःकरणात घेतले पाहिजे.
प्रियांनो, आम्ही वारंवार ही खात्री करून घेतली पाहिजे की, आमचे आध्यात्मिक डोळे उघडे आहेत आणि ते पापांकडे लक्ष लावीत नाहीत तर देवाच्या पवित्र वचनांकडे लक्ष केंद्रित करीत आहेत. देवाचे वचन आमचे जीवन आतून बाहेरून शुद्ध व पवित्र करते, नवीन करते, आमचे जीवन बदलण्यास ते समर्थ आहे. आम्ही आत्मपरिक्षण करावे की, आम्ही देवाच्या वचनाला योग्य प्रतिसाद देतो का ? किंवा देवाच्या वचनातील संदेशांचा स्वीकार करूनही, आम्हाला पापाच्या दास्यात ठेवणारा आध्यात्मिक कोरडेपणा आणि मृतपणा अद्यापही आमच्या जीवनात आहे का ? असे असेल तर आम्ही आमचे अंतःकरण उघडावे. देवाच्या वचनाचा प्रकाश आणि त्याचे आमच्या जीवनात असलेले हेतू, योजना हे पूर्ण होऊ द्यावेत. आम्ही आमच्या स्वतःच्या मार्गाने न चालता प्रकाशाच्या म्हणजेच ख्रिस्ताच्या मार्गाने चालावे. आमचे आध्यात्मिक डोळे सदोदित उघडे ठेवावेत. आमची देवावर असलेली प्रीति, त्याच्या वचनाची भूक आणि त्याचे हेतू साध्य करण्याची इच्छा परावर्तित होऊ शकेल अशाप्रकारे आम्ही देवाच्या वचनाच्या शिक्षणाला प्रतिसाद दिला पाहिजे. कारण स्तोत्रकर्ता म्हणतो त्याप्रमाणे, *"तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे." ( स्तोत्र ११९:१०५)*
*!!..प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो..!!*
No comments:
Post a Comment