Sunday, 1 November 2020

ख्रिस्तच पुनरुत्थान व जीवन



        *✨ख्रिस्तच पुनरुत्थान व जीवन✨*


*हे निर्बुद्ध मनुष्या, जे तू स्वतः पेरतोस ते मेले नाही तर ते जिवंत केले जात नाही, आणि तू पेरतोस ते पूढे आकारीत होणारे अंग पेरीत नाहीस, तर नुसता दाणा, तो गव्हाचा किंवा दूसऱ्या कशाचा असेल..✍*

    *(१ करिंथ १५:३६,३७ )*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


     प्रेषित पौल करिंथ येथील लोकांस पुनरुत्थानाविषयी सांगत आहे. तो म्हणत आहे की, ख्रिस्ताद्वारेच केवळ पुनरुत्थान आहे. कारण मेलेल्यांतून उठविला गेलेला असा केवळ तोच एकच एक आहे. आणि स्वतः प्रभू येशू ख्रिस्त देखील म्हणत आहे की, *पुनरुत्थान व जीवन मीच आहे.* पौल येशूबद्दल सांगत आहे की, *कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हांस सांगून टाकले, त्यापैकी मुख्य हे की, शास्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्याआमच्या पापांबद्दल मरण पावला, तो पूरला गेला, शास्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठविण्यांत आले. ( १ करिंथ १५:३,४)* आणखी पौल त्यांना हे सांगत आहे की, ते जे पेरतील, ते आधी मेले पाहिजे, तरच ते जिवंत केले जाईल किंवा उगवेल. जसे की आपण पाहातो, गव्हाचा किंवा इतर कुठलाही दाणा, जेव्हा मातीत पूरला जाईल, म्हणजेच तो मरण पावला जाईल, तेव्हाच तो अंकूरतो, उगवतो. आणि विपूल असे फळ देतो. आणि परमेश्वर त्याला आकार किंवा त्याचे अंग देतो. असे लिहिले आहे, *देव त्याला आपल्या संकल्पाप्रमाणे अंग देतो. तो बीजांतल्या प्रत्येकाला त्याचे अंग देतो. ( १ ले करिंथ १५:३८)*


    ख्रिस्तानेही शिष्यांना हेच सांगितले होते. जेव्हा त्याचे गौरव होण्याची वेळ जवळ आली होती तेव्हा त्याने शिष्यांना म्हटले होते की, *मी तुम्हाला खचित खचित सांगतो की, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहातो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. ( योहान १२:२४)* त्यामुळे त्याचे मरणे अगत्याचे होते कारण तो मेला आणि पुन्हा उठला, आणि स्वर्गात वर घेतला गेला. जर तो मेला नसता तर मेलेल्यांतून उठविला गेला नसता. आणि त्याचे गौरव झाले नसते. म्हणूनच त्याचे मरणे हे गरजेचे होते. परंतु आमचा प्रभू आमची खूप काळजी घेतो म्हणून त्याने तो जरी ह्या जगातून गेला तरी कैवारी म्हणून पवित्र आत्म्याला त्याने तुमच्या आमच्यासाठी पाठविले. आणि आज पवित्र आत्माच, ख्रिस्ताद्वारे आपल्याला चालवीत आहे, मार्गदर्शन करीत आहे. 


       *पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला. शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला. तथापि जे आध्यात्मिक ते प्रथम नाही, प्राणमय ते प्रथम, मग जे आध्यात्मिक ते. ( १ करिंथ १५: ४५,४६)* आणि पहिला मनुष्य म्हणजेच आदाम जसा परमेश्वराने मातीतून निर्माण केला. तसाच शेवटला आदाम  म्हणजेच येशू ख्रिस्त स्वर्गातून आहे. आणि पहिला मनुष्य हा प्राणमय होता. जगिक गोष्टींच्या मोहात पडून त्याच्याद्वारे मरण ह्या जगात आले. परंतु दूसरा मनुष्य प्रभू येशू ख्रिस्त हा आध्यात्मिक आहे. त्याच्याद्वारे मनुष्याला सार्वकालिक जीवन ही आशा प्राप्त झाली आहे. त्याचप्रमाणे त्याच्याद्वारे आपल्याला पुनरुत्थानाची संधी किंवा आशा आहे, कारण मरणाची नांगी त्याने त्या वधस्तंभावर मोडली आहे, मरणावर विजय मिळवून तो जिवंत केला गेला आहे. आणि आजही तो जिवंत आहे. म्हणून प्रियांनो, ख्रिस्ताद्वारेच पुनरुत्थान आहे हे ओळखून आपण त्याच्यावर विश्वास ठेवू या, आणि त्याच्यावर विश्वास ठेवून, त्याच्या मार्गाने चालून, जसे तो मरणातून परत उठला तसेच आपणही पुनरूत्थानाद्वारे पुन्हा त्याच्याबरोबर जिवंत केले जाऊ, ही सार्वकालिक जीवनाची खात्री प्राप्त करून घेऊ या.


    *जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपणाला जय देतो त्याची स्तुती असो.*


       

           

No comments:

Post a Comment