Monday, 16 November 2020

वचनाची तलवार घ्या



         *✨ वचनाची तलवार घ्या✨*


*तारणाचे शिरस्ञाण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन, ही घ्या..✍*

                *( इफिस ६:१७ )*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


       आम्ही या भूतलावर जीवन व्यतित करीत असताना अनेक संकटांतून, क्लेशातून, दुःखातून, मोहपाशातून आम्हाला जावे लागते. आणि त्या प्रत्येक कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी किंवा विजय मिळविण्यासाठी आम्हाला देवाचे वचन म्हणजे वचनाची तलवार हेच एक उपयुक्त असे साधन आहे. आपण नहेम्याच्या बाबतीत पाहातो की, त्याच्या देखरेखीखाली जेव्हा इस्राएली लोक यरूशलेमेचा कोट पुन्हा बांधीत होते, तेव्हा काम अर्ध्यावर आल्यानंतर शत्रू यरूशलेमेवर हल्ला करणार आहे असे त्यांनी ऐकले. त्यामुळे आधीच थकलेल्या लोकांचे मनोबल संपले, त्यांचे धैर्य खचले. तेव्हा नहेम्याने परमेश्वराची प्रार्थना केली आणि पहारेकरी नेमले. याशिवाय काम करणाऱ्यांनाही हत्यारे दिली. *कोट बांधणारे व भारवाहक एका हाताने काम करीत व दूसऱ्या हातात शस्रे धारण करीत. ( नहेम्या ४:१७)* नहेम्याने परमेश्वराची प्रार्थना कधीच विसरला नाही. प्रत्येक गोष्टींमध्ये त्याने प्रार्थनापूर्वक परमेश्वराचे साहाय्य मागितले. परिणामी त्याला यरूशलेमेचा कोट बांधण्यासाठी देवापासून साहाय्य व सामर्थ्य प्राप्त झाले.


     आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचीही सैतानाने अरण्यात परीक्षा पाहिली. परंतु सैतानाच्या प्रत्येक मोहयुक्त बोलण्याला आमच्या प्रभूने वचनाद्वारेच अडविले. आणि वचनाद्वारे योग्य ते उत्तर दिले. प्रभूला चाळीस दिवस आत्म्याने रानात नेले आणि त्या दिवसांमध्ये येशूने काहीही खाल्ले नाही आणि जेव्हा त्याला भूक लागली तेव्हा सैतान म्हणाला, *तू देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्यास भाकर हो म्हणून सांग. ( लूक ४:३)* परंतु आपण वाचतो की प्रभूने त्याला देवाच्या वचनाद्वारे उत्तर दिले की, *'मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही' असे शास्रा लिहिले आहे. ( लूक ४:४)* नंतर सैतानाने त्याला जगातील सर्व राज्ये दाखवून त्यावरचा सर्व अधिकार व वैभव देण्याचे आमिष दाखविले. तो म्हणतो, *म्हणून तू मला नमन करशील तर हे सर्व तुझे होईल. ( लूक ४:७)* परंतु जगाच्या मोहपाशात न अडकता ह्या बोलण्याला देखील प्रभूने वचनाद्वारेच उत्तर दिले की, *' परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर व त्याचीच सेवा कर. ( लूक ४:८)* नंतर सैतानाने त्याला यरूशलेमेत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे करून म्हटले, *तू देवाचा पुत्र आहेस तर येथून खाली उडी टाक, कारण शास्रात लिहिले आहे की, 'तुझे रक्षण करण्यास तो आपल्या दूतांस तुझ्याविषयी आज्ञा देईल' आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातांवर झेलून धरतील. ( लूक ४:९,१०,११)* परंतु प्रभू येशूने त्याला उत्तर दिले की, *'परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको.' ( लूक ४:१२)* अशाप्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानाच्या सर्व मोहांवर परमेश्वराच्या वचनाद्वारेच विजय मिळविला. म्हणून आम्हीही वचनाची तलवार घेतली पाहिजे. वचनाद्वारेच सैतानावर विजय मिळविला पाहिजे.


    देवाच्या राज्याची बांधणी करणाऱ्या आम्हीही आमच्या आध्यात्मिक शत्रूच्या, सैतानाच्या हल्ल्यांपासून सावध राहावे. आणि देवाचे वचन म्हणजे आत्म्याची तलवार ही संरक्षणार्थ घ्यावी. शास्रवचने तोंडपाठ करावी, आणि त्यावर मनन चिंतन केल्याने आणि वचनाप्रमाणे आचरण केल्याने आम्हाला *'सैतानाच्या डावपेचापूढे टिकाव धरता येईल.' ( इफिस ६:११)* आणि  *येशूसाठी आपण करू ते सर्वकाळ टिकेल. ( १ करिंथ ३:११-१५)* आपण देवाविरोधात खूप मोठे पाप केले आहे असे कोणाला वाटत असेल तर त्याने लक्षात घ्यावे की येशूच्या रक्ताच्या सामर्थ्याने त्याला क्षमा मिळाली आहे. प्रभू येशू म्हणत आहे, *"हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे." ( मत्तय २६:२८)* प्रभू येशूच्या पवित्र, अनमोल रक्ताद्वारेच पापक्षमा मिळते. ज्या कोणाला देवाची सेवा करावी असे वाटते परंतु अपयश येण्याची भिती वाटते अशांनी येशूमध्ये राहिलो तर निश्चितच फळ देऊ शकू हे त्याचे शब्द विसरू नये. तो म्हणतो, *"मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहां, जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळे देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करिता येत नाही." ( योहान १५:५)* म्हणूनच प्रियांनो, आम्ही देवाच्या समक्षतेमध्ये राहून वचनाप्रमाणे आचरण केले पाहिजे म्हणजे आम्ही फळ देणारे असे होऊ. कारण देवाचे वचन सर्व काही करण्यास समर्थ आहे. आम्ही हे लक्षात घेऊन वचनाची तलवार ही नेहमी आपल्या जवळ बाळगली पाहिजे. आणि पवित्र वचनाद्वारेच येणाऱ्या प्रत्येक कठीण परिस्थितीला, संकटांना तोंड दिले पाहिजे. 


         *

No comments:

Post a Comment