*✨त्याच्यावर सर्व भार टाका ✨*
*मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जूं आपणांवर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे 'तुमच्या जिवांना विसावा मिळेल.'..✍*
*( मत्तय ११:२९ )*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा खरोखरच मनाचा सौम्य, लीन, नम्र होता. तो देवाचा एकुलता एक पुत्र होता. परंतु आमच्या पापांसाठी तो स्वर्ग सोडून ह्या पृथ्वीवर आला. लीन, नम्र झाला. आणि वधस्तंभावरचे मरण त्याने सोसले. स्वर्गीय पित्याने सर्व काही ख्रिस्ताच्या स्वाधीन केले आहे. पिता आणि पुत्र एकमेकांना पूर्णपणे ओळखतात व ते एकमेकांना प्रगट करितात. यामुळेच जे ख्रिस्ताला ओळखतात तेच केवळ देवपित्याला ओळखू शकतात. प्रभू म्हणत आहे की, *माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे आणि पित्यावाचून पुत्राला कोणी ओळखत नाही, आणि पुत्रावाचून व ज्या कोणास त्याला प्रगट करण्याची पुत्राची इच्छा असेल, त्याच्यावाचून पुत्राला कोणी ओळखत नाही. ( मत्तय ११:२७)* यामुळेच येशू ख्रिस्त जे श्रमाने व कष्टाने थकून गेलेले आहेत, तसेच, जे भाराखाली दबलेले आहेत त्यांना स्वतःकडे येण्याचे आमंत्रण देत आहे. हे भार कशाचे असतील ? तर हे भार आमच्या पापांचे असतात, आमच्या जगिक जीवनातील काळजी, चिंतांचे असतात, तसेच अनेक प्रकारच्या कठीण परिस्थितीचेही असतात. आम्ही ख्रिस्ताकडे येताच तो आमचा भार दूर करतो आणि आपल्याला विसावा मिळतो. त्याचे जूं घेणे म्हणजे त्याचे खरे शिष्य होणे व त्याच्या हातात विश्वासाने सर्व सोपवून देणे होय.
आम्ही जेव्हा याप्रकारे आम्हाला स्वतःला प्रभूच्या हाती सोपवून देतो तेव्हा तो आमच्या जीवनाद्वारे कार्य करतो आणि आम्हाला शक्ती आणि सामर्थ्य पुरवितो. *तो भागलेल्यांस जोर देतो. निर्बलांस विपूल बल देतो. ( यशया ४०:२९)* देवाच्या सामर्थ्यात जगण्याचा एकच उपाय आहे, तो म्हणजे येशूचे जूं खांद्यावर घेऊन त्याच्या मार्गाने चालणे आणि त्याच्यापासून शिकणे होय. त्याचे जूं हलके आहे. म्हणजेच त्याच्या आज्ञा पाळावयास सोप्या आहेत. जर आम्ही त्याच्या आज्ञांचे पालन केले तर तो आमची सर्व पापे, अपराध, जे एखाद्या खूप मोठ्या ओझ्याप्रमाणे आम्ही खांद्यावर घेऊन चालत आहोत, ती सर्व तो आमच्या जीवनातून काढून दूर फेकून देतो. स्तोत्रकर्ता म्हणतो, *पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत. ( स्तोत्र १०३:१२)* आमचे अपराध आमच्यापासून दूर करून तो आम्हाला पापमुक्त, दोषमुक्त करतो. आणि ख्रिस्तामध्ये नवीन जीवन, जे पूर्णपणे पापरहित, दोषरहित असे आहे ते जगण्याची संधी मिळवून देतो. म्हणून आम्ही आमचे सर्व जीवन, आमच्या जीवनात असलेले सर्व प्रकारचे भार, ओझे, सर्व काळजी, चिंता त्याच्यावर सोपवून दिल्या पाहिजेत. तो आमची काळजी घेणारा आमचा देव आहे. आमचे ओझे स्वतःवर घेऊन आम्हाला विसावा देणारा आमचा देव आहे.
*देवाच्या सामर्थ्यात दुर्बल होणे म्हणजेच ख्रिस्ती माणसाने अपराध करण्यासारखे आहे.*
*!!..प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो..!!*
*
No comments:
Post a Comment