Friday, 6 November 2020

खाली राहिल्याने, वर पोहोचणे



        खाली राहिल्याने, वर पोहोचणे*

*याकोब.१ः१-८*


जितकी अधिक विश्वासाची परीक्षा होते तितके परीक्षेतून जाणे सोपे जाते. कारण त्या परीक्षा धीर उत्पन्न करतात. आणि परीक्षांमधून गेल्याने विश्वासणारा त्याच्या विश्वासात अधिक खंबीर बनतो. 


टिकाव धरणे म्हणजे कष्ट व ताणतणाव सहन करण्याची क्षमता. धीर म्हणजे स्वनियंत्रण असल्याचा पुरावा दाखवून विनातक्रार वेदना सहन करण्याची क्षमता. एका अर्थाने या दोन्हीही संकल्पना याकोबाच्या विधानात समाविष्ट आहेत, ‘‘विश्वासाच्या परीक्षेने धीर उत्पन्न होतो’’ (याकोब.१ः३).


ज्या मूळ ग्रीक शब्दाचे भाषांतर ‘धीर’ असे केले आहे तो दोन शब्दांचा बनला असून त्याचा शब्दशः अर्थ ‘०च्या खाली राहणे’ असा होतो. जेव्हा व्यक्ती संकटाच्या खाली राहते, तेव्हा ती त्या संकटात टिकून राहते आणि विश्वासणारा ओझ्याखाली असल्यामुळे संकट हे स्वतःच धीर उत्पन्न करते. स्वनियंत्रण, ज्याचा धीराशी घनिष्ठ संबंध असतो, ते गलती.५ः२२-२३ मध्ये उल्लेखिलेल्या पवित्र आत्म्याच्या फळाचा एक भाग आहे. जर आपण अधिक धीर व स्वनियंत्रण आत्मसात करण्याची इच्छा बाळगतो, तर याचा अर्थ असा होतो की, आपणांला अधिकाधिक संकटांत टिकून राहावे लागणार आहे. 


संकटे कितीही कठीण असली, तरी ज्या ख्रिस्ती व्यक्तीचा ख्रिस्तावर पूर्णपणे भरवसा आहे तो त्या संकटात आनंदी असू शकतो. आणि जो धीर आपण वाढीस लावतो तो प्रभूने आपणांस दिलेल्या त्याच्या अभिवचनांची पूर्तता करीपर्यत वाट पाहण्यास समर्थ करतो. इब्री.१०ः३६ हे वचन म्हणते, ‘‘तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचनानुसार फलप्राप्ती करून घ्यावी, म्हणून तुम्हांला सहनशक्तीचे अगत्य आहे.’’ गलती.६ः९ म्हणते, ‘‘चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल.’’ 


_आशेने हर्षित व्हा; संकटात धीर धरा; प्रार्थनेत तत्पर राहा (रोम.१२ः१२)._



No comments:

Post a Comment