*✨परमेश्वराचे स्तुतीगान✨*
*' माझा जीव प्रभूला थोर मानितो ' कारण जो समर्थ आहे त्याने माझ्याकरिता महत्कृत्ये केली आहेत..✍*
*( लूक १:४६,४९ )*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
*"हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर; हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर..."* आपल्यासाठी महत्कृत्ये करणारा परमेश्वर खरोखरच स्तुतीस पात्र देव आहे. जेव्हा जेव्हा आमच्यासाठी आमचा प्रभू महत्कृत्ये करितो, तेव्हा तेव्हा आम्ही धन्य होऊन आमच्या मुखातून त्याचे स्तुती, स्तवन बाहेर पडते. आम्ही त्याने आमच्यासाठी केलेल्या उपकारांबद्दल ओठांचे फळ म्हणजे स्तुतीचा यज्ञ प्रभूला अर्पण केला पाहिजे. सर्वात महत्वाचे म्हणजे परमेश्वराने आमच्यासाठी आपला एकूलता एक पुत्र दिला. जेव्हा गब्रीएल देवदूताने कुमारी मरियेकडे येऊन येशूच्या जन्माची घोषणा केली, जगाच्या तारणाऱ्या प्रभूची माता होण्यासाठी तिची निवड करण्यात आली, तेव्हा तिने देखील प्रभूची स्तुती केली. ती म्हणत आहे, *देव जो माझा तारणारा त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे, कारण त्याने आपल्या दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे, पाहा आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील. ( लूक १:४७,४८)* अशाप्रकारे तिने देवाची स्तुती केली.
आपण पाहातो की, मोशेने परमेश्वराच्या साहाय्याने मिसरातून इस्राएलाची सूटका केली. तेव्हा परमेश्वराने त्यांच्यासाठी अनेक महत्कृत्ये केली. तांबड्या समुद्रातून त्यांच्यासाठी कोरडी भूमी केली, खडक फोडून त्यांची तहान भागवली, स्वर्गीय मान्ना पुरवून त्यांची भूक भागवली, अशी अनेक महत्कृत्ये केली. तेव्हा मोशेने इस्राएल लोकांना म्हटले की, *तुम्ही परमेश्वराने केलेली ही सारी महत्कृत्ये डोळ्यांनी पाहिली आहेत. (अनुवाद ११:७)* आपण पाहातो की दाविदाच्या जीवनात परमेश्वराने केलेल्या प्रत्येक महत्कृत्यांबद्दल तो वारंवार प्रभूची स्तुती करतो, प्रभूला धन्यवाद देतो. स्तोत्रसंहिता पुस्तकातील निम्मी स्तोत्रे ही दाविदाने लिहिली आहेत. आणि दाविद त्या स्तोत्रांद्वारे देवाची स्तुती आणि स्तवन निरंतर करत आहे. बायबल आम्हाला देखील दाविदाप्रमाणे निरंतर स्तुती करण्यास सांगत आहे. देवाने आपल्याकरिता केलेल्या सर्व महत्कृत्यांबद्दल आपण जेव्हा त्याचे आभार मानू इच्छितो तेव्हा आपोआपच स्तोत्रसंहितेमधील सुंदर वचने आमच्या मुखातून बाहेर पडतात. आणि प्रतिदिवशी आम्ही देवाची स्तुती करतो, *परमेश्वराचे उपकारस्मरण करणे, हे परात्परा, तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे चांगले आहे. प्रभातसमयी तुझे वात्सल्य, प्रतिरात्री तुझी सत्यता वाखाणणे , गंभीर स्वराने गाणे चांगले आहे. ( स्तोत्र ९२:१ ते ३)*
देवाने आपल्याकरिता आणि गतकाळामध्ये आपल्या लोकांकरिता केलेले चमत्कार आठवून आपली अंतःकरणे देवाची थोरवी गाण्यास प्रेरित होतात. देवापासून प्राप्त झालेले आपले हे जीवन हेच परमेश्वराची स्तुती करण्याचे मोठे कारण आहे. दाविद म्हणतो, *भयप्रद व अद्भूत रितीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करितो, तुझी कृत्ये अद्भूत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. ( स्तोत्र १३९:१४)* खरोखरच केवळ आमचे जीवन म्हणजे केवळ आमचे शरीर, जीव, आत्मा हेच नाही तर, दृष्टी, श्रवणशक्ती आणि विचारशक्ती ह्या अनमोल देणग्या आमच्या जिवंत देवापासूनच आम्हाला देण्यात आल्या आहेत.
आपला निर्माणकर्ता हा *"प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान "* देणारा आमचा प्रभू आहे म्हणून आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या मार्गाने चालले पाहिजे. त्याच्यावर प्रेम केले पाहिजे, त्याची स्तुती आणि स्तवन केले पाहिजे. आपले त्याच्यावर खरोखरच प्रेम असेल तर आपण जे काही करू ते सर्वकाही त्याच्या गौरवासाठी केले पाहिजे. पौल म्हणतो, *तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. ( १ करिंथ १०:३१)* कारण परमेश्वराने आमच्यासाठी खूप अद्भूत कृत्ये केली आहेत, आम्हाला त्यांची मोजणी करता येणार नाहीत इतकी. दाविद म्हणतो, *हे परमेश्वरा, तू आम्हांसाठी केलेली अद्भूत कृत्ये व आमच्याविषयीचे तुझे विचार पुष्कळ आहेत, तुझ्यासमोर त्यांची क्रमवार मांडणी करिता येणार नाही, मी ते सांगू लागलो तर ते माझ्या गणनेपलीकडे आहे. ( स्तोत्र ४०:५)*
No comments:
Post a Comment