*इफिस २:14-२२*
*मंदिराचे चिरे (पाषाण)*
*खाणीपाशीच घडिलेले चिरे आयते आणून ते मंदिर बांधले; ते बांधीत असता हातोडा,कुऱ्हाड किंवा आशा कोणत्याही लोखंडी हत्यारांचा आवाज मंदिरात ऐकू आला नाही*. *१राजे ६:७*..
माझ्या मोठया भावाचे अक्षर आणि चित्रकला खूपच सुंदर आहे.. त्यासाठी त्याला शालेय पुरस्कार नेहमीच मिळत असत. ते पाहून मलाही चित्र काढण्याची *हुक्की* यायची. हुक्की अशासाठी म्हणते कारण माझं हस्ताक्षर आणि चीत्रकला म्हणजे शाईत मुगळा बुडवून वहिवर सोडला तर जी काही चित्तरकथा वहिवर उमटते तसे आहे. मग हुक्की च यावी लागायची,उपजत ती कला अंगी नव्हतीच.मग चित्रकलेच्या वहीची पानावर पानं मी फाडीत असे,कसलेही रंग भरायचे , त्यामुळे माझं चित्र काही आकार घेत नव्हते. मग आई म्हणायची,"अग तुला जे चित्र काढायचे ना ते मनात ठरव,मग रंगसंगती ठरव, **पूर्वतयारी* चांगली कर मग छान चित्र तुझेही होईल" .. मग मात्र मी तशी तयारी करून चित्र काढू लागले...
आजच्या वाचनात मंदिराच्या बांधकामाबद्दल पौल सांगत आहे, *प्रेषित व संदेष्टे ह्या पायावर तुम्ही रचिलेले आहा, स्वतः ख्रिस्त येशु मुख्य कोनशीला आहे*.म्हणजे ह्या मंदिराच्या भिंती ज्या दगडाच्या किंवा पाषाणाच्या बांधल्या जात आहेत ते दगड आपण विश्वासणारे आहोत.
जर ते चिरे,किंवा दगड आपण आहोत तर हे चिरे आधी खाणीतच घडले गेले पाहिजेत.जसे शलमोनाने देवाचे मंदिर बांधले तेव्हा हातोडा, कुऱ्हाड याचे घाव खाणीतच सहन करावे लागले त्या चीऱ्यांना!! मग ते सुबक चिरे मंदिरासाठी वापरले गेले. ही खाण म्हणजे हे जग आहे. ह्या जगातच आम्हाला प्रभूच्या मंदिरासाठी उपयोगी पडणारे सुबक चिरे व्हावे लागते.. *हे जीवन प्रभूने त्यासाठीच दिले आहे. जेव्हा हे घाव आमच्यावर पडतात तेव्हा जे निरुपयोगी कंगोरे, खडबडीतपणा जो आमच्यात आहे,मग तो द्वेषाचा, अहंकाराचा,आकसाचा, कुरकुरीचा,निंदेचा,अप्रितीचा,अविश्वासाचा असेल, हा सर्व खडबडीतपणा येथेच या जगात जीवन जगत असतानाच पूर्णपणे काढून टाकला पाहजे, देवाचे वचन आम्हाला घडवते, त्या पवित्र मंदिरासाठी तयार करते, म्हणून या वचनाद्वारे घाव बसतील कदाचित कारण हे वचन आमच्या दृष्टीने ज्या आवडत्या गोष्टी आहेत त्यावरच घाव घालते म्हणजे, एखादे व्यसन असेल,मोह असेल,जग आणि त्यातील भुरळ पडणाऱ्या गोष्टी असतील.. कारण ह्यामुळे आमचं रूप हे कंगोरे ,हा खडबडीतपणा विद्रूप करते, ते जीवन देवाच्या मंदिरासाठी उपयोगी नाही, देवाला हे मंदिर सुबक भिंतीचच बांधायचे आहे ,कारण त्याच पावित्र्य, प्रीति, शांती,आंनद,गौरव,कृपा, *प्रत्यक्ष त्याची उपस्थिती* त्यात असणार आहे..
वचन सांगते की *मंदिरात हातोडा, कुऱ्हाड याचा आवाज ऐकू आला नाही* हे मंदिर स्वर्गीय मंदिर आहे, इथेच,या जगातच आम्हाला प्रभुसाठी घडायचे आहे, मृत्यूनंतर ही संधी नाही, *नंतर फक्त स्वीकार किंवा अस्वीकार होणार आमचा त्या पवित्र मंदिरासाठी*!!!
म्हणूनच कागदावर जर सुदंर चित्र काढायचे तर *पूर्वतयारी* ही आधीच करावी लागते.. *तसेच तो सुबक चिरा आमच्या जीवनाचा इथेच घडवू या ,आमच्याच हातात आहे ते* कारण वाचनानुसार , *प्रभूच्या ठायी आत्म्याच्या द्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहोत आपण*... हि फार मोठी कृपा आहे आपल्यावर देवाची!!
*सर्व समर्थ पित्या तुझ्या मंदिराचा चिरा व्हायचे आहे आम्हाला, तुला न आवडणारे अनितीचे पापाचे कंगोरे काढून टाक आणि आम्हाला सर्वार्थाने सुबक सुदंर कर तुझ्या मंदिरासाठी*...
No comments:
Post a Comment