Thursday, 5 November 2020

देवाचे दयाळूपण



*देवाचे दयाळूपण*

*कलस्सै.३ः१२; तीत.३ः१-७*


विश्वासणार्‍याने ‘‘करुणायुक्त हृदय’’ धारण करावे (कलस्सै.३ः१२). ह्याचा संदर्भ सौम्य व कृपाळू वृत्तीशी आहे. जेव्हा ह्या गुणाचा मी विचार करतो, तेव्हा एका देवभीरू पुढार्‍याची मला आठवण होते. काही वर्षांपूर्वी त्याच भागातील एका पुढार्‍याने ह्या देवभीरू माणसाचे खूप नुकसान केले व त्याच्या नावाला काळीमा फासण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मंडळीच्या सभेमध्ये ह्या पुढार्‍याच्या बाबतीत दुसर्‍या व्यक्तीच्या ज्या कारवाया चालू आहेत त्यासंबंधी आमच्यापैकी काही जणांनी चिंता व्यक्त केली. तेव्हा ह्या देवभीरू पुढार्‍याने जे विधान केले ते मी कधीच विसरू शकणार नाही. ते म्हणाले, ‘‘माझ्या अंतःकरणात मी एक दृढ निश्चय केला आहे की कसेही करून मी त्या ख्रिस्ती पुढार्‍याला प्रेम व दया दाखवणारच.’’ त्यांनी तसे करून दाखवलेे. यालाच दयाळूपणा म्हणतात.


दयाळूपणा दाखवण्याच्या बाबतीत पवित्र शास्त्रातून आपल्याला दाविदाच्या जीवनातील उदाहरण पाहायला मिळते. पूर्वीचा राजा शौल दाविदाचा तिरस्कार करत असे व त्याने अनेक वेळा दाविदाला जिवे मारण्यास पाहिले. परंतु दाविदाने कधीच शौलाचा गैरफायदा घेतला नाही; तर उलट शौलाचा पुत्र योनाथान दाविदाचा जिवलग मित्र बनला. शौल व योनाथान यांचा वध झाल्यावर दाविदाने चौकशी केली, ‘‘योनाथानाप्रीत्यर्थ ज्याच्यावर आपण दया करावी असा शौलाच्या घराण्यातला अजून कोणी उरला आहे काय? अशी चौकशी दाविदाने केली’’ (२शमु.९ः१). त्या वेळी योनाथानाचा अधू मुलगा मफीबोशेय याकडे दाविदाचे लक्ष वेधण्यात आले (व.३). दाविदाने मफीबोशेथाला बोलावणे पाठवले आणि २शमु.९ चा सारांश पाहा, ‘‘मफीबोशेथ यरुशलेमेत राहिला; कारण तो राजाच्या पंक्तीस नित्य भोजन करीत असे; तो दोन्ही पायांनी लंगडा होता’’ (व.१३). ह्याशिवाय दाविदाने शौलापासून जप्त केलेली जमीन त्याला परत केली. हा खरा कृतीत आणलेला दयाळूपणा होता.


_आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा; जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हांला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा (इफिस.४ः३२)._


*

No comments:

Post a Comment