*✨प्रभूच्या चरणी✨*
*"..तुम्ही परमेश्वराच्या बरोबर राहाल तोवर तो तुमच्याबरोबर राहील; तुम्ही त्याला शरण जाल तर तो तुम्हाला पावेल. पण तुम्ही त्याला सोडाल तर तो तुम्हाला सोडील.."✍🏼*
*( २ इतिहास १५:२ )*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
आसाबद्दल लिहिले आहे की, परमेश्वराच्या दृष्टीने जे चांगले व नीट ते त्याने केले. त्याच्या कारकिर्दीत त्याने अनेक सुधारणा घडवून आणल्या. देवाच्या लोकांमध्ये कोणत्याही प्रकारच्या सुधारणा घडवून आणण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये संजीवन येण्यासाठी त्यांनी देवाचा मनापासून शोध घेणे, देवाला शरण जाणे, त्याच्या चरणी लागणे महत्वाचे आहे. *यहूदी लोकांनी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याच्या चरणी लागावे आणि नियमशास्र व आज्ञा ह्यांचे पालन करावे अशी त्याने ( आसा राजाने) त्यांना आज्ञा केली. ( २ इतिहास १४:४)* "परमेश्वराच्या चरणी लागणे" म्हणजे देवासोबत आमची घनिष्ट सहभागिता असावी अशी मनापासून इच्छा बाळगणे आणि त्याच्या हेतूंशी निष्ठावंत असणे. त्यासाठी दुष्ट प्रवृत्तींपासून दूर जाण्याची आणि आमचे जीवन शुद्धतेसाठी आणि पवित्रतेसाठी देवाला समर्पित करण्याची गरज असते. देवाला शरण जाण्याचे अनेक फायदे आहेत. जे परमेश्वराला शरण जातात, त्यांना देवाची शांती आणि संरक्षण यांचा अनुभव येतो. शांती म्हणजे केवळ विरोध, कलह, वादविवाद, लढाया यांचा अभाव असणे, एवढेच नाही, तर त्यामध्ये क्षमाशीलता, शुद्ध विवेकभाव, कल्याण आणि अभिष्टाची भावना यांचा समावेश आहे. हे सर्व देवाबरोबर असलेल्या नात्यामुळे मिळते. यशया म्हणतो, *"ज्याचे मन तुझ्या ठायी स्थिर झाले आहे त्याला तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव तुझ्यावर असतो." ( यशया २६:३)*
जे लोक परमेश्वराला शरण जातात किंवा झटून त्याचा शोध घेतात त्यांना तो सापडेल असे अभिवचन देव देतो. ख्रिस्ताद्वारे मिळणाऱ्या पापक्षमेचा स्वीकार करून जे लोक त्याचे नेतृत्व मान्य करतात त्यांच्यासाठी देवाने उपलब्ध करून दिलेल्या नव्या करारानुसार देवाची समक्षता समाधान, शांती, सांत्वन देते, सत्य प्रगट करते, देवभिरू चारित्र्य निर्माण करते आणि पवित्र आत्म्याद्वारे सामर्थ्य पुरविते. जे लोक परमेश्वराला शरण जातात ते त्यांची संकटे व त्यांचे शत्रू यांवर जय मिळवितात. ख्रिस्ताच्या अनुयायांना मोहाचा सामना करण्यासाठी आणि सैतान व त्याच्या सैन्याविरूद्ध आध्यात्मिक लढाई करण्यासाठी मोठे सामर्थ्य प्राप्त होते. ( इफिस ६:१०-१८) देवाला शरण जाणाऱ्यांविषयी स्तोत्रकर्ता म्हणतो की, *"तरूण सिंहानाही वाण पडते व त्यांची उपासमार होते; पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही." ( स्तोत्र ३४:१०)*
याउलट जर आम्ही देवाला शरण गेलो नाही, देवावर भरंवसा ठेवला नाही तर अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. आसानेही जीवनभर परमेश्वराची भक्ती करूनही आपल्या कारकिर्दीच्या अखेरच्या दिवसांत देवापासून तो दूर गेला. देवावर भिस्त ठेवण्याऐवजी त्याने मनुष्यावर भिस्त ठेवली. देवाला शरण जाण्याऐवजी तो मनुष्याला शरण गेला. त्याने देवावर अवलंबून राहण्याऐवजी मानवी मैत्रीवर अवलंबून राहिला. ( पाहा २ इतिहास १६:१-८) त्याने देवाच्या संदेष्ट्याचा नाकार करून त्याचा छळ केला. देवाने पाठविलेल्या संदेष्ट्याचा नाकार करणे, त्याचा संदेश ऐकण्यास नकार देणे, देवाकडून आलेल्या संदेष्ट्याचा छळ करणे हे आध्यात्मिक पतनाचे चिन्ह आहे. त्याचप्रमाणे त्याने त्याच्या आजारपणात देवाची मदत घेण्याऐवजी त्याने पूर्णपणे मानवी वैद्यांची मदत घेतली. ( वचन १२) अशाप्रकारे तो देवाला शरण जाण्याऐवजी देवापासून दूर गेला. परमेश्वर त्याला म्हणत आहे, *... हा तू मूर्खपणा केला म्हणून ह्यापूढे तुझ्यामागे लढाया लागणार. ( २ इतिहास १६:९)* प्रियांनो, जे परमेश्वराला शरण जातात, त्याच्याशी एकनिष्ठ राहातात ते देवाच्या दृष्टीने खूप मौल्यवान असतात. ते अडचणींचा किंवा आध्यात्मिक परीक्षांचा सामना करत असतील तर त्यामध्ये तो त्यांना साहाय्य करील, त्यांना आधार देईल. म्हणून आम्ही सदैव देवाला शरण जाऊन त्याच्या आज्ञांप्रमाणे वागले पाहिजे. परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी करून आमच्या जीवनाद्वारे प्रभूला संतोष दिला पाहिजे. वचन सांगते, *...जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वागतात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रकट करितो. ( २ इतिहास १६:१६:९)*
No comments:
Post a Comment