*निर्गम - १७:८-१६*
*उचलून धरा*
*अहरोन व हूर यांनी दोन्ही बाजूंनी त्याचे हात उचलून धरले*..*निर्गम-१७:१२*
एकदा मंडळीतील एक पालक त्यांच्या मुलाला घेऊन पाळकांकडे आले . मुलाच्या बाबतीत त्यांना सल्ला हवा होता. मुलगा अभ्यास करीत नाही ही त्यांची तक्रार होती. पाळकसाहेबांनी त्या मुलाला तू अभ्यास का करीत नाही वगैरे न विचारता एवढेच विचारले की, "आता झालेल्या परीक्षेत तुला किती गुण मिळाले"? तो मुलगा उत्तरला " ४०%". अरे व्वा व्वा, म्हणजे तू अभ्यास करतोस की बाळा, आता एक कर आणखी थोडा अभ्यास कर.तू नक्कीच उत्तम गुणांनी पास होशील." बस एवढेच ते बोलले, कोणताही उपदेश केला नाही. अशा प्रकारे पळकसाहेबांच्या त्याला उचलून धरण्यामुळे त्याला एकप्रकारे प्रोत्साहन मिळाले. आणि खरच पुढील परीक्षेत त्याला ७६% मार्क्स मिळाले.
अगदी ह्याच गोष्टीची गरज धार्मिक बाबतीतही आहे. प्रभू येशूचे अनेक सेवक त्याची सुवार्ता सांगतात, मंडळींचे पाळकसाहेब ,
तरुण वर्ग, महिला मंडळ असे अनेक लोक देवाची सेवा करतात तेंव्हा आमचे कर्तव्य आहे की ,त्यांच्या ऊणिवावर बोट न ठेवता त्यांच्या सेवाकार्याची प्रशंसा करीत , त्यांच्यासाठी प्रार्थना करीत हे प्रभूंचे राज्य आणि कार्य वाढविण्यासाठी त्यांना हातभार लावायचा आहे. त्यांचा उत्साह वाढविणारे दोन शब्द बोलून तर पहा, दुपटीने ते देवाची सेवा मनापासून आणि प्रेमाने करतील. आज सेवकांची गरज आहे. कारण *पीक फार आहे आणि कामकरी थोडे आहेत*.
मोशे प्रार्थना करीत होता आणि हूर व अहरोन त्यात सहभागी झाले म्हणून खाली यहोशवाचा विजय आणि आमालेक्यांचा पराभव झाला. तसे ह्या देवाच्या सेवकांमुळे देवाचे राज्य वाढीस लागून त्याची शांती प्रस्थापित होईल..
कारण प्रभू येशूच्या सेवकांना हातभार लावणे म्हणजे देवाचे राज्य वाढविणे.. आणि ह्याचे प्रतिफळ आम्हाला नक्कीच मिळणार आहे. कारण देवाचे वचन सांगते की, *ह्या लहानातील एकाला थंड पाण्याचा प्याला जो कोणी देईल तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही*.
प्रार्थनेत सेवकांची आठवण ठेवीत प्रभूला विनवणी करू की *तुझी सेवा करणाऱ्याचे हात उचलून धरण्यास आमचे सहाय्य कर*. *आमेन*
No comments:
Post a Comment