*✨आत्म्याद्वारेच सुज्ञानप्राप्ती✨*
*ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी नव्हे तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी, आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टींची संगती लावून सांगतो..✍🏼*
*( १ करिंथ २:१३ )*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
पौल जरी स्वतःच्या सुवार्ता कार्याविषयी बोलत आहे तरी तो सर्व गौरव देवाला, पवित्र आत्म्याला देत आहे. पवित्र आत्म्याने पवित्र शास्र लिहिण्यासाठी कशी प्रेरणा दिली ते तो सांगत आहे. पवित्र शास्राचे विचार आणि भाषा ह्या दोन्हींनाही देवाच्या आत्म्याने प्रेरणा दिली. ज्याप्रमाणे आपल्या मनात काय आहे ते केवळ त्या त्या व्यक्तीलाच माहीत असते त्याप्रमाणे देवाचे विचार फक्त पवित्र आत्माच जाणतो. पवित्र शास्रातील वचने किंवा शास्रभाग लिहिताना एकाही लेखकाने चुकीचा शब्द किंवा शब्दप्रयोग वापरला नाही. पवित्र आत्म्याने सर्व चुकांपासून आणि असत्यापासून देवाच्या पवित्र वचनांचे रक्षण केले. प्रेषित जगाच्या लौकिक रितीप्रमाणे बोलत नाहीत. तर पवित्र आत्म्याने शिकवलेले, मार्गदर्शन केलेलेच बोलत आहे. कारण देवाने आपल्या पुत्रामध्ये आम्हाला एवढ्या सढळपणे दिले आहे ते समजून घ्यावे म्हणून प्रेषितांना हाच पवित्र आत्मा दिलेला आहे. पौल म्हणतो, *हे तर ह्या शास्रलेखाप्रमाणे आहे, "डोळ्याने जे पाहिले नाही, कानांनी जे ऐकले नाही व माणसाच्या मनात जे आले नाही, ते आपल्यावर प्रीति करणाऱ्यांसाठी देवाने सिद्ध केले आहे; कारण देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रकट केले; कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टींचाही शोध घेतो." ( वचन ९,१०)*
देवाविषयीचे सत्य लोकांना सांगण्यासाठी प्रेषित जगाच्या ऐहिक ज्ञानाचा आधार घेत नाहीत. तर ते आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी आध्यात्मिक शब्दांनी आध्यात्मिक सत्य सांगतात. जगीक वक्ते वापरतात ते अलंकारिक शैलीतंत्र त्यांनी अंगिकारले नाही. आपले ज्ञान मानवजातीला कळवावे अशी देवाची इच्छा होती. आणि केवळ पवित्र आत्म्याद्वारेच देवाचे सत्य आणि ज्ञान मानवजातीला प्रकट केले जाते. पवित्र आत्मा स्वतः देवच असल्यामुळे तो देवाचे विचार पूर्णपणे समजू शकतो. देव बोलणारा देव आहे. आणि आपले अंतःकरण व मनोदय आपल्या सेवकांच्या, प्रेषितांच्या द्वारे उघड करावे हे त्याला बरे वाटले. देवाने ते पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रकट केले आहे. देवाने निवडलेल्या विश्वासणाऱ्यांना त्यांच्यामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याद्वारे देवाचे प्रकटीकरण दिले होते. *आपल्याला जगाचा आत्मा नव्हे, तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे; ह्यासाठी की, जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे. ( वचन १२)* पवित्र शास्राच्या लेखकांनी पवित्र आत्म्याने शिकवलेले शब्द लिहिले. देवाला जे सांगायचे होते ते त्यांनी अगदी अचूकपणे सांगावे यासाठी त्यांनी वापरलेल्या शब्दांची निवड सुद्धा पवित्र आत्म्यानेच केली. म्हणजेच ते लिहिण्यासाठी त्यांना योग्य ते शब्द पुरवले. पवित्र शास्र लिहिण्यासाठी प्रेषितांना पवित्र आत्म्याने साहाय्य केले. पवित्र आत्म्याने प्रत्येक लेखकाच्या शब्दसंग्रहाचा व लेखनशैलीचा उपयोग करून घेतला. आणि जे आम्ही देवाचे पवित्र वचन वाचणारे ते पवित्र आत्म्याच्या मदतीने आणि मार्गदर्शनानेच देवाचे वचन समजू शकतो, ग्रहण करू शकतो. आम्ही पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने आणि पवित्र आत्म्याच्या साहाय्याने चालावे. देवाचे पवित्र वचन वाचण्यासाठी, आणि ते समजण्यासाठी पवित्र आत्म्याचे साहाय्य मागावे. आमचे आचरण पवित्र वचनाप्रमाणे असावे.
*!!..प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो..!!*
*
No comments:
Post a Comment