*लूक १७ : २८-३३.*
*मागे नाही तर पुढे पहा.*
*जो कोणी आपला जीव सांभाळण्याचा प्रयत्न करील तो आपल्या जीवाला मुकेल , आणि जो कोणी आपल्या जीवाला मुकेल तो आपला जीव वाचविल*.
*लूक १७:३३*
*प्रभू येशू स्वतः म्हणत आहे , " लोटाच्या बायकोची आठवण करा .* लोटाची बायको म्हटलं की मला रुथची सुद्धा आठवण येते . कारण या दोघीही लोटाशी संबंध असणाऱ्या स्त्रिया आहेत. एक *लोटाची पत्नी* , तर दुसरी म्हणजे लोटाला जो मवाब नावाचा मुलगा त्याच्या स्वतःच्या मुलीपासून झाला होता त्याच्या म्हणजे मवाबी वंशातील *रूथ* नावाची स्त्री आहे. *एकीने म्हणजे लोटाच्या पत्नीने मागे वळून पाहिलं आणि मोठा अनर्थाला सामोरं जावं लागलं. तर एकीने म्हणजे रुथने पुढेच दृष्टी ठेवली म्हणून मोठे प्रतिफळ व मोठा मानसन्मान तिला मिळाला.*
सदोम गमोरा सोडताना देवदूताने लोटाला सांगितले होते की मागे वळून पाहू नका . तरीही लोटाच्या पत्नीने मागे वळून पाहिलं आणि ती मिठाचा खांब झाली. पण एवढ्यावरच अनर्थ थांबला नाही तर लोटाच्या मुली आणि लोट यांच्याकडून महापातक घडले. *नीतिमान लोटाच्या वंशात अनितीमान , दुष्ट , व्यसनाधीन , मूर्तीला मुलाचा बळीअर्पण करणारा असा मवाबी वंश तयार झाला*. मागे वळून पाहण्याने किती भयानक नाश ओढवतो हे विसरू नका.
मागे वळून पाहणं म्हणजे पुन्हा सदोम व गमोरासारख्या पातकात पडणे. मागे वळून पाहणं हे फार धोक्याचं आहे. संकटांची मालिका आणि देवापासून दुरावा हेच काय ते हाती येते . पण याच वंशातील रुथने मात्र जेव्हा नामीच्या प्रीतीपूर्ण वागण्याने जिवंत देवाला जाणले तेव्हा मात्र रुथने आपली दृष्टी पुढे म्हणजे ह्या जिवंत देवावर , परमेश्वरावर स्थिर केली आणि अतिशय महान प्रतिफळाची , आशीर्वादाची मानकरी ठरली. मत्तयाच्या पहिल्या अध्यायात प्रभू येशूच्या वंशावळीत तीचं नाव आहे. *कारण ती म्हणते नामीला जी नामी जिवंत देवावर विश्वास ठेवणारी होती की , " तुझा देव तोच माझा देव.*
प्रभूने आम्हालाही त्या पापाच्या , सदोम, गमोराच्या दलदलीतून बाहेर काढलं आहेच. आता मागे वळून पाहणे नाही तर फक्त त्या ख्रिस्तावर दृष्टी ठेवून चालत प्रतिफळ मिळवायचं आहे ..
*कारण मागे वळून पाहण्यात शाप आहेत तर पुढे ख्रिस्ताकडे पाहण्यात आशीर्वाद आहेत. मागे पाहण्यात न्याय तर पुढे पाहण्यात कृपा आहे. मागे पाहण्यात लोट आहे तर पुढे पाहण्यात ख्रिस्त आहे.*
*आमचा भूतकाळ कितीही वाईट असला तरी आता आम्हाला ख्रिस्त सापडला आहे . रूथप्रमाणे पूर्ण जिवाने , पूर्ण शक्तीने , पूर्ण बुद्धीने सर्वस्व अर्पण करीत ख्रिस्तावर प्रीति करीत येशू ख्रिस्तावरच दृष्टी ठेवू.* *मागे नाही तर पुढे ख्रिस्ताकडे पाहू!!*
*प्रभू येशू रूथ प्रमाणे केवळ तुझ्यावरच दृष्टी ठेऊन आम्ही आशीर्वादीत व्हावे असे कर.*
*आमेन*
No comments:
Post a Comment