Sunday, 22 November 2020

परमेश्वराचे मंदिर

 *मत्तय २१:१२-१७*


              *परमेश्वराचे मंदिर*


     *तुमचे शरीर , तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हास ठाऊक नाही काय?* 

           *१ करिंथ ६: १९*


     मंदिर कशासाठी आहे? आम्ही येथे का आहोत? देवाचा आमच्याविषयी काय प्लॅन आहे?

*या सर्व प्रश्नांचे उत्तर एकच आहे, एकच उद्देश आहे, तो म्हणजे "देवाला गौरव देणे*.

आमचं घर जर घाण झालं, कचरा असेल, पसारा पडलेला असेल, तर आपण काय करतो? हे कचरा असलेलं, पसारा असलेलं, घाणेरडं झालेलं घर सोडून आपण दुसऱ्या घरात रहायला जातो का? नाही, उलट ते आपण स्वच्छ करतो, पसारा आवरतो, पडदे बदलतो, आणि मग आमचं घरात आम्हाला प्रसन्न वाटू लागते . आंनद होतो.  *कारण ते घर आमचं स्वतःचं आहे*.

    *जुन्या करारात लोकांसाठी परमेश्वराने मंदिर बांधायला लावले, पण नव्या करारात परमेश्वराने माणसाचीच निवड देवाचे किंवा येशूख्रिस्ताचे मंदिर म्हणून केली आहे*.जेव्हा आम्ही येशु ख्रिस्ताचा आमचा तारणारा म्हणून स्वीकार करतो, तेव्हा आमचे तारण होते. बरेच लोक तारण म्हणजे काय विचारले तर काय सांगतात तर, *तारण होणे म्हणजे स्वर्गात जाणे* असे म्हणतात. पण हा एक तारणाचा रिझल्ट  नक्कीच आहे, *पण तारण म्हणजे पृथ्वीवरचा माणूस स्वर्गात जाणे असेच फक्त नाही तर स्वर्गातील देव आमच्यात येऊन राहणे ह्याला तारण म्हणतात*. आणि म्हणून आपण देवाचे मंदिर आहोत. 

    जर आम्ही देवाचे मंदिर आहोत तर ख्रिस्ताच्या दृष्टीने योग्य मंदिर आहोत काय? स्वच्छ आहे का हे मंदिर? की राग , लोभ, द्वेष, अहंकार, आकस, मत्सर, चढाओढ, याचा व्यापार आणि पसारा मांडून ठेवलाय ?.प्रभूला आंनद  होतो काय?त्याला आवडणारे हे मंदिर आहे की नाही?  *कारण 

*एक गोष्ट लक्षात ठेवलीच पाहिजे प्रत्येक विश्वासणाऱ्याने की घाणेरड्या मंदिरात प्रभू येशूला आनंद होत नाही*.  *पण हा पातकाचा पसारा जरी प्रभूला आवडला नाही तरी तो हे मंदिर सोडून जात नाही, तर ते मंदिर प्रभू येशु स्वच्छ करतो*.. 

   कोरडा वापरतो प्रभू. हे अहंकार, स्वार्थ, मोह, लोभ, द्वेष, मत्सर याचे चौरंग प्रभू येशु उधळून लावतो, आम्हाला दुःख, वेदना नक्कीच होतात कारण ह्या सर्व देवाला अप्रिय गोष्टी आपल्याला फार प्रिय असतात. पण परमेश्वराला माहीत आहे की ह्या गोष्टी आम्हाला रसातळाला, नाशाकडे घेऊन जातात. बायबल सांगते, *१ करिंथ ६:२० मध्ये, तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा*. *आमच्यावर फक्त प्रभू येशु ख्रिस्ताचा अधिकार आहे. आम्ही आमचे नाही* . रक्त सांडलयं प्रभू येशूने, अवहेलना सहन केली हे कसे विसरू शकतो आपण!! उत्तम शुक्रवारीच फक्त आठवायचे का हे? विचारू आपल्या मनाला!!. 

   *जसं स्वतःचे  स्वच्छ घर आपल्याला आनंद देते तसेच आमचे स्वच्छ, प्रेमाने भरलेले, पापविरहित , शुद्ध व ख्रिस्तावरील विश्वासाने परीपूर्ण अंतकरणरूपी मंदिर परमेश्वराला प्रसन्न करते*. म्हणून हे देवाचे शरीररूपी मंदिर सदैव स्वच्छ आणि पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करू!!.

      *सृष्टीच्या निर्माणकर्त्या ख्रिस्ता आमच्या देहात , हृदयात तुला न आवडणारा जो बाजार आम्ही मांडला असेल तो तू उधळून लाव, आम्हाला स्वच्छ कर.*

              

No comments:

Post a Comment