Wednesday, 11 November 2020

देवापासूनच बल आणि सामर्थ्य



  *✨देवापासूनच बल आणि सामर्थ्य✨*


*परमेश्वर, जो माझा दुर्ग, त्याचा धन्यवाद होवो, तो माझ्या हातांना लढावयास शिकवितो, माझ्या बोटांना युद्ध करावयास शिकवितो..✍*

                 *( स्तोत्र १४४:१ )*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


     राजासनावर आरूढ झालेल्या दाविद राजाने सर्व श्रेय परमेश्वराला दिले. आणि एका अतिसामान्य, मर्त्य मानवाला देवाने इतका चांगुलपणा दाखविला म्हणून तो देवाचे आभार मानत आहे. देवाला धन्यवाद देत आहे. तो परमेश्वराला दुर्ग म्हणजेच खडक असे संबोधित आहे. कारण परमेश्वर कधीही न बदलणारा देव आहे. खडकाप्रमाणे स्थिर आहे. देवाच्या अखत्यारित केवळ युद्धाची परिणीतीच नव्हे तर आणखी भरपूर गोष्टी असतात. सर्व तपशीलांकडे त्याचे लक्ष असते. हात, बोटे, प्रत्येक सैनिकांचे वैयक्तिक कौशल्य ह्याकडे त्याचे लक्ष असते. लढाई परमेश्वराची आहे, आपल्याला माहीत आहे की, विजयही त्याचाच आहे. ज्याप्रमाणे दाविदाने देवाच्या साहाय्याने आपल्यापेक्षा बलवान गल्याथाबरोबर लढून त्याच्यावर विजय मिळविला होता. त्याप्रमाणेच देवावर भरंवसा ठेवून आम्ही आमचे युद्ध लढले पाहिजे. त्यासाठी त्याच्या लोकांनी नेटाने आणि पूर्णपणे देवाला समर्पित होऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. पौल म्हणतो, *"शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा." ( इफिस ६:१०)* आम्ही प्रभूच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून त्याला पूर्णपणे समर्पित झाले पाहिजे. 


    आमच्याकडे देवाला देण्यासारखे काहीही नाही, आपण त्याच्या काहीच उपयोगाचे नाही असे आम्हाला वाटते. परंतु आपण पाहातो की, देवाने मोशेला दर्शन दिले आणि इस्राएली लोकांना मिसरांच्या दासपणातून सोडविण्याचे काम त्याला सोपवून दिले. मोशेला देवाने सेवेसाठी पाचारण केले तेव्हा तो म्हणाला, *"हे प्रभू, मी बोलका नाही. मी मुखाचा जड आणि जिभेचाही जड आहे." ( निर्गम ४:१०)* मोशेच्या बोलण्यात काही दोष असेल किंवा तो भीत असेल. परंतु देवाने त्याचे हे अपुरेपण आपल्या पूरतेपणातून भरून काढले. आणि मग देवाने म्हटले, *"तर आता जा, मी तुझ्या मुखांस साहाय्य होईन आणि काय आणि कसे बोलावयाचे ते तुला शिकवीन." ( स्तोत्र १४४:१२)* आणि आपण पाहातो की देव सदैव मोशेच्या बरोबर चालला. अरण्यातील प्रवासामध्येही देवाने सर्व प्रकारे मोशेचे साहाय्य केले. त्याच्यातील कमतरता, उणेपण देवाने दूर केले.


     आपल्याला जरी वाटते की आपण काहीच कामाचे नाही, आपण सर्व गोष्टींनी दुर्बल आहोत, परंतु परमेश्वर तसे समजत नाही. तो अशा लोकांचाच त्याच्या राज्याच्या वाढीसाठी उपयोग करून घेतो. तो लीनांस उंच करितो. आम्ही लीन, नम्र असावे. देव आमच्या जीवनाद्वारे त्याचे कार्य करून घेतो. म्हणून आम्ही देवाच्या योजनेप्रमाणे चालावे, देवाची इच्छा पूर्ण करावी. आणि त्याच्या आमच्याविषयीच्या योजना आमच्या जीवनाद्वारे त्याला पूर्ण करण्यासाठी आपले जीवन त्याच्या हाती सोपवून द्यावे. त्याच्या बलवान हातांमधून आपण इतरांच्या आशीर्वादास कारण व्हावे.


*देव आपल्याला त्याच्या कार्यासाठी पाचारण करतो तेव्हा आपण एकटे नसतो,  आपल्यासोबत त्याचे सामर्थ्य आणि शक्ती असते.*


       

              

No comments:

Post a Comment