Monday, 9 November 2020

देवाला इतरांना देण्यात आनंद वाटतो



*देवाला इतरांना देण्यात आनंद वाटतो*

*याकोब.१ः१६-१८*


जे सर्व चांगले आहे त्याचा दाता देव आहे ह्या सत्याविषयी कसलीच शंका याकोबाने दाखवली नाही. याकोबाने इशारा दिला की, ‘‘फसू नका’’ (याकोब.१ः१६). ग्रीकमधून जो फसणे शब्द भाषांतरित केला त्याचा अर्थ आहे ‘‘भरकटणे’’ किंवा ‘‘मार्गावरून दूर जाणे’’ असा आहे. ह्या शब्दाचा उपयोग जे जहाज आपल्या मार्गापासून भरकटले असून भयंकर संकटात आहे अशा जहाजासाठी केला जातो. ह्या ठिकाणी याकोब क्षुल्लक चूक करणे याचा नाही तर गंभीर चूक करणे याचा संदर्भ देत आहे की जिचा परिणाम आश्‍चर्यकारक आणि भयंकर परिस्थितीत होऊ शकतो. 


येथे याकोब ‘‘प्रत्येक महान देणगी’’ असे न म्हणता ‘‘प्रत्येक उत्तम देणगी’’असे म्हणतो (व.१७). देणगी लहान असो की मोठी असो त्याने काही फरक पडत नाही, तर देव जे काही देतो ते सर्वकाही उत्तम असते. कधी कधी कठीण परिस्थितीतून जाणारी व्यक्ती देवापासून येणारे सर्व खरोखर चांगले आहे का हा प्रश्‍न विचारू शकते. पण अशा व्यक्तीला याकोब आश्वासन देतो की, तिने हा प्रश्‍न विचारण्याची आवश्यकता नाही. लक्षात घ्या की, याकोब येथे देणगीसंबंधी बोलत आहे, देणग्या ह्या कोणाला त्याच्या पुण्याईमुळे मिळत नाहीत, तर केवळ देवाच्या कृपेमुळे मिळतात.


याकोब ह्या गोष्टीवर भर देतो की, जी देणगी मिळते ती ‘‘वरून येणारी’’ असते (व.१७). येथे याकोब स्वर्गीय गोष्टी व भौतिक गोष्टी ह्यांच्यामधील फरक दाखवतो. आपण सहजपणे ह्या जगिक गोष्टीत गुरफटून जातो व त्यांच्याविषयीच्या लालसेने पूर्ण पेटून उठतो की, ज्या कायम टिकत नाहीत. आपण ह्या भूतलावर कायम राहणार नाही, म्हणून आपल्या परीक्षांनाही आपण सार्वकालिक जीवनाच्या प्रकाशात पाहिले पाहिजे.


_ज्याने तुम्हाआम्हांला आपल्या गौरवासाठी व सात्त्विकतेसाठी पाचारण केले त्याच्या ओळखीच्या द्वारे, त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने, जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत (२पेत्र.१ः३)._



No comments:

Post a Comment