*प्रकटीकरण भाग — 17*
*शिक्का 6- पृथ्वीवर अनेक भयंकर अनर्थ*
प्रियजनहो, प्रकटीकरण 6:12—17 या वचनांमध्ये सहाव्या शिक्क्याच्या पीडेबद्दल लिहिलेले आहे. *प्रभु येशू ख्रिस्ताने* सहावा शिक्का फोडला, ते मी पाहिले; तेव्हा मोठा भूमिकंप झाला; ‘सूर्य’ केसांपासून बनवलेल्या तरटासारखा काळा झाला व सगळा ‘चंद्र रक्ता’सारखा झाला; (प्रकटीकरण 6:12) आतापर्यंत अनेक भूकंप झालेले आहेत परंतु हा भूकंप संपूर्ण पृथ्वीवर आलेला असेल. हा अतिशय भयानक प्रलयंकारी भूकंप आहे. सुर्य तरटासारखा काळा आणि चंद्र रक्तासारखा लाल हे दृश्य अतिशय भयानक असेल. खग्रास चंद्र ग्रहणात चंद्र लालसर दिसतो परंतु त्यात भयानक काहीही नसते. परंतु सहाव्या शिक्क्याच्या पीडेमध्ये तरटासारखा सुर्य आणि रक्तासारखा चंद्र भीतिदायक दिसतील तशात पृथ्वीवर प्रचंड भूकंप अशी अतिशय भितीदायक स्थिती असेल. प्रियजनहो, भूकंप झाल्यावर लोक घराबाहेर पळतात, मोकळ्या जागी जातात. परंतु संपुर्ण पृथ्वीवरील भूकंप किती लोकांना घराबाहेर पळू देईल ? परिणामी अनेक लोक मृत्यूमुखी पडतील आणि त्यापेक्षा जास्त लोक अपंग होतील. भूकंपानंतर लगेचच प्रचंड वादळ आणि पाऊस पडतो. ज्वालामुखी उद्रेक झाल्यामुळे वातावरणात धुळ आणि राखेचे ढग उसळतात. प्रचंड पाऊस आणि सूर्यप्रकाश नाही, नद्या ओढे नाले यांना पूर, रस्ते उखडलेले, वाहतूक ठप्प, मदत करण्याची कोणतीही प्रवृत्ती नाही, विश्वास कोणावरही नसेल, अशा परिस्थितीत इमारतींच्या ढिगाऱ्यांखालील प्रेते सडल्यामुळे रोगराई आणखी पसरणार. आज भूकंपानंतर जागतिक पातळीवर मदती मिळतात. परंतु ख्रिस्तविरोधकाच्या काळात ही मदत मिळण्याची शक्यता नसेल. भूकंपाचे केंद्र समुद्रात असेल तर त्सुनामीचा धोका असतो. यावेळी होणारा हा भूकंप संपुर्ण पृथ्वीवर आहे म्हणजे त्सुनामी आणि त्सुनामी नंतरच्या सर्व संकटांना देखील त्यावेळच्या लोकांना सामोरे जावे लागणार आहे. बंधुजनहो, ही संकटे येथे थांबत नाही. या भूकंपाची तिव्रता आपल्याला चौदाव्या वचनात वाचायला मिळते. वचन सांगते, ........ सर्व डोंगर व बेटे आपापल्या ठिकाणांवरून ढळली. (प्रकटीकरण 6:14) येथे पृथ्वीवरील सर्व डोंगर आणि समुद्रातील डोंगर म्हणजे बेटे सांगितलेली आहेत. ती सर्व आपआपल्या ठिकाणांवरून ढळली आहेत. कोणताही डोंगर आपल्या जागेवर राहणार नाही. प्रियांनो सोशल मिडिया वर दरड किंवा डोंगरकडा कोसळतानाचा एखादा व्हिडीओ पाहायला देखील भितीदायक वाटते. या पीडेमध्ये सर्वच्या सर्व डोंगर आणि सर्वच्या सर्व बेटे जागा सोडत आहेत. आपण कल्पनाही करु शकत नाही इतकी भयंकर परिस्थिती निर्माण होणार आहे. प्रियजनहो 30 जूलै 2014 रोजी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीन गाव डोंगर भूस्खलन झाल्या मुळे नकाशावरून नाहिसे झाले. संपूर्ण गाव गाडले गेले. या सहाव्या शिक्क्याच्या पीडेमधे सर्व डोंगर आणि सर्व बेटे जागा सोडतील तेव्हा काय होईल याची आपण कल्पना देखील करु शकत नाही.
जगभरात फक्त भूस्खलन झाल्यामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत, शेकडो गावे आतापर्यंत उध्वस्त झाली आहेत. डोंगराचा एक छोटा भाग कोसळला तर आपत्ती इतकी भयानक आहे तर सर्व डोंगर सरकले तर काय होईल ? जगातील सर्वात उंच पर्वत एव्हरेस्ट पर्वत सरकला तर, हिमालयाच्या पर्वतरांगांनी जागा सोडल्यावर काय होईल आपण कल्पना देखील करु शकत नाही. *एवढे जरी समजले तरी प्रभुच्या क्रोधाच्या या सात वर्षाच्या काळात पृथ्वीवर राहण्याची कोणाचीही इच्छा राहणार नाही. त्यासाठी काय करावे ? अतिशय सोपे आहे, “प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.” (प्रेषितांची कृत्ये 16:31) बस्स एवढेच. कारण प्रभु येशू ख्रिस्ताने आपल्या साठी पापांचे शासन आगोदरच सहन करुन आपल्याला मुक्त केले आहे. देवबाप करो सर्वांना सुबुद्धी देवो आणि प्रभु येशू ख्रिस्ताला स्विकारणारे अंतःकरण देवो आणि या महाभयंकर महासंकटाच्या काळापासून सोडवून स्वर्गारोहणात समाविष्ट करुन घेवो. आमेन.*
SSK
*प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह असो. आमेन.*